साहित्याच्या ‘नोबेल पारितोषिका’साठी अनेकदा चर्चा असते मिलान कुंदेरा यांच्या नावाची.. अशा ९१ वर्ष वयाच्या आणि साहित्यगुणांनीही ज्येष्ठच लेखकाला कुठल्याशा चेक प्रजासत्ताक नावाच्या देशातला फारसा चर्चेतही नसलेला ‘फ्रान्झ काफ्का पुरस्कार’ मिळाला, तर त्याचं काय एवढं?

– हा प्रश्न कुंदेरा माहीत असलेल्यांना अजिबात पडणार नाही. हेच चेक प्रजासत्ताक जेव्हा अविभाजित झेकोस्लोव्हाकिया होतं, तेव्हा तिथल्या सत्ताधारी (कम्युनिस्ट) पक्षाचा अवमान म्हणजे ‘देशद्रोह’च केल्याचं मानून कुंदेराला परागंदा व्हावं लागलं होतं (यापुढे कुंदेरा यांच्या नावाचा उल्लेख अधूनमधून ‘अरेतुरे’त असेल, ते आदरार्थी एकवचन मानावं). कुंदेरा यांच्या देशाने त्यांना नाकारल्यामुळे १९७५ पासून ते पॅरिसमध्येच राहात होते, पुढे फ्रेंच नागरिकत्वही मिळालं. अगदी अलीकडे (बहुधा २०११ वगैरे) त्यांच्या ब्रनो या मूळ गावानं त्यांना ‘अनिवासी नागरिकत्व’ बहाल केलं, पण ते तद्दन प्रतीकात्मकच- कारण कुंदेरा काही तिथं गेले नाहीत, उलट ‘मी फ्रेंच साहित्यकार आहे’ असं आग्रहीपणे म्हणू लागले. देश-काळाच्या सीमा मिलान कुंदेरा यांच्या साहित्यानं नक्की ओलांडल्यात, पण देशाला मुकलेला एक लेखक पुन्हा त्याच देशातून दिलं जाणारं एक पारितोषिक आनंदानं स्वीकारतो, तेही जाडजूड दहा हजार डॉलरचं पारितोषिक असतं, ही सुखद बातमी नव्हे काय?

हो आहे; पण तेवढय़ानं काही कुंदेरा यांच्या जीवनाची अखेर सुखान्त वगैरे होत नाही. सुखान्तिका नसतात कधीच, हेच तर कुंदेरानं आपणा साऱ्या वाचकांना शिकवलंय! त्याच्या कादंबऱ्या कधी आनंदी वा दु:खद प्रसंगानं संपत नाहीत.. उलट ते प्रसंग वाचकाला विचारात पाडणारे, मानवी आयुष्यातल्या विरोधाभासांचा विस्मय वाटू लागेल असे असतात. आयुष्यातून ‘दैव’ पूर्णत: वगळलं तरी दुर्विलास उरतातच, हे कुंदेराच्या कादंबऱ्या सांगतात. ‘कधी कधी प्रारब्ध हे मृत्यूआधीच संपलेलं असतं,’ अशा अर्थाचं एक वाक्य त्याच्या ‘द जोक’ या पहिल्या कादंबरीत आहे.

कुणालाही प्रारब्ध, नशीब वगैरे नसतंच- ते सारं झूट आहे- अशी जाणीव जोरदार असतानाच्या काळात लिहिलं गेलेलं हे वाक्य आहे, हेसुद्धा लक्षात घ्या. या ‘जोक’ कादंबरीचा नायक अभावितपणे सत्ताधारी (कम्युनिस्ट) पक्षाचा अवमान करतो. निमित्त असतं, या अवघ्या १९ वर्षांच्या नायकानं त्याच्याच वयाच्या मैत्रिणीशी सलगी वाढवण्यासाठी लिहिलेल्या विनोदी वाक्यांचं! हा विनोद नसून अवमानच आहे, अशी बाजू एक पक्षधार्जिणा प्राध्यापक लावून धरतो आणि नायकाला शिक्षा होणार, त्याची प्रगती विशीआधीच खुंटणार, हे पक्कं होत जातं.. पण याच दरम्यान, त्या प्राध्यापकाच्या तितक्याच पक्षधार्जिण्या पत्नीशी या पोरगेल्या नायकाचे संबंध वाढतात. शरीरसंबंध. त्यातून या मध्यमवयीन महिलेला मिळत असतं ते आपल्याऐवजी दुसऱ्याच तरुण विद्यार्थिनींमध्ये गुंतलेल्या नवऱ्यावर सूड काढल्याचं समाधान आणि नायकालाही मिळत असतो तो आपल्याला गाळात घालणाऱ्या प्राध्यापकाची कशी जिरवली याचा आनंद. ही सुडाची, आनंदाची भावना प्रत्यक्षात कितपत खरी? की, निव्वळ मानवी प्रवृत्तीच खऱ्या? पण मग या प्रवृत्ती काही प्रसंगांत, काही संदर्भातच कशा काय उचल खातात?

‘तत्त्वज्ञान, मानवी मनोव्यापार यांचे प्रश्न कुंदेरा लीलया उभे करतात’ असं समीक्षकांनी म्हणणं ठीकाय, पण इथं खुद्द वाचकालाच पडतात ना हो हे प्रश्न! प्रवृत्ती, कृती आणि स्मृती यांचा काय संबंध असतो, हा प्रश्न तर कुंदेराची कुठलीही कथात्म साहित्यकृती वाचताना पडतोच पडतो. हा प्रश्न असा नुसता वाचायला जरा कोरडा वाटेल, प्रवत्ती- कृती- स्मृती ही निव्वळ अलंकारिक आरास वाटेल, पण या प्रश्नाचा अनुभव कुंदेरा वाचलेल्या बहुतेकांना आला असावा. ते असं की मुळात, कुंदेराच एका नव्या गोष्टीबरोबर कुठली तरी जुनी, मानवी स्मृतीवर कोरली जावी अशी गोष्टही सांगत असतो. उदाहरणार्थ ‘इम्मॉर्टलिटी’ या कादंबरीत नायिकेच्या गोष्टीसोबतच अधूनमधून जर्मन महाकवी गटे याचीही गोष्ट येते; किंवा अगदी अलीकडल्या (२०१५) ‘द फेस्टिव्हल ऑफ इन्सिग्निफिकन्स’ या कादंबरीत हुकूमशहा स्टालिन आणि त्याचा विचित्र धाक, तो नाकारू पाहणाऱ्या अनेकांनी खरोखर बंड करणाऱ्याला साथच न देणं, अशी काही तरी गोष्ट सांगितली जाते. ‘इम्मॉर्टलिटी’तल्या गटेच्या गोष्टीचा कधी कधी थेटच सांधा जुळतो. काय तर म्हणे, गटेचे त्याच्या मेहुणीशी संबंध होते (नायिकेच्या नवऱ्याचेही तिच्या बहिणीशी असतात) आणि गटेच्या बायकोनं मग स्वत:च्या बहिणीला झिंज्या धरून ओढलं होतं (नायिकाही ओढते). खरं-खोटं माहीत नाही, पण प्रतिमाभंजन करून कुंदेरा गटेला माणसात आणतो आणि साध्या माणसांची गोष्टही गटेइतकीच महत्त्वाची का असू नये, अशी प्रश्नवजा खात्री देतो. पण ‘द फेस्टिव्हल ऑफ इन्सिग्निफिकन्स’ मधला स्टालिन कशाला येतो नेमका? – सत्तेचा मद, हिंसा आदी विकारी भाव हे मानवाला आपण ‘क:पदार्थ’ आहोत, बिनमहत्त्वाचे आहोत असा न्यूनगंड मनुष्यजन्माचा अविभाज्य भाग म्हणून असतो, याची आठवण देणारी ताजी गोष्टसुद्धा कुंदेरा सांगतो आहे, म्हणून?

कुंदेरा कधीच अंतिम निष्कर्ष काढत नाही. तो वाचकाला ढवळून काढतो. आतासुद्धा, चेक प्रजासत्ताकाचं ते पारितोषिक (तेही काफ्काच्या नावाचं!) स्वीकारल्यामुळे कुंदेराची जीवनकथा सुखाची होत नाही, ती ‘नोबेल’ आता -आशा सोडल्यावर- समजा खरंच मिळालं, तरीही सुखान्त होणार नाही. ‘सत्ते’च्या जाणिवेतून व्यक्तीवर जे जे ताण आणले जातात, त्या सर्वाच्या विरुद्ध आवाज कुंदेरानं प्रत्येक कादंबरीतून, प्रत्येक कथेतून उठवलाय. आणि नेमके आत्ता हे ताण सर्वच देशांत वाढलेत. सत्ता राष्ट्रप्रमुखांकडेच आहे, असंही नाही- ती एखाद्या इंटरनेट सेवादार म्हणवणाऱ्या कंपनीकडेही असेल. ती आहे, तो कुंदेराच्या गोष्टीचा सुखान्तही होणार नाही आणि ती गोष्ट संपणारही नाही.