माव्‍‌र्हल कॉमिक्सला ‘स्पायडरमॅन’ या सुपरहिरोद्वारे जगभरात पोहोचविणारे स्टॅन ली यांचे आत्मचरित्र त्यांच्या सुपरहिरोंसारखेच सुपरपुस्तक आहे. स्टॅन ली यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी अथांग माहितीस्रोत उपलब्ध असतानाही, हे पुस्तक त्यांच्या आयुष्यातील नव्या अज्ञात प्रदेशात घेऊन जाते अन् त्यासाठी ग्राफिक नॉव्हेल्स किंवा कॉमिक बुकची वाचनसवय असायची गरज राहात नाही. सुपरहिरो अभ्यासकांसोबत सामान्यांनाही आवडेल अशा सचित्र आत्मचरित्राच्या अशा प्रकारच्या पहिल्याच पुस्तकाविषयी..
पंकज भोसले
भारतात १९८०च्या दशकात जन्मलेल्या पिढीला माव्‍‌र्हल कॉमिक्सच्या सुपरव्यक्तिरेखेचा पहिला परिचय चित्रवाणीच्या पडद्यावरून झाला. उपग्रह वाहिन्या तेव्हा दाखल झाल्या नव्हत्या. रविवारी दूरदर्शनच्या एकमेव वाहिनीवर आलटून-पालटून मुंबई-दिल्ली केंद्राचे कार्यक्रम लागत. तेव्हा ‘चिमणराव..’ संपल्यावर लगेचच सुरू होणारी ‘स्पायडरमॅन’ ही सचेतचित्रांची (अ‍ॅनिमेशन) मालिका यच्चयावत घरांतील मुलांची लाडकी बनली होती. अवाक्षर न कळूनही त्यातील विचित्र दिसणाऱ्या स्पायडरमॅनच्या शत्रूसमान जीवांसोबत हाणामाऱ्या, हातांतून सुटणाऱ्या हुकमी काळ्या किंवा पांढऱ्या दोऱ्या आणि त्यांना झोकात लटकत या इमारतीवरून त्या इमारतीवर जाणाऱ्या स्पायडरमॅनच्या नवनव्या पराक्रमांचे चाहते बनणे सोपे होते. मूळची १९६८ची ही टीव्हीवरील मालिका अमेरिकेत लोकप्रिय झाली नाही, पण भारत आणि इतर आशियाई राष्ट्रांमध्ये माव्‍‌र्हल कॉमिक्स व त्याचा निर्माता स्टॅन ली याचे घाऊक कुतूहल मात्र तिने तयार झाले. पुढे कार्टून-अ‍ॅनिमेशन वाहिन्या आणि लाइव्ह अ‍ॅक्शन सिनेमा यांतून ‘स्पायडरमॅन’ची प्रतिमा बहरत जाताना इथल्या कॉमिक्स-नवसाक्षर पिढीला जगभरात चालणाऱ्या सचित्र कथांच्या अद्भुत आणि अजस्र जगाची कल्पना करता आली. भारतात अलीकडे अ‍ॅनिमेशन आणि कॉमिक बुकचा प्रसार होत असला तरी ग्राफिक नॉव्हेल पूर्ण मुरलेला साहित्य प्रकार नाही. याला कारण आपल्याकडे रामायण, महाभारतसारख्या मिथकांतून सुपर शक्ती असलेल्या अनेक व्यक्तींनी समाजमनावर कृत्रिम सुपरहिरोंची गरज शिल्लक ठेवली नाही (आठवाव्यात: अमर चित्र कथा). याउलट संस्कृती, इतिहास नसलेल्या अमेरिकेमध्ये आधी गुलामगिरी, मग युद्धत्रस्त वातावरण यांतून विसाव्या शतकात पराक्रमी-करामती व्यक्तींच्या गाथांची आवश्यकता भासू लागली. चित्रपट आणि इतर कलांमधून ती काही अंशी पुरी होत असतानाच कॉमिक बुकमधील सुपरहिरो दाखल झाले आणि अवघी अमेरिका सुपरहिरोमय झाली. या सर्व सुपरहिरोंमध्ये आधी अलौकिक शक्ती असलेल्या डीसीच्या सुपरमॅन आणि बॅटमॅनचे वर्चस्व राहिले. त्यानंतर माव्‍‌र्हल कॉमिक्सच्या सामान्य माणसातून तयार होणाऱ्या सर्व गुण-अवगुण आणि समस्यांनी युक्त कॅप्टन अमेरिका, फॅण्टॅस्टिक फोर, हल्क, थोर आदी सुपरहिरोंची एकामागून एक मालिकाच सुरू झाली आणि स्पायडरमॅनच्या रूपाने ती जगभरात स्थिरावली.
हे सारे वाटते तितके सहज सोपे नव्हते. त्यात सेन्सॉरशिपपासून कलात्मक अडचणींपर्यंत, उद्योगसमूहांच्या धोरणांपासून ते भवतालापासून स्फूर्ती घेण्याच्या स्पर्धेत टिकण्याचे मोठे आव्हान होते. माव्‍‌र्हल कॉमिक्स आणि त्यांच्या सुपरहिरोंना नवे परिमाण देणाऱ्या स्टॅन ली या पुरुषोत्तमाने ते आव्हान यशस्वी पेलून दाखविले. अजूनही कार्यरत असलेल्या स्टॅन ली यांची यशोगाथा ‘अमेझिंग, फॅण्टॅस्टिक, इन्क्रिडेबल’ या सचित्र आत्मचरित्रात साकारली आहे. माव्‍‌र्हलच्या यंदाच्या पंचाहत्तरीनिमित्ताने दस्तुरखुद्द स्टॅन ली यांनीच, पीटर डेव्हिड आणि कॉलिन डोरान या चित्रकार-सहकाऱ्यांच्या मदतीने या सचित्र आत्मचरित्रातून कल्पनांचा भला मोठा पेटारा उघडून दिला आहे.
मंदीकालीन गरिबीतील लहानपण अभिजात साहित्याच्या वाचनात घालविलेल्या स्टॅन ली यांनी तरुणपणी केलेल्या विचित्र कामांची यादी अचंबित करणारी आहे. ऑफिसांमध्ये जेवण पोहोचविणारा डबेवाला, वृत्तपत्रात महत्त्वाच्या व्यक्तींवर ते हयात असतानाच मृत्युलेख तयार करून ठेवणारा लेखनिक, रुग्णालयाच्या प्रसिद्धी विभागात खुशामती लिहिण्याची कसरत करणारा पांढरपेशा, पाटलुणी बनवून देणाऱ्या कारखान्यात कामगार, थिएटरमध्ये लोकांना इच्छित जागी बसण्यास मदत करणारा दरवान, अशा एकाचा दुसऱ्याशी सुतराम संबंध नसलेल्या कामांनंतर नातेवाईकांच्या प्रकाशन संस्थेमध्ये ते एकदाचे चिकटले. तिथे कॉमिक बुक बनविणाऱ्या विभागात ‘कॅप्टन अमेरिका’ या सुपरहिरोला त्यांनी जन्माला घातले. हा काळ कॉमिक बुकच्या अगदीच बाल्यावस्थेचा होता. युद्धकाळात देशप्रेमी साहित्य, संगीत आणि चित्रपटांचा पूर आलेला असताना कॉमिक कथांकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी निश्चितच नवकल्पनांची गरज होती. त्यात महायुद्धात सैन्यामध्ये भरती होऊन टेहळणीच्या जबाबदारीवर अडकलेल्या स्टॅन ली यांना नशिबाने सैन्याच्याच फिल्म ट्रेनिंग डिव्हिजनमध्ये बढती मिळाली. तेथेही त्यांनी कलात्मक कामगिरी करून दाखविली. युद्धानंतर पुन्हा नातेवाइकांच्या कॉमिक बुक व्यवसायात त्यांनी पाय ठेवला, तो तेथे इतिहास घडविण्यासाठीच.
पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे, तो सुपरहिरो जन्मकहाण्यांचा; पण त्याहून अधिक रोचक आहे, तो सरकारी र्निबधांनी या व्यवसायात आणलेल्या अडचणींना स्टॅन ली यांनी कसे परतवले, हा भाग. अमली पदार्थविरोधी संदेश देणाऱ्या कॉमिक बुकमध्ये ‘ड्रग्ज’ हा शब्द आहे, म्हणून त्यावर बंदी घालणाऱ्या सरकारी नियमांच्या विरोधात त्यांनी लढाई करून नियमांत बदल करून घेतले.
सिनेमा, समाज यांचा पगडा कलेवर कसा होतो, हे दाखविणारे त्यांचे सुरुवातीचे काम आहे. तत्कालीन वेस्टर्न देमारपटांचा प्रभाव, युद्धोत्तर मानसिकतेचे प्रतिबिंब त्यांच्या कामात पडले होते. आपला प्रत्येक सुपरहिरो पापभीरू सामान्य व्यक्ती आणि स्वत:च्या अडचणींशी लढत तयार होताना त्यांना दाखवायचा होता. प्रतिस्पर्धी असलेल्या डीसी कॉमिक्सच्या हिरोंप्रमाणे त्यांच्याकडे जन्मजात अलौकिक शक्ती नव्हती. त्यांतून फॅण्टॅस्टिक फोर, डॉक्टर डूम तयार झाले. त्यांच्या लोकप्रियतेतून आणखी नव्याची मागणी झाली, तेव्हा हल्कचा जन्म झाला. रसायनांच्या परिणामामुळे हल्क तयार झाला असला, तरी त्याच्यामागे असलेल्या साहित्यिक संदर्भाची नोंद पाहिली तर आश्चर्य वाटायला लागते. ‘हंचबॅक ऑफ नोत्रदाम’, ‘मिस्टर जेकिल अ‍ॅण्ड मिस्टर हाइड’मधील प्रमुख व्यक्तिरेखांसारखा एखादा सुपरहिरो बनवावा असे त्यांना वाटत होते, पण त्याचे निश्चित रूप कसे असेल, याबाबत ते स्वत:च साशंक होते. पुढे अनेक प्रयत्नांतून साकारलेला हल्क हा राखाडी रंगाचा सुपरहिरो त्यांनी तयार केला. राखाडी रंगात छपाई करण्यात येणाऱ्या अडचणींमधून त्या सुपरहिरोचा रंग हिरवा किंवा लाल करावा लागणार होता. स्टॅन ली यांनी हिरव्या रंगाची निवड केली, कारण त्याच वेळी त्यांच्या डोक्यात एका नव्या सुपरहिरोची कल्पना ठाण मांडून होती आणि लाल रंगाचे कपडे त्यावर चढवायचे होते. अर्थातच त्या लालरंगी स्पायडरमॅन या सुपरहिरोने त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेले, पण हल्कलाही अडचणीतून निर्माण झालेला त्याचा हिरवा रंग लोकांना पूर्णपणे रुचला.
या आत्मचरित्रामध्ये थॉर, अ‍ॅण्ट मॅन, आयर्न मॅन आणि त्यांच्या सर्वच सुपरहिरोंच्या जन्मकहाण्यांबद्दल नवे काही तरी सापडतेच, पण या दरम्यानच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही प्रकाश पडतो. आर्थिक डबघाईला आलेली कंपनी, ती सावरणारे स्टॅन ली आणि त्यांचे सहकलाकार, प्रत्यक्ष चित्र काढणारे कलावंत-लेखक यांना मिळणारे तुटपुंजे मानधन आणि निनावी राहण्याची शिक्षा यातून मार्ग काढत त्यांनी माव्‍‌र्हलला दाखविलेल्या चांगल्या दिवसांची कहाणी येते. आत्मचरित्राचा उत्तरार्ध हा लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही जमिनीवर घट्ट पाय रोवलेल्या स्टॅन ली नामक माणसाची जाणीव करून देतो. बीटल्सच्या पॉल मॅक्कार्टनी यांच्यापासून अमेरिकी अध्यक्ष बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू. बुश (ज्यु.) यांच्याशी भेटीचे गमतीदार किस्से, हॉलीवूडमधील जॉर्ज क्लूनीपासून ‘ब्रॅन्जेलिना’ दाम्पत्य यांच्याशी साधलेला संवाद आणि ‘टायटॅनिक’ बनविण्याआधी जेम्स कॅमेरॉन यांनी ‘स्पायडरमॅन’ बनविण्याबाबत दाखविलेली उत्सुकता यांचा अप्रकाशित तपशील येथे आलेला आहे. ‘स्पायडरमॅन सिनेमाची संपूर्ण पटकथा तयार करून कॅमेरॉन यांची निष्फळ ठरलेली तयारीच त्यांना बुडत्या जहाजाच्या विषयाकडे घेऊन गेली असेल’, अशा खुमासदार टिप्पणीने संपणारा किस्सा त्यांनी येथे रंगविला आहे. उभी हयात डीसी कॉमिक्सशी स्पर्धा करणारे सुपरहिरो तयार करण्यात गेलेल्या स्टॅन ली यांनी डीसीसाठी आग्रहास्तव काम का केले, याचा उलगडा येथे करून देण्यात आला आहे. शिवाय आपल्या सर्व सुपरहिरोंचे लाड केल्याबद्दल त्यांच्या चित्रकारांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वाचे त्यांनी ऋण मानले आहेत.
स्टॅन ली यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अथांग माहिती मायाजालापासून ते डझनावारी पुस्तकांमध्येही सापडू शकते. तरीही या पुस्तकाची गरज यासाठी की, खुद्द स्टॅन ली यांच्या आयुष्यातील आजवर अज्ञात असलेल्या अनेक बाबी येथे नमूद आहेत. त्यांच्या वैयक्तिक प्रेमकहाणीपासून ते माव्‍‌र्हल कॉमिक्समधील अंतर्गत अडचणी, राग-लोभ-गंड जपणारे कलाकार, प्रत्येक दशकातील समाजस्थितीत झालेला बदल आणि त्यानुरूप सुपरहिरोंनी घेतलेला जन्म, खूप गाजलेल्या सुपरहिरोंची खूप फसलेली सिनेरूपांतरे, कॉमिक बुकचा अजब अर्थव्यवहार, त्याच्या संग्रहाला नंतर आलेले मोल आणि या साहित्य प्रकाराविषयी असलेली स्टॅन ली यांची अपार आस्था यांच्याविषयी वाचकाला नवे ज्ञान प्राप्त होते. कॉमिक बुकच्या शब्दमर्यादेतच संपूर्ण आयुष्याचा अनंत तपशिलांनी भरलेला पट उभारणे हे अशक्य वाटू शकते; पण स्टॅन ली यांच्या अशक्य सुपरहिरोंसारखेच हे सुपरपुस्तक आहे.. मिठाईच्या वा चॉकलेटच्या डब्याइतके झगमगीत रंगीत मुखपृष्ठ असलेले! कॉमिक बुक आणि ग्राफिक नॉव्हेल यांच्या अभ्यासकांना संदर्भासाठी ते मोलाचे वाटेल; पण कार्टून आणि अ‍ॅनिमेशन यांचा ‘ओव्हरडोस’ झालेल्या आजच्या १२ ते १५ वयाच्या पिढीलाही वाचनलालसेची उभारी आणणारे हे पुस्तक आहे.

‘अमेझिंग, फॅण्टॅस्टिक, इन्क्रिडेबल’ एम. स्टॅन ली
प्रकाशक: सायमन अ‍ॅण्ड शूस्टर
पृष्ठे : १९२, किंमत : ८९९ रु.
pankaj.bhosale@expressindia.com