पंकज भोसले

हारुकी मुराकामीने जपानी भाषेत लिहिलेल्या एका कथेचे ‘रीमिक्स’ म्हणून हिडेओ फुरोकावाने कादंबरी लिहिली.. ‘रीमिक्स’ आहे म्हटल्यावर ती कादंबरी, आणि आधीची कथा आणखीच खपली. बरे, हे जपानपुरते न राहता इंग्रजीतही येऊन तिथेही वाचकपसंतीचे ठरले.. मुराकामी नि फुरोकावा यापेक्षा किती सोपी नावे मराठीत असतात; पण मराठीजनांच्या साहित्याबद्दल अशी चर्चा का नाही होत?

‘ज्या वकुबाचा समाज, त्या वकुबाचे साहित्य’ या निकषांवर जेव्हा मराठी साहित्याचा विचार केला जाईल, तेव्हा गेल्या शंभर वर्षांतील आपण थोर-थोर मानत असलेल्या कलाकृतींचे जगाच्या पटलावरील स्थान शून्यासम असल्याचे लक्षात येईल. पारतंत्र्यातील आपल्या कथासाहित्यात तरुणाईच्या प्रेमात देश-धर्म-अस्मिता यांच्यावरील प्रीतीला अबाधित स्थान होते. स्वातंत्र्योत्तर काळात जनमानसाने आत्मसात केलेल्या भ्रष्टाचाराचे रूपडे, जातिधारणांतून होणारे न्याय-अन्यायाचे सोहळे आणि तंत्रज्ञानाला आत्मसात करताना ‘लिमिटेड माणुसकी’ची होत जाणारी अवस्था साहित्यातून जोरकसपणे प्रगट होत होती. मात्र जागतिकीकरणाच्या वाढलेल्या कक्षेत जगण्यात आलेल्या कोलाहलामध्ये मराठीत साहित्यनिर्मितीची बाब हाच एक चमत्कार होता. भवतालाला अचूक पकडणारी नवी कथन परंपराही या काळात घडली. तरीही जगभरातील वाचकांना आकृष्ट करण्यात आपण कमी पडलो. मात्र, याच जागतिकीकरणाच्या गाडय़ावर स्वार होऊन लोकसंख्येने मराठी जनतेहून थोडय़ाअधिक प्रमाणात असलेल्या जपान, दक्षिण कोरिया, उत्तर युरोपातील फिनलंड, नॉर्वे इतकेच नाही तर कॅरेबियन बेटांवरच्या साहित्यिकांनीदेखील आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवली. यावर ‘साहित्याची श्रेष्ठता ही तिच्या सीमाभेदनाच्या यश-अपयशावर ठरत नसते,’ असा तोकडा युक्तिवादही आपल्याकडे होऊ शकेल.

अर्थात, गेल्या काही दशकांत मराठीतून इंग्रजीमध्ये साहित्य पोहोचविण्याची कामगिरी आपण केली. जी. ए. कुलकर्णी यांच्यापासून ते किरण नगरकर आणि मकरंद साठे यांच्यापासून ते सचिन कुंडलकर आंतरराष्ट्रीय वाचकपीठापर्यंत पोहोचले. पण या लेखकांच्या कलाकृतींना आधीच इथल्या मातीत सर्वमान्यता किंवा वाचकपसंती मिळालेली आहे का? जीएंच्या नकारात्मक सृष्टीपेक्षा पुलं-वपुंच्या आसऱ्यात तणावमुक्तीचा साहित्यस्वर्ग शोधण्यात मराठी वाचकाच्या साऱ्या इयत्ता संपलेल्या असतात. बाकी नगरकर न झेपणाऱ्या आणि साठे, कुंडलकर यांचा प्रदेश अनाकलनीय ठरविलेल्या इथल्या साहित्यभूमीत गेली पाच-सहा दशके कादंबरीत ‘पांडुरंग सांगवीकर’च्याच बंडखोरी आवेशातील नायकांचे ‘रीमिक्स’ डोकावत राहतात. वाचक आणि लेखकही साहित्याबाबत महत्ततेची आपली घट्ट कसोटी बदलू इच्छित नसल्याने इथल्या कथानाविकांची मजल समुद्रापार जात नाही, सीमाभेदन करण्यात यशस्वी होत नाही.

मराठी लोकसंख्येच्या दहापटींनी कमी खानेसुमारी (फक्त ५७ लाख) असलेल्या नॉर्वेमधील कार्ल ऊव्ह क्नॉसगार्डच्या सहा आत्मकथनपर कादंबऱ्या त्या देशात लाखांच्या आवृत्त्यांनी खपल्यानंतर जगात लोकप्रिय होतात. जपानच्या हारुकी मुराकामीवर विदेशीवादाचे आरोप त्याच्या मायदेशातूनच होतात. पण मराठी माणसांहून थोडीच अधिक लोकसंख्या असलेल्या त्या देशात त्याच्या प्रत्येक नव्या जपानी भाषेतील कादंबरी खरेदीसाठी ग्रंथदालनात आदल्या रात्रीपासून रांग लागते. मराठी भाषकांपेक्षा जवळपास निम्मी लोकसंख्या असलेल्या दक्षिण कोरियात यंग-हा किम या सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या लेखकाची वर्णी ‘टेड टॉक’मध्ये कलेचे जगण्यातील महत्त्व विशद करण्यासाठी लागते. ‘ज्या वकुबाचा समाज, त्या वकुबाचे साहित्य’ हे या ठिकाणीही वापरता येऊ शकते. थोडक्यात, ज्या देशांमध्ये कथासाहित्याला गांभीर्याने घेतले जात आहे, ते प्रगतही आहेत आणि इतर औद्योगिक वस्तूंसोबत जगाला साहित्याचीही निर्यात करीत आहेत. आपण फक्त ‘अस्मितांची शोभायात्रा’ मिरवण्यात मश्गूल आहोत.

जपानी ‘रीमिक्स’ कादंबरी..

सरमिसळ किंवा ‘रीमिक्स’ ही उत्तरआधुनिक लोकप्रिय संगीताशी सर्वाधिक निगडित असलेली संकल्पना साहित्यात पूर्वीपासून होती. शेक्सपीअर, काफ्का आणि हेमिंग्वे यांना गिरविणाऱ्या लेखकांची फौज बरीच मोठी आहे. अलीकडच्या काळात ‘फॅन फिक्शन’ या प्रकाराने मूळ कथेच्या रूपांतरणाने नवलेखकांचा वर्ग तयार झाला. ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’सारखी- ‘ट्वायलाइट’ कादंबरी मालिकेवर लिहिली गेलेली- ‘फॅन फिक्शन’ मूळ कलाकृतीइतकीच गाजली.

जपानच्या हिडेओ फुरोकावा या लेखकाची ‘स्लो बोट’ ही लघुकादंबरी (अनुवाद : डेव्हिड बॉयड, प्रकाशक : पुष्किन प्रेस, पृष्ठे : १२८, किंमत : ९२४ रुपये) गेल्या दोन वर्षांपासून जगाचे लक्ष वेधून घेत आहे. ही कादंबरी स्वतंत्र असल्याचा दावा झाला असता, तरी तिच्या गाजण्यात आणि अनुवादाद्वारे निर्यात होण्यात अडथळा आला नसता. पण ही कादंबरी हारुकी मुराकामी याच्या ‘अ स्लो बोट टु चायना’ या १९८० साली लिहिल्या गेलेल्या कथेचे ‘रीमिक्स’ असल्याचे जाहीर करीत लेखकाने प्रसिद्ध केली. बहुतांश वाचकांनी मुराकामीच्या मूळ कथेचे झालेले ‘पांडुरंग सांगवीकरीकरण’ हुडकण्यासाठी ती हातात घेतली अन् या संपूर्णपणे भिन्न असलेल्या ‘रीमिक्स’ कादंबरीवर पसंतीची मोहर उमटवली. मुराकामीने त्याच्या कथेत उभारलेला पसारा आणखी पुढे नेत हिडेओ फुरोकावाची कथानौका नव्या शक्यतांचा शोध घेते.

‘एलिफंट व्हॅनिशेस’ या संग्रहातील मुराकामीच्या ‘अ स्लो बोट टु चायना’ या कथेचा निनावी नायक त्याला भेटलेल्या तीन चिनी व्यक्तींचे दाखले देत आपल्या कथातत्त्वात वाचकाला जखडून ठेवतो. जपानच्या सीमेजवळच्या एका प्राथमिक शाळेत सक्तीने काही काळ शिकताना समोर आलेला चिनी शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना उमेदवारीच्या नोकरीत प्रेमात पाडणारी चिनी तरुणी आणि शाळेत एकाच वर्गात असलेला चिनी विद्यार्थी या त्या तीन व्यक्ती. यापैकी सहपाठी चिनी विद्यार्थी अनेक वर्षांनी चिनी विश्वकोश विक्रेता बनल्यानंतर अचानक उभा ठाकतो, त्याच्याशी संवाद हा कथेचा महत्त्वाचा घटक. मुराकामीच्या अनेक कथांप्रमाणे घटना-प्रसंगांच्या परस्परसंबंधी साखळीला आणि कथाव्यवहारात लोकप्रिय असलेल्या ‘ओ-हेन्रीआटिक’ शेवटाला टाळणारी ही कथा आहे. तरीही त्याच्या अनेक कथांप्रमाणे अस्वस्थतेची बीजे वाचकमनात पेरण्याची ताकद तिच्यात आहे. ‘अ स्लो बोट टु चायना’ नावाचे एक जॅझ गीत आहे आणि हा शब्दप्रयोग ‘प्रचंड मोठा काळ’ असे सुचवण्यासाठी वाक्प्रचारासारखा वापरला जातो. या शीर्षकाद्वारे मुराकामी निष्णात नावाडी बनून कथेला अभिप्रेत किनारा शोधून काढतो.

हारुकी मुराकामीचे लेखन आणि त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यातील घटना त्याच्या लेखनातून सातत्याने उमटल्या आहेत. ‘स्लो बोट’ लिहिणाऱ्या हिडेओ फुरोकावाने मुराकामी आधी स्वत:मध्ये पूर्णपणे मुरविलेला दिसतो. पण कथेचे ‘रीमिक्स’ करताना त्याने आपल्या कादंबरीत विनोद, विडंबन, उपहास आणि टीका यांचा पुरेपूर वापर केलेला आहे. पहिल्याच टप्प्यापासून तो ‘अ स्लो बोट टु चायना’चे ‘पांडुरंग सांगवीकरीकरण’ न होण्याची दक्षता घेतो. यातला निनावी निवेदक नायक एकोणीसशे सत्तर-ऐंशीच्या दरम्यान टोक्यो शहरात जन्मलेला आणि आयुष्यभर टोक्योबाहेर पडू न शकलेला तरुण. मुराकामीच्या नायकासारख्या चिनी व्यक्तींच्या आठवणींचा कोलाज येथे नाही. येथे निवेदकाच्या आयुष्यात आलेल्या तीन मुलींची गोष्ट आहे. यातील प्रत्येकीशी त्याचे विविध कारणांमुळे असफल ठरलेले प्रेमप्रकरण आले आहे. अन् त्या प्रत्येक वेळी टोक्योतून बाहेर पडण्याची संधी गमावल्याची खंतही आहे. हिंदूीतील धर्मवीर भारती यांच्या ‘सूरज का सातवाँ घोडा’ या कादंबरीत माणिकमुल्ला या नायकाच्या असफल प्रेमकहाण्यांशी ‘स्लो बोट’मधील अ-प्रेमकथांचे थोडेबहुत साम्य आहे. पण ‘स्लो बोट’मधील नायक हा १९८५ ते २००० च्या दशकातील टोक्यो आणि जगाचे भान जपत प्रचंड वेगाने आपल्या कथेची नौका चालवितो.

भवतालाची पकड..

मुराकामीच्या नायकाने ‘अ स्लो बोट टु चायना’ लिहिली गेली तोवर- म्हणजे १९८० सालापर्यंत- पाहिलेला आणि अनुभवलेला जपानी भवताल आणि हिडेओ फुरोकावाच्या नायकाने ‘स्लो बोट’मध्ये अनुभवलेले टोक्योपुरते जग यांच्यात प्रचंड फरक आहे. ऐंशीच्या दरम्यान जपानी कुटुंबव्यवस्थेत झालेला बदल हिडेओ फुरोकावा अत्यंत थोडय़ाशा परिच्छेदांमधून दाखवतो. वयाच्या बाराव्या वर्षी ‘नापासांच्या शाळेत’ सुधारणा करण्यासाठी त्याची रवानगी केली जाते. तेथेच त्याला त्याची पहिली प्रेयसी भेटते. अविरत बडबडीमुळे तिच्यावर नापासांच्या शाळेत इतरांनी बहिष्कार टाकलेला असतो. सांभाळण्यास असमर्थ असलेल्या आईमुळे अथक सिनेमा पाहून ती समाजात मिसळण्याचे हरवून बसली असते. या मुलीची अविरत बडबड समजून घेऊन तिला माणसांत आणण्याची प्रक्रिया निवेदक पूर्ण करतो. तिला परग्रहवासी असल्यासारखे करून टाकणाऱ्या तिच्या सिनेजगातून तिला बाहेर काढतो. काही दिवस चालणाऱ्या या प्रेमकहाणीचा शेवट निवेदकाने अभूतपूर्व सिनेमॅटिक बनविला आहे.

त्याला भेटणारी दुसरी प्रेयसी मानवी भूगोलाचे धडे आपल्या शरीरापासून द्यायला सुरुवात करते. पुढे हीच प्रेयसी त्याला टोक्योमधून बाहेर पडण्याची एक संधी देत आपल्यासोबत दुसऱ्या शहरात येण्याचे आवाहन करते. आजूबाजूचा सगळा विचार सोडून नायक तिला भेटण्यासाठी विमानतळाकडे कूच करतो. मात्र वाहतुकीच्या अडथळ्यांनी त्याचे विमानतळावर पोहोचणे लांबते आणि दुसऱ्या प्रेमकहाणीलाही शोकान्त लाभतो.

कॅफे चालविणाऱ्या मुराकामीच्या आयुष्यात लेखन ही चमत्कारासारखी घडलेली घटना आहे, तसेच त्याची काही पुस्तकेही चमत्कारासारखी तयार झालेली आहेत. १९९५ मध्ये टोक्यो रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गात झालेल्या विषारी वायुहल्ल्याविषयीचे पत्र एका मासिकाच्या कार्यालयात जुन्या गठ्ठय़ात सापडले. त्या आधारावर या घटनेतील पीडितांचा माग घेत त्याने रिपोर्ताज लेखनाची मालिका केली. ‘अण्डरग्राऊण्ड’ हे त्यातून तयार झालेले पुस्तक. हा तपशील का महत्त्वाचा, हे कादंबरीत कळेल..

फुरोकावाच्या तिसऱ्या प्रेमकहाणीचा आणि कादंबरीचा पसारा मुराकामीच्या आयुष्यातील संदर्भानी फुलविण्यात आला आहे. निवेदक एक कॅफे उघडतो. तिथे त्याच्या लाडक्या आणि निष्णात आचाऱ्याला अचानक कामावर येणे अवघड वाटू लागते. आपल्या जागी तो पाककुशल बहिणीला कॅफेत धाडतो. सुरी चालविण्यात अद्भुत हुकमत असलेली ही शाळकरी मुलगी निवेदकाच्या प्रेमात पडण्याचे आणखी एक उपकथानक कादंबरीत सुरू होते. या प्रेमकहाणीलाही सुखान्त मिळत नाही. विचित्र घटनेने त्याचा कॅफेच उद्ध्वस्त होतो.

जपानमध्ये घडलेल्या नव्वदच्या दशकातील बहुतांश संदर्भाना फुरोकावा आपल्या कादंबरीमध्ये सामावून घेतो. एके दिवशी अचानक या निवेदकाचा एक जुना शाळकरी मित्र त्याला भेटतो. ‘काकू नोहारा’ या टोपणनावाने तो प्रसिद्ध मासिकांमध्ये कथालेखन करीत असतो.

कादंबरीतील असफल प्रेमघटनांच्या दरम्यान जपानी भवतालाला पकडणाऱ्या ‘काकू नोहारा’च्या लघुकथा अत्यंत चपखलपणे मांडल्या आहेत. ‘द पेप्सी वार्स’, ‘स्टारबक्स ओव्हरकिल’ अशी काही त्या काकू नोहाराच्या लघुकथांची नावे. तिकडे अमेरिकेत १९७० च्या दशकात रेमण्ड काव्‍‌र्हर ज्या पद्धतीच्या कथांद्वारे समाजात पसरत जाणारी अनैतिकता आणि खुजेपण रंगवून सांगत होता, त्या शैलीतील काकू नोहाराच्या कथा फुरोकावाने उभ्या केल्या आहेत. टोक्योजवळील विषारी वायुहल्ल्याची घटनादेखील काकू नोहाराच्या कथेद्वारे येथे येते. शीतपेय आणि आंतरराष्ट्रीय कॉफी दुकानांनी वेढा घातलेल्या पिढीची सांगड घालताना भाषिक प्रयोग, चित्रपट संदर्भ आणि जगातील महत्त्वाच्या घटनांचा टोक्योमधील साक्षीदार म्हणून फुरोकावाचा निवेदक वाचकाला आवडू लागतो. ‘अ स्लो बोट टु चायना’चा वाचनानंद आणि ‘स्लो बोट’चा अनुभव हे दोन्ही निष्णात कथानाविकांचे जागतिक पटलावरचे अबाधित स्थान स्पष्ट करतात.

‘ज्या वकुबाचा समाज, त्या वकुबाचे साहित्य’ या निकषांवर भविष्यात मराठी कथानौका सुधारेल, याची वाट पाहण्याची गरजच जगात कित्येक देशांतील कथानाविकांनी मिटवून टाकली आहे. तेच सध्यासाठी बरे म्हणावे लागेल.

pankaj.bhosale@expressindia.com