निखिल बेल्लारीकर nikhil.bellarykar@gmail.com

दिल्लीकेंद्री इतिहासलेखनामुळे दक्षिणेचा, विशेषत: यादवोत्तर-शिवपूर्वकालीन दख्खनचा इतिहास दुर्लक्षित राहिला. परंतु दख्खनचा बहुपेडी, विविधरंगी इतिहास उत्तरेच्या मोठय़ा साम्राज्यांइतकाच महत्त्वाचा आहे, याची आठवण करून देणाऱ्या रोचक पुस्तकाविषयी..

bjp manifesto titled modi ki guarantee
समोरच्या बाकावरून : खोटी खोटी गॅरंटी..
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

ट्रोजन युद्धात ग्रीक बाजूचे नेतृत्व करणाऱ्या आगामेम्नॉन राजाच्याही अगोदर अनेक शूरवीर होऊनही होमरसारखा कवी नसल्याने त्यांचे स्मरण राहिले नाही, असे प्रसिद्ध लॅटिन कवी होरेस म्हणतो. यादवोत्तर-शिवपूर्वकालीन दख्खनचा इतिहास वाचतानाही काहीसे असेच होते. या ‘साडेतीनशे वर्षांच्या काळरात्रीत’ बहुतांशी मुस्लीम राजसत्ता बळजोर असल्याने यातील अनेकविध पैलूंकडे हिंदुत्ववाद्यांचे दुर्लक्ष होते, तर तथाकथित ‘राष्ट्रीय’ इतिहासकारांची दृष्टी दिल्ली आणि मुघलांपलीकडे जात नाही. परिणामी हा ‘खिलजी ते शिवाजी’ काळ जनसामान्यांच्या इतिहासविषयक जाणिवेत बव्हंशी नसतोच. ही त्रुटी बरोबर ओळखून मनु पिल्लै या तरुण लेखकाने हे पुस्तक लिहिले आहे.

हे पुस्तक वाचताना प्रसिद्ध इतिहासकार रिचर्ड ईटन यांच्या ‘अ सोशल हिस्टरी ऑफ डेक्कन’ या पुस्तकाची आठवण येणे अपरिहार्य आहे. परंतु दोहोंमधला महत्त्वाचा फरक म्हणजे, ईटन यांचे पुस्तक हे आठ व्यक्तिरेखांच्या माध्यमातून दख्खनच्या इतिहासातील बदलांचा आढावा घेते, तर प्रस्तुत पुस्तकात फक्त दोन व्यक्तिचित्रे आलेली असून प्रामुख्याने राजवटींचा इतिहास दिलेला आहे. लेखकाचे हे दुसरेच पुस्तक असून याआधीच्या त्यांच्या त्रावणकोर राजघराण्याशी संबंधित पुस्तकाला साहित्य अकादमी युवा पुरस्कारही मिळालेला आहे.

साधारणपणे इ.स. १३०० पासून इ.स. १६३० पर्यंतचा हा काळ प्रामुख्याने ‘बंडखोर सुलतानां’चा काळ आहे. दक्षिणेतील जुन्या हिंदू साम्राज्यांचा नाश, दिल्लीचे वर्चस्व झुगारून दक्षिणेत एकाच वेळी तुल्यबळ अशा बहामनी व विजयनगर साम्राज्यांची स्थापना, पुढे बहामनी साम्राज्याची झालेली पाच शकले, विजयनगरचा अस्त, मुघलांच्या राक्षसी लष्करी सामर्थ्यांशी दख्खनने दिलेली चिवट झुंज आणि मराठेशाहीचा उदय हा स्तिमित करणारा अफाट घटनाक्रम अवघ्या दोनेकशे पानांत बसवण्याचे शिवधनुष्य लेखकाने उत्तमरीत्या पेलले आहे.

खिलजी ते बहामनी-विजयनगर

अल्लाउद्दीन खिलजीचा गुलाम मलिक काफूरच्या रेटय़ाखाली दक्षिणेतील जुनी हिंदू राज्ये नष्ट झाली. मुहम्मद तुघलकाने राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणल्यानंतर काही काळातच त्याला पुन्हा दिल्लीस प्रयाण करणे भाग पडले. त्यातच त्याविरुद्ध अनेक उठाव होऊन शेवटी बहामनी साम्राज्याची स्थापना झाली. हसन गंगू बहामनी हा त्याचा संस्थापक. प्रथम गुलबर्गा आणि नंतर बीदर या दोन राजधान्यांमधून एकूण १८ सुलतानांनी राज्य केले. फिरोझशाह, अहमदशाह यांसारखे शूर आणि जाणते सुलतान महमूद गावानसारखे प्रभावी व्यापारी आणि शासक आदींमुळे बहामनी साम्राज्य खूप बलशाली झाले. महमूद गावानच्या काळात प्रथमच गोव्यापासून कांचीपुरमपर्यंतच्या विस्तीर्ण प्रदेशात बहामनी प्रभाव वाढला. पुढे शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे बहामनी साम्राज्याचे तब्बल पाच तुकडे झाले. बहामनी साम्राज्याची ही गाथा लेखकाने त्यातील अनेक चढ-उतारांसकट विस्तृतपणे लिहिली आहे.

वायव्य भारतातले मार्ग दिल्लीच्या ताब्यात असल्याने बहामनी साम्राज्याचा तत्कालीन इस्लामी विश्वाशी मुख्य संपर्क हा समुद्रमार्गे होता. यातूनच दख्खनच्या सर्वच राज्यांवर दूरगामी परिणाम करणाऱ्या ‘दखनी-अफाकी’ दुफळीची सुरुवात झाली. ती दुफळी सर्व सुलतानी राज्ये नष्ट होईपर्यंत कायम होती. ‘अफाकी’ म्हणजे बहुतांशी इराणी वंशाचे व शियापंथी मुसलमान; तर ‘दखनी’ म्हणजे भारतीय व हबशी वंशाचे, बहुतांशी सुन्नीपंथी मुसलमान होत. दख्खनमधील प्रत्येक राज्यात आपले प्रभुत्व कायम राखण्याकरिता दोन्ही समूहांमध्ये कायम चुरस असे. बादशहाच्या कलाप्रमाणे राज्याचे धार्मिक, शासकीय आणि भाषिक धोरणही ठरत असे. या दुफळीने दख्खनच्या इतिहासाला दिलेल्या कलाटण्या लेखकाने खुबीने वर्णिलेल्या आहेत.

दख्खनच्या उत्तर भागात बहामनी साम्राज्य घडत-बिघडत असताना तुंगभद्रेच्या दक्षिणतीरी एक वेगळेच नाटय़ आकारास येत होते. हरिहर आणि बुक्क या हिकमती बंधुद्वयीने इ.स. १३३६ साली हम्पी येथे विजयनगर साम्राज्याचा पाया घातला. सुरुवातीच्या काही वर्षांतच विजयनगरने मदुरैच्या सुलतानांवर हल्ला करून ते राज्य नष्ट केले. रायचूरचा सुपीक दोआब, कृष्णा, गोदावरी आणि कावेरी या नद्यांचे सुपीक त्रिभुज प्रदेश, प्रचंड मोठी किनारपट्टी व त्यातील कैक बंदरे विजयनगरच्या ताब्यात असल्याने त्याची ताकद खूप वाढली. तत्कालीन भारतातील सर्वात प्रबळ हिंदू राज्य विजयनगर असल्याने ते स्वत:ला ‘हिंदुराय सुरत्राण’ अर्थात हिंदूंमधील सुलतान असे म्हणवून घेत. संगम, साळुव, तुळुव आणि अराविडु अशा एकूण चार राजघराण्यांनी इथे राज्य केले. यांपैकी सर्वात प्रबळ व प्रसिद्ध राजा म्हणजे तुळुव घराण्यातील कृष्णदेवराय हा होय. सुरुवातीची काही वर्षे बहामनी राज्याला नजराणा पाठवणारे विजयनगरचे अधिपती नंतर दख्खनच्या सुलतानांना आपल्या लहरीप्रमाणे नाचवू लागले. विजयनगरबद्दलचे अनेक समज-गैरसमज, त्यांची कारणे व त्यांचे निराकरण या पुस्तकात संक्षिप्तपणे, परंतु नेमके केले आहे.

बहामनी साम्राज्याच्या पाच तुकडय़ांपैकी आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही ही विशेष बलशाली राज्ये ठरली. याच काळात पोर्तुगीजांचाही भारतात प्रवेश झाला. विजापूर, अहमदनगर आणि हैदराबाद ही शहरे तेव्हा विशेष भरभराटीला आली. बहुतांशी ही राज्ये शियापंथी इस्लामचे आचरण करीत. यांत दखनी-अफाकी पक्षांचा संघर्ष असूनही स्थानिक हिंदूंना प्रशासनात महत्त्व होते. यांची कैक फर्मानेही फारसीसोबत मराठी, कन्नड किंवा तेलुगुसारख्या स्थानिक भाषांमध्ये असत. सांस्कृतिकदृष्टय़ा इराण व ऑटोमन साम्राज्यांकडून आपल्या राज्यांना मान्यता मिळवणे त्यांना गरजेचे वाटे. नातेसंबंधांनी आपसात जोडलेले असूनही राजकीय स्वार्थापोटी एकमेकांशी कायमच संघर्ष चालू असे. यात विजयनगरचीही यथावकाश मदत घेतली जाई. विजयनगर आणि दख्खनी शाह्यांमधील परस्परसंबंध लेखकाने बारकाईने चितारल्यामुळे तत्कालीन राजकीय परिस्थितीचा नेमका अंदाज येतो.

अनेक लढाया आणि वाटाघाटींनंतर दख्खनच्या इतिहासात प्रथमच चारही शाह्या एकत्र येऊन त्यांनी इ.स. १५६५ साली तालिकोटा येथे मोठी लढाई करून विजयनगरचा पराभव केला आणि राजधानी हम्पीची यथेच्छ लुटालूट केली. यानंतरही विजयनगर साम्राज्य कैक वर्षे अस्तित्वात असले, तरी त्याचा पूर्वीचा दरारा मात्र पूर्ण नष्ट झाला होता. परंतु दख्खनच्या सुलतानांसाठी हा क्षणिक दिलासा होता; कारण तोवर मुघलांची नजर दक्षिणेकडे वळू लागली होती. अकबरपुत्र दानियालने व स्वत: अकबराने बराच प्रयत्न करूनही दख्खनवर मुघलांचे वर्चस्व काही प्रस्थापित होत नव्हते. कारण इब्राहिम आदिलशहा आणि चांदबिबीसारखे चतुर आणि प्रबळ शासक. नवरा इस्माईल आदिलशहा मरण पावल्यानंतर चांदबिबी माहेरी अहमदनगरला निघून गेली, तर विजापूरची जबाबदारी इस्माईलचा पुतण्या इब्राहिमने सांभाळली.

इब्राहिम आणि अकबर या व्याह्यंमध्ये अनेक बाबतींत साम्य होते. दोघेही विद्या व कलांचे भोक्ते असून धार्मिक बाबतीत बहुतांश मवाळ होते. त्यांच्यामधील फरकही रोचक आहेत. अकबराने स्वत: नवीन धर्मच चालू केला होता, तर इब्राहिम सरस्वतीचा भक्त होता. अकबराने मुघल साम्राज्याची प्रशासकीय भाषा फारसी केली, तर इब्राहिमने मराठीला प्राधान्य दिले. मुघल दरबाराप्रमाणेच विजापूरमध्येही अनेक कलाकार व शास्त्रज्ञांची कदर होत असे. इब्राहिमच्या चौफेर योगदानाची अंशत: कल्पना पुस्तकातील त्याचे तपशीलवार चरित्र वाचून येते.

इ.स. १५९४-९५ च्या सुमारास मुघलांनी निजामशाहीवर हल्ला केला, तेव्हा चांदबिबीच्या नेतृत्वाचा कस लागला. ती एक चतुर राजकारणी आणि निर्भीड सेनापतीही होती. निजामशाही लष्कराच्या जोडीला आदिलशाही आणि कुतुबशाही लष्करही आले, तेव्हा मुघलांना तह करण्यावाचून पर्याय राहिला नाही. परंतु हा विजय क्षणभंगुर ठरला. कारण १५९९ साली मुघलांनी निजामशाहीवर निकराचा हल्ला करून राजधानीचा पाडाव केला. तेव्हा अंतर्गत दुफळीमुळे चांदबिबीचा खूनही करण्यात आला. या पुस्तकातील चांदबिबीचे संक्षिप्त चरित्र वाचतानाही तिच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही.

चांदबिबीनंतर निजामशाहीची धुरा सांभाळली मलिक अंबरने. त्याचे मूळ इथिओपियन नाव होते चापू. गुलाम म्हणून विक्री होत होत अखेर तो अहमदनगरला पोहोचला. अल्पावधीत त्याने दख्खनच्या तीनही शाह्यंमध्ये नोकरी करून एक सेनापती म्हणून आपला जम बसवला. हळूहळू त्याच्या हाताखाली हजारोंची फौज जमा झाली. चांदबिबीबरोबरच निजामशाही संपली असे वाटत असतानाच, त्याने राजघराण्यातलाच आणखी एक मुलगा गादीवर बसवून त्याच्या नावे राज्यकारभार सुरू केला, आणि दख्खनी सुलतानांची मोट बांधून मुघलांना सळो की पळो करून सोडले.

१६१० साली, म्हणजेच शिवजन्माच्या २० वर्षे आधी, त्याने चक्क सुरतेची लूटही केली. गनिमी काव्याचा मुघलांविरुद्ध त्याने केलेला वापर अतिपरिणामकारक होता. मुघल बादशाह जहांगीरचा त्याच्यावर इतका राग होता, की अंबरच्या धडावेगळ्या डोक्यात तो बाण मारतो आहे असे चित्रही त्याने काढून घेतले. जे त्याला प्रत्यक्ष कधीच करता आले नाही, त्याची भरपाई त्याने चित्रातून केली! अशा अनेक बारकाव्यांमधून लेखकाने मलिक अंबरच्या व्यक्तिमत्त्वाचे नेमके पैलू उभे केले आहेत.

त्याच्या काळापासूनच अनेक मराठा घराण्यांचा उदय झाला. वेरुळचे भोसले घराणेही त्यांपैकीच एक. मलिक अंबरचा मृत्यू झाल्यानंतरची दहाएक वर्षे शहाजीराजांनी निजामशाही जगवली. तिथून पुढचा इतिहास मराठी वाचकाला उत्तमरीत्या परिचित असल्यामुळे त्याची पुनरुक्ती इथे अप्रस्तुत आहे. पुस्तकात यापुढचा इतिहास त्रोटकपणे का होईना, येतो. मराठय़ांच्या उदयाचेही संक्षिप्त वर्णन तिथे आहे.

सरतेशेवटी..

हे पुस्तक वाचताना अनेक अज्ञानजन्य गैरसमज धडाधड गळून पडतात. विशेषत: मुसलमानांचा अनिर्बंध सत्ताविस्तार आणि त्यापुढे हतबल हिंदू हे चित्र साफ खोटे असल्याचे यातील अनेक उदाहरणांवरून दिसून येते. दख्खनी शाह्यंमध्ये कैक हिंदू उच्च पदावर होते. मादण्णा-आक्कण्णा हे कुतुबशहाचे प्रधान असोत किंवा आदिलशाही व निजामशाहीतील अनेक मराठे सरदार असोत; हिंदूंच्या आर्थिक, राजकीय व लष्करी साहाय्याविना कोणताही सुलतान आपले राज्य प्रस्थापित करू शकला नाही. हिंदूंना वापरून घेणारे सुलतान चलाख म्हणावे, तर त्यांचा कैकवेळा सपाटून पराभव करणारे, त्यांना आपापसात झुंजवणारे विजयनगरसारखे शक्तिशाली हिंदू साम्राज्यही होतेच. इब्राहिम आदिलशाहसारखा राजा हिंदू धर्माचा इतका मोठा चाहता होता, की त्याच्या मृत्युलेखावर ‘तो मूर्तिपूजक नसून मुसलमानच होता’ असा मुद्दामहून उल्लेख करणे भाग पडले. अर्थात, अशी उदाहरणे देऊन तिथे सर्वकाही आलबेल होते हे सांगणेही दिशाभूल करणे ठरेल; परंतु तत्कालीन दख्खनमधील हिंदू-मुस्लीम संबंध एकसुरी नव्हते, हा लेखकाचा मुद्दा नक्कीच विचारार्ह आहे. हिंदू-मुस्लीम संबंधाचे अनेक पदर लेखकाने तपशीलवारपणे उलगडून दाखवलेत, ते मुळातूनच वाचण्याजोगे आहेत.

दक्षिणेचा स्वत:चा बहुपेडी, विविधरंगी इतिहास उत्तरेच्या मोठय़ा साम्राज्यांइतकाच महत्त्वाचा आहे, हे वाचकाच्या मनावर ठसवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. भारताचा इतिहास दिल्लीकेंद्री ठेवण्याचे अक्षम्य पाप आजवर अनेकांनी केले. संशोधक सध्या ही घोडचूक टाळत असले, तरी जनसामान्यांच्या मनावरील या कल्पनेचे गारूड अजूनही आहे. अशा पुस्तकांमुळे त्याचा फोलपणा कळतो. मराठय़ांच्या उदयाची संदर्भचौकटही लेखकाने व्यवस्थित सांगितल्यामुळे मराठेशाहीचा उदय ही एक दैवी वा अतक्र्य घटना नसून त्यामागील काही कारणांची चांगलीच कल्पना येते. इतिहासाबद्दलच्या काही कल्पना सुस्पष्ट होणे हे या पुस्तकाचे मुख्य बलस्थान आहे.

‘रिबेल सुलतान्स : द डेक्कन फ्रॉम खिलजी टु शिवाजी’

लेखक : मनु पिल्लै

प्रकाशक : जगरनॉट

पृष्ठे: ३३६, किंमत : ५०९ रुपये