सौरभ कुलश्रेष्ठ

मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर जनसमुदायाच्या साक्षीने झालेला शपथविधी हा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतरचा दुसरा शपथविधी होता. त्याआधी पहिला शपथविधी आणि मग राजीनामे, या घटना बहुतेकांना आठवत असतील, पण त्या घटनांमागच्या घडामोडी काय होत्या? हे सांगू पाहणाऱ्या तीन पुस्तकांची ही ओळख..

अज्ञाताबाबत उत्सुकता हे मानवी मनाचे एक लक्षण. त्यातूनच समोर घडणाऱ्या घटनांचा कार्यकारणभाव समजून घेण्याची, त्याचे गूढ उकलण्याची धडपड सुरू असते. विज्ञानापुरतेच हे खरे आहे असे कुणाला वाटेल, पण सामाजिक घडामोडींबद्दलही हीच जिज्ञासा, हीच धडपड अनेकांना कार्यरत करते. अगदी राजकारण-सत्ताकारण असेल तरी घडणाऱ्या घडामोडींमागील थरारक वास्तव जाणून घेणे ही तर साऱ्यांचीच इच्छा असते. ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’ या अरुण साधू यांच्या पुस्तकांनी व नंतर ‘सिंहासन’ चित्रपटाने वास्तवातील राजकारणाचे अज्ञात पदर रंजकपणे उलगडून सांगितल्यापासून राजकीय डावपेच जाणून घेण्याची एक वेगळीच ओढ महाराष्ट्रात वाढू लागली असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. ‘सिंहासन’मधील थराराच्या तोडीस तोड सत्तास्पर्धेच्या व सत्तांतराच्या थरारक घटना राजकारणात नंतरही घडल्या. पण गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर या ३६ दिवसांत महाराष्ट्रात जे घडले ते केवळ अभूतपूर्व होते. ‘अशक्य ते शक्य करून दाखवण्याची कला म्हणजे राजकारण’ अशा आशयाचे एक वाक्य ‘सरदार’ चित्रपटात वल्लभभाई पटेलांची भूमिका साकारणाऱ्या परेश रावल यांच्या तोंडी आहे. त्याची प्रचीती महाराष्ट्राला व देशाला मागच्या वर्षी आली. त्यामुळे बऱ्याच काळानंतर खऱ्या पात्रांच्या नावानिशी आणि घडामोडींसह या समकालीन इतिहासाचा वेध घेणारी तीन पुस्तके  वाचकांसाठी उपलब्ध झाली. वर्षपूर्तीनिमित्त त्या तिन्ही पुस्तकांचा ऊहापोह करणे औचित्याचे व रंजक ठरते.

‘चेकमेट : हाऊ द बीजेपी वन अ‍ॅण्ड लॉस्ट द महाराष्ट्र’ या पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्या पुस्तकाला एक वेगळे महत्त्व आहे. कारण २३ नोव्हेंबरच्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार युतीबाबतचे भाकीत सूर्यवंशी यांनी त्याआधीच तीन दिवस केले होते! त्या वेळी राजकारण्यांनी नेहमीप्रमाणे ते नाकारले; पण घडले तसेच. त्यामुळे सूर्यवंशी यांच्या पुस्तकात या सत्तांतराचे अनेक तपशील उघड होतात, पडद्याआडच्या घडामोडींसह विविध ठिकाणी काय सुरू होते याची तपशीलवार वर्णने येतात. एकूण १८ प्रकरणांतून या सत्तांतराची कहाणी सांगताना सूर्यवंशी यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच्या- म्हणजे मुंबई गुजरातऐवजी महाराष्ट्राला मिळण्यापासून राज्यातील ठळक राजकीय घडामोडी, विविध नेत्यांचे राजकारण यांची नोंद घेतली आहे. त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे गुजरातमधून आलेले व केंद्रात सर्वसत्ताधीश झालेले नेते मराठी माणसांच्या अधिकारांसाठी लढणारा पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेचे पंख छाटण्याचा का प्रयत्न करतात, हे अंतरंग सूर्यवंशी इंग्रजी वाचकांसाठी उलगडून सांगतात. त्यातूनच पुढे शिवसेनेशी २०१४ मध्ये आयत्या वेळी युती तोडणे, २०१७ मध्ये मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्याची भाजपची ईर्षां व त्यातून कशीबशी वाचलेली शिवसेना, शिवसेनेला केंद्रात दिलेली वागणूक व राज्यात त्यांच्या मंत्र्यांची केलेली कोंडी असा घटनापट दाखवत- शिवसेना का दुखावली, याची पूर्वपीठिका सूर्यवंशी यांनी मांडली आहे. प्रश्न केवळ मुख्यमंत्रिपदाचा नव्हता, तर शिवसेनेच्या अस्तित्वाचा आणि भवितव्याचा होता, हा मुद्दा त्यातून सूर्यवंशी अधोरेखित करतात. तीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि राज्यातील काँग्रेस नेते या सर्वासमोरच अस्तित्व टिकवण्याचा प्रश्न होता. त्या सर्वाना भाजपने २०१४ ते २०१९ मध्ये केलेल्या राजकारणाला उत्तर देण्याची संधी हवी होती. ती निकालांनी या नेत्यांना दिली आणि देवेंद्र फडणवीस यांना ‘पेरले ते उगवले’ या धर्तीवर आपल्या वर्तनाची किं मत मोजावी लागली, हा सुधीर सूर्यवंशी यांच्या पुस्तकाचा सारांश. इतकेच नव्हे, तर फडणवीस यांचा कारभार कसा एककल्ली होता, शिवसेनेला आणि सहकारीमंत्र्यांनाही ते मोजत नव्हते, प्रशासनातही खासगी लोकांची प्रमाणाबाहेर भरती करत त्यांनी व्यवस्था कशी उद्ध्वस्त केली, याचे दाखले सूर्यवंशी यांनी काही सनदी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहेत. याउलट, नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कसे सर्वाचे ऐकून घेतात, अधिकारी व मंत्र्यांचे काही प्रतिकू ल मत असेल तर त्यांनाही ते मांडण्याची संधी देतात, हे पुन्हा सनदी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगत ठाकरे हे फडणवीस यांच्यापेक्षा जास्त लोकशाहीवादी आहेत, असे सुधीर सूर्यवंशी यांनी सूचित केले आहे.

देवेंद्र फडणवीस-अजित पवार युतीबद्दलही, ‘ती घटना अकस्मात घडलेली नाही, तर त्यास एक मोठा इतिहास आहे व तो २०१७ मध्ये होता होता फिस्कटलेल्या राष्ट्रवादी-भाजप युतीच्या चर्चेपर्यंत जातो’ असा एक किस्साही सूर्यवंशी यांनी सांगितला आहे. शरद पवार यांनीच राज्यातील राजकारणाचे फासे मनाजोगते पडण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी राष्ट्रपती राजवटीला कशी अप्रत्यक्ष मदत के ली आणि नंतर एकाच वेळी भाजप आणि शिवसेना-काँग्रेस यांच्याशी संवाद सुरू ठेवला याचे तपशीलही सूर्यवंशी सांगतात. २० नोव्हेंबरच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी-शरद पवार भेटीत अखेर पवार यांनी मोदी यांना युतीसाठी नकार कळवला. त्यानंतरही, आधीपासून सुरू असलेली अजित पवारांबरोबरची चर्चा निर्णायक टप्प्यावर नेण्यासाठी फडणवीस यांनी कशा वेगवान हालचाली केल्या व अजित पवारांच्या ३५-३७ समर्थक आमदारांशी कसा संवाद साधत शपथविधीपर्यंत प्रवास केला, याची माहितीही मिळते. ‘फडणवीस-पवार या शपथविधीची कल्पना शरद पवार यांना होती व मध्यरात्रीनंतरच त्यांची याबाबत खात्री झाल्याने अजित पवारांसह खूप कमी जण जातील याची खातरजमा झाल्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास पवार शांतपणे झोपी गेले’ असा दावा सूर्यवंशी यांनी के ला आहे.

अनेक बहारदार व रंजक किस्से संबंधित पक्षाच्या आमदार-नेत्यांशी बोलून सूर्यवंशी यांनी वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. जयपूरमध्ये पिठलं-भाकरी मागणारा आमदार, सर्वाना पत्त्यांत हरवून मोठी कमाई करणारा आमदार, आपापल्या शिक्षण संस्थांमध्ये तेजीत असलेले अभ्यासक्रम व पुढच्या योजनांची आखणी करणारे आमदार आणि या सर्वाच्या पलीकडे लोकशाही व भाजपची (म्हणजे मोदी /फडणवीस यांची) राजवट व त्याचे विपरीत परिणाम याबाबत सैद्धांतिक चर्चा करणारे मोजके  आमदार अशा अनेक गुजगोष्टी वाचकाला या पुस्तकातून कळतात. अजित पवारांच्या बंडानंतर सूत्रे हाती घेऊन अधिकारवाणीने बोलणाऱ्या सुप्रिया सुळे व इतर ज्येष्ठ नेत्यांमध्ये कुरबुर झाल्याचा किस्सा सांगताना अप्रत्यक्षपणे, ‘शरद पवारांनंतर अजित पवार यांनाच राष्ट्रवादीचे नेते महत्त्व देतात’ असे सूर्यवंशी यांनी सूचित केले आहे. या सत्तांतराची पार्श्वभूमी, घटनाक्रमाचे तपशील व पडद्यामागील घडामोडींचा थरार उलगडून सांगत अनेक किश्श्यांचा भरगच्च ऐवज सुधीर सूर्यवंशी यांचे हे पुस्तक वाचकांना देत असल्याने ते या घटनेवरील सर्वात महत्त्वाचे पुस्तक ठरते.

ओघवते समालोचन

जितेंद्र दीक्षित यांचे ‘३५ डेज : हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्र चेंज्ड फॉरेव्हर इन २०१९’ हे पुस्तक म्हणजे एखाद्या सामन्याच्या समालोचनासारखे आहे. पूर्वी आतासारखा टीव्ही घराघरांत नसल्याने व प्रत्येक सामन्याचे थेट प्रक्षेपण होत नसल्याने आदल्या दिवशीच्या सामन्याचे डोळ्यांसमोर चित्र उभे राहील असे वर्णन त्याच्या विश्लेषणासह वाचकांसमोर मांडण्याचे कौशल्य आदल्या पिढीच्या क्रीडापत्रकारांमध्ये होते. त्यातून सामना पाहिल्याचा आनंद वाचकांना मिळत असे. दीक्षित यांच्या पुस्तकाचा ढाचा तसा आहे. सहजसोपी व ओघवती भाषाशैली ही त्यांच्या पुस्तकाची मोठी ताकद आहे. ज्यांनी या सत्तांतराच्या काळात त्याबाबतच्या बातम्या, मुलाखती फारशा पाहिल्या नाहीत किंवा अजिबात पाहिल्या नाहीत, त्यांच्यासाठी त्या सार्वजनिक माहितीचे संकलन व त्याचे विश्लेषण या पुस्तकातून एका ठिकाणी उपलब्ध होते. एकूण १७ प्रकरणांमधून त्यांनी या सत्तांतराची कहाणी कथन के ली आहे. भाजप-शिवसेना युती तुटण्यासाठी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या घटनांचा चांगला आढावा दीक्षित यांनी घेतला आहे. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून खेचण्याचे प्रयत्न व आरे कारशेडच्या निमित्ताने पर्यावरणाचा विषय घेऊन पुढे आलेल्या आदित्य ठाकरे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत ठाकरेंच्या नव्या पिढीच्या खच्चीकरणाच्या भाजपच्या खेळीमुळे ठाकरे कुटुंबाच्या मनावर कसा ओरखडा उमटला, याची ‘मार्मिक’ नोंद या पुस्तकात आहे. त्यातून निकालानंतर सत्ता आलेली असतानाही भाजपबरोबर राहण्यापेक्षा वेगळा विचार करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कसा घेतला, यासारख्या प्रश्नांची उत्तरे समजण्यास मदत होते. पुस्तकाचा समारोप राज ठाकरे यांच्यावरील प्रकरणाने करून दीक्षित यांनी, या सत्तांतराचा परिणाम म्हणून राजकारण कोणत्या दिशेने जाणार यावर बोट ठेवले आहे. ‘मराठी व हिंदुत्ववादी’ ही शिवसेनेची ओळख आता धुरकट करून ती जागा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्यापावी अशा रीतीने वाव देत भाजप नवीन युतीकडे वाटचाल करत असल्याचे सूतोवाच दीक्षित यांनी केले आहे. त्या दृष्टीने, गेल्या वर्षभरात मनसेची वाटचाल कशी झाली, याचा विचार महाराष्ट्रीय वाचक आपसूकच करू लागतील.

‘हीच ती वेळ’चा अन्वयार्थ..

कमलेश सुतार यांचे ‘३६ डेज : ए पॉलिटिकल क्रॉनिकल ऑफ अ‍ॅम्बिशन, डिसेप्शन, ट्रस्ट अ‍ॅण्ड बिट्रेयल’ हे याच विषयावरील आणखी एक पुस्तक. या पुस्तकासाठी कमलेश सुतार यांनी डायरीलेखनाचे प्रारूप वापरले आहे. दिवस पहिला, दुसरा.. स्थळ आणि वेळ अमुकतमुक अशा रीतीने या सत्तांतर नाटय़ातील घटनाक्रम ते उलगडत नेतात. वृत्तवाहिनीचे पत्रकार असल्याने लोकांच्या डोळ्यांसमोर चित्र उभे राहावे या दृष्टीने त्यांनी लिखाण केले आहे. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय घडले याचा आढावा सहजपणे पुस्तक वाचण्याची इच्छा व घडामोडींचा घटनाक्रम जाणून घेणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतो. हे सत्तांतर अकस्मात घडलेले नाही, हा मुद्दा ते ‘हीच ती वेळ’ या शिवसेनेच्या निवडणूक प्रचारातील घोषणेकडे लक्ष वेधत अधोरेखित करतात. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे ‘तिघांचे सरकार शक्य’ असल्याचे विधान, ऐन दिवाळीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बारामतीमध्ये जाऊन घेतलेली शरद पवार यांची भेट, संजय राऊत यांनी वाघाने घडय़ाळ बांधल्याचे दर्शवणारे व्यंगचित्र ट्वीट करणे अशा अनेक छोटय़ा-छोटय़ा गोष्टींचा उल्लेख करत, निकालानंतरच कशा रीतीने प्राथमिक तयारी सुरू झाली होती याचे सूतोवाच सुतार यांनी केले आहे. ‘महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युतीचे सरकार वाचवण्यासाठी केंद्राने- म्हणजेच मोदी व शहा यांनी पुढाकार घेतला नाही’ हे सांगताना, ‘सरकार वाचवण्यासाठी फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेल्यावर त्यांना मोदी यांनी भेटीची वेळ दिली नाही’ या महत्त्वाच्या गोष्टीवरही सुतार यांनी बोट ठेवले आहे. अजित पवार राष्ट्रवादीत परत येण्यास त्यांच्या काकू  व शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याशी झालेली भेट निर्णायक ठरली, त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून निर्णयावर शिक्कामोर्तब केले, असा दावाही सुतार यांच्या पुस्तकात आहे.

इतर दोन पुस्तकांत या सत्तांतरास फडणवीस यांची कार्यपद्धतीही जबाबदार असल्याचे विश्लेषण ठामपणे येते. मात्र कमलेश सुतार घटनाक्रम मांडण्यास पसंती देऊन, फडणवीस यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यापासून कटाक्षाने दूर राहतात. दोन पक्षांमधील आणि नेत्यांमधील हे राजकारण आहे व त्यात भाजपचे नेते या नात्याने फडणवीस आपली भूमिका पार पाडतात, असाच त्यांचा सूर आहे. अजित पवार यांच्या स्वगृही परत जाण्यामुळे फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद औटघटकेचे ठरले तरी ‘ऑपरेशन कमळ’ अद्याप संपलेले नाही, यावर मात्र सन २०२० च्या जानेवारी-फेब्रुवारीत प्रकाशित झालेल्या या तिन्ही पुस्तकांच्या लेखकांचे एकमत दिसून येते.

ही तिन्ही पुस्तके पत्रकारांनी लिहिलेली आहेत, हे लक्षात घेतल्यास निष्कर्ष, दावे, अनुसंधान जोडणे या साऱ्या कथनप्रकारांचा आधार घेत ही तिन्ही पुस्तके रंजक किंवा गोष्ट उलगडल्यासारखी का आहेत, हेही समजेल. ‘बिगरभाजपवाद’ या एकाच मुद्दय़ावरील आघाडय़ांची सुरुवात महाराष्ट्राने करून दिली असे म्हणता येते का, किंवा पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसनेत्यांना ‘आपलेसे’ करण्याची निवडणुकीपूर्वीची फडणवीस यांची रणनीती भाजपला तारक ठरली की मारक, यांसारख्या प्रश्नांची चर्चा अभ्यासकांनीच केलेली बरी, याची जाणच जणू या तिन्ही पुस्तकांना आहे. पण अभ्यासकांनाही उपयोगी पडतील, असे काही तपशील मात्र या पुस्तकांनी सर्वानाच पुरवले आहेत!

swapnasaurabh.kulshreshtha@expressindia.com