म्हटलं तर हा लिटफेस्टच. पण लिटफेस्टला जो इंग्रजी चेहरामोहरा असतो, त्याऐवजी ‘बहुभाषिक लिटफेस्ट’ म्हणून होणारा मुंबईचा ‘गेटवे लिटफेस्ट’ अगदी २०१५ च्या पहिल्या खेपेपासूनच निराळा ठरला आहे. यंदाची चौथी खेप २२ फेब्रुवारीपासून सुरू होते आहे. रविवापर्यंत (२४ फेब्रु.) सर्व दिवस, मुंबईतील नरिमन पॉइंटच्या राष्ट्रीय संगीत नाटय़ केंद्रात (एनसीपीए) हा साहित्योत्सव चालेल. यंदा २० भाषांतल्या ५० लेखिकांचा सहभाग, हे ‘गेटवे’चं वैशिष्टय़ आहे. असणारच; कारण यंदाची चर्चासत्रंसुद्धा महिला केंद्रित विषयांवर अधिक आहेत. चार दिवसांत एकंदर नऊ चर्चा आणि चारही दिवसांचा शेवट बहुभाषक कविसंमेलनांनी, अशी ‘गेटवे’ची आखणी आहे. यंदा हा उत्सव स्त्रीकेंद्री असला तरी, जेरी पिंटोसारखा अतिशय संवेदनशील लेखक-अनुवादक, स्त्रियांच्या अनेक प्रतिमा कवितांतून मांडणारे ज्येष्ठ गुजराती कवी सीतांशु यशश्चंद्र आदींना या उत्सवात स्थान आहे.

दुख धीटपणे मांडणे, त्याला वाचा फोडणे ही संघर्षांची पहिली पायरी असते, हे ओळखून बेबी हलदर या लेखिकेचा खास गौरव यंदा केला जाणार आहे. या लेखिकेचा समावेश पहिल्याच दिवशी संध्याकाळी साडेपाचच्या ‘द बोल्ड, द ब्युटिफुल अँड द डेअरिंग..’ या परिसंवादात- राणा अयूब, मीनाक्षी रेड्डी माधवन्, नलिनी जमीला आणि नंदिनी सुंदर या लेखिकांसह आहे. संघर्षशील लिखाण स्वतबद्दल असलं तरी स्वतपुरतं नसतं, हेच त्यातून दिसेल. अन्य परिसंवादांत अनुवादाबद्दलची चर्चा दरवर्षीप्रमाणे होणारच आहे, पण यंदाच्या ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ विजेत्यांपैकी पाच भाषांतल्या पाच लेखिकांशी गप्पावजा चर्चा, पुरुषांच्या नजरेतून स्त्री-साहित्य, भारतीय चित्रपटांतील आणि नाटकांतील स्त्री-चित्रणाविषयी दोन निरनिराळय़ा चर्चा, ‘इंग्रजीत लिखाण मुक्तिदायी की बांधून ठेवणारं?’ या विषयावर ऊहापोह.. असं वैविध्यही आहे. इथंही शोभा डे दिसतील; पण हा लिटफेस्ट ग्लॅमरचा नव्हे. चित्रपटकार अडूर गोपालकृष्णन यांच्या निगराणीखाली वाढलेला हा उत्सव मुंबईचं बहुभाषकत्व आणि साहित्यप्रेम यांनाच यंदाही वाहिलेला असेल!