जगभरात पसरलेल्या दहशतवादाची सुरुवात कशी होत गेली आणि हा जागतिक आजार कसा पसरत चालला आहे याचे धाडसी आणि थरारक चित्रण शाम भाटिया यांनी ‘बुलेट्स अ‍ॅण्ड बायलाइन्स : फ्रॉम द फ्रंटलाइन्स ऑफ काबूल, दिल्ली, दमास्कस अ‍ॅण्ड बियाँड’ या पुस्तकात केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध दहशतवादी कारवायांचे वार्ताकन करताना पत्रकारांना जीव धोक्यात घालावा लागतो म्हणजे काय, याचे उत्तर पुस्तक वाचल्यानंतरच मिळेल. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहेच, मात्र त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विषयांचा अभ्यास करणाऱ्यांना हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
शाम भाटिया हे मूळचे भारतातील. शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेल्यावर पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी ‘भारतीय अणुबॉम्बचा विकास’ हा विषय अभ्यासासाठी निवडला होता. त्याच वेळी १९७४ मध्ये भारतात इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारत पोखरण अणुचाचणी घेण्याच्या तयारीत होता. त्या वेळी मित्राच्या सल्ल्यानुसार भाटिया यांनी या विषयावर १२०० शब्दांत वृत्तलेख लिहून ‘द टाइम्स’ या वृत्तपत्राला पाठविला. लेख छापून आल्यावर वर्तमानपत्राचे संपादक लुई हेरेन यांनी भाटिया यांना पत्रकारितेत येण्याचा पर्याय सुचविला. ‘वेस्टर्न मेल’ या वर्तमानपत्रात प्रशिक्षणाला सुरुवात झाली आणि हेच भाटिया यांचे पत्रकारितेतील पदार्पण ठरले. ‘दक्षिण आशियातील बेकायदा निर्वासित’ या विषयावर लेखमाला लिहिणाऱ्या भाटिया यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर ‘द ऑब्झव्‍‌र्हर’ या इंग्लंडमधील नावाजलेल्या वृत्तपत्रात लिहिण्याची संधी त्यांना मिळाली. इजिप्त, इस्रायल, पाकिस्तान या देशांमधील सुरक्षाविषयक घडामोडींवर लिहिता आले. इस्रायलचा लेबनॉनवरील हल्ला (१९८२), इंदिरा गांधी हत्या (१९८४) या घटनांचे वार्ताकन करणाऱ्या लेखकाने त्यानंतर संपूर्ण दशकभर कैरो, जेरुसलेम येथे राहून युद्धक्षेत्र, दहशतवादी हल्ल्यांचा फटका बसलेली शहरे आणि प्रांतांचा अभ्यास करून लिखाण केले..
..या अनुभवांवर आधारलेले ‘बुलेट्स अ‍ॅण्ड बायलाइन्स’ हे पुस्तक १५ प्रकरणांमध्ये विभागण्यात आले असून प्रत्येक प्रकरणात मध्य-पूर्वेतील विविध देशांतील दहशतवादी घटना, युद्धजन्य परिस्थिती, हत्याकांड, शीतयुद्ध यांचे सखोल वर्णन करण्यात आले आहे. या विषयावर आधीही बरीच पुस्तके लिहिण्यात आलेली असली तरी ‘पत्रकाराची धडपड’ टिपण्यात लेखक यशस्वी ठरला आहे.
पाकिस्तानचे अध्यक्ष झुल्फिकार अली भुत्तो यांच्या हत्येला एक वर्ष झाल्यानंतर भाटिया इतर वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींसह पाकिस्तानला गेले. या वेळी बेनझीर भुत्तो यांना भेटण्याचा सर्व पत्रकारांचा प्रयत्न होता. मात्र बेनझीर नजरकैदेत असल्यामुळे त्यांना भेटू देण्यात आले नाही. या वेळी बेनझीर यांना नजरकैदेत ठेवल्यामुळे लष्कर, पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यात संघर्ष सुरू होता. लेखकाने या घटनेचे वर्णन ‘लष्कराबद्दल चीड आणि भुत्तो यांना पाठिंबा’ अशी केलेली बातमी विशेष ठरली. याच काळात सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानवर केलेला हल्ला जगाचे लक्ष वेधून घेणारा ठरला. अफगाणिस्तानमध्ये प्रवास करत असताना लेखकाच्या बसवर सोव्हिएतविरोधी मुजाहिदीनांनी हल्ला करून ३५ जणांची हत्या केली. स्वत: लेखक या रक्तरंजित घटनेचा साक्षीदार होता. मात्र याच दहशतवाद्यांनी लेखकावर हल्ला न करता त्याला आठवडाभर सोबत ठेवले आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यास सांगितले. लेखकाने नकार दिल्यावर त्याला आश्चर्यकारकरीत्या सोडून देण्यात आले. मात्र या वेळी कंदहारकडे परततानाचा आणि तेथून पारपत्र नसतानाही दिल्लीला पोहोचण्याचा रोमांचक प्रसंग लेखकाने मांडला आहे.
दरम्यान, अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ता शीतयुद्धात गुंतलेल्या होत्या. त्यांनी आपापल्या फायद्यासाठी काही सशस्त्र गटांना पाठिंबा दिला. सोव्हिएत युनियनचा पाठिंबा असलेल्या काबूलमधील मुजाहिदीनांविरोधात अमेरिकेने तातडीने मोहीम उघडण्याचा निर्णय घेतला होता. याच कुरघोडीच्या राजकारणातून या दोन महासत्तांचा पाठिंबा मिळालेले सशस्त्र गट आज जगाच्या मानगुटीवर दहशतवादी म्हणून बसले आहेत. ‘हिरोज ऑफ पीस’ या प्रकरणात १९७९ मध्ये इजिप्त आणि इस्रायलमध्ये सातत्याने होणारा संघर्ष मांडला आहे. दोन्ही देशांकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात होते. या दोन्ही देशांमधील संबंध इतके बिघडले होते की, इस्रायलची राजधानी जेरुसलेममधून इजिप्तची राजधानी कैरो येथे अध्यक्ष अन्वर सादात यांची मुलाखत घेण्यास आलेला ‘संडे टाइम्स’चा पत्रकार डेव्हिड होल्डन याची विमानतळाबाहेरच हत्या करण्यात आली. १९७३ मध्ये झालेल्या इजिप्त-इस्रायल युद्धात इस्रायलच्या सैन्याने विजय मिळविला. मात्र राजकीय पटलावर इजिप्तने सरशी साधल्याचे मानले जाते. मागासलेपणा, कोलमडलेली अर्थव्यवस्था ही या युद्धातील इजिप्तच्या पराभवाची कारणे ठरली. त्यानंतर विविध पातळ्यांवर या दोन देशांमध्ये शांतता चर्चा झाल्या, मात्र या चर्चेतही युद्धाची भाषा होतीच.
१९८४ मध्ये सुवर्णमंदिरात लपलेल्या आणि खलिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची मागणी करणाऱ्या जर्नेलसिंग भिंद्रनवालेविरोधात कारवाई करण्याचे आदेश भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिले. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ नावाने ओळखल्या गेलेल्या लष्कराच्या कारवाईत भिंद्रनवाले मारला गेला. भिंद्रनवाले याच्या हत्येच्या निषेधार्थ शीख सुरक्षारक्षकांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या केल्याने संपूर्ण देश सुन्न झाला. या घटनेनंतर भारतातील घडामोडींच्या पाहणीसाठी भारतात आलेल्या लेखकाने दिल्लीतील शीखविरोधी दंगलीचा थरारक अनुभव मांडला आहे. दिल्लीत ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात शिखांची हत्या करण्यात आली होती. यातून लहान मुले, महिलाही बचावल्या नाहीत. ‘न्यूक्लिअर सिक्रेट’ या प्रकरणात अब्दुल कादिर खान यांनी नेदरलँड्सचे तंत्रज्ञान चोरून पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाला कशा प्रकारे गती दिली या घडामोडींची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. अब्दुल कादिर खान यांनी अणुतंत्रज्ञान चोरल्याची सर्वत्र चर्चा होती. या संदर्भात तीन महिने माहिती जमविल्यानंतर लेखकाने कोलिन स्मिथच्या साथीत ‘डॉ. खान यांनी इस्लामसाठी बॉम्ब कसा चोरला?’ याचा ऊहापोह करणारा लेख ‘ऑब्झव्‍‌र्हर’मध्ये छापला. या लेखामुळे डॉ. खान भडकले नसते तर नवलच. भाटिया यांनी पैशासाठी असा लेख छापल्याचा आरोप खान यांनी केला. याच कालावधीत पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांनी हे अणुतंत्रज्ञान लिबियाचा हुकूमशहा कर्नल मुअम्मर गडाफी याला पुरविले. यासाठी गडाफीने भुत्तो यांना २०० दशलक्ष डॉलर दिले. पाकिस्तानने हे अणुतंत्रज्ञान लिबियासह, इराण, इराक आणि उत्तर कोरियापर्यंत पसरविले. अमेरिकेने लवकरच डॉ. खान यांचे हे अणुजाळे उलगडले जाईल, असे जाहीर केले. मात्र डॉ. खान यांनी अणुतंत्रज्ञान चोरले नसल्याचा दावा कायम ठेवला (याच खान यांनी अगदी अलीकडे- गेल्याच आठवडय़ात ‘पाकिस्तानच्या काहुटा अणुप्रकल्पातून बॉम्बफेक झाल्यास दिल्ली उद्ध्वस्त होईल’ अशी वल्गना केली होती.).
‘पिंकी’ हे प्रकरण पाकिस्तानच्या माजी, दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो आणि लेखकाची मैत्री यांवर आधारित आहे. लंडनमध्ये शिक्षण घेत असताना लेखकाची भुत्तो यांच्याशी ओळख झाली होती! लोकशाही तत्त्वांबद्दल आग्रही असलेल्या बेनझीर यांची राजकीय कारकीर्दही आरशाप्रमाणे स्पष्ट होती, असे लेखकाचे म्हणणे असले तरी, मूर्तझा आणि फातिमा भुत्तो ही भावंडे बेनझीरवर अनेक आरोप करीत, हेही येथे नमूद आहे. १९९३ मध्ये दुबई येथे भुत्तो यांनी लेखकाची भेट घेऊन अणुकार्यक्रमाबाबत त्यांना कसे अंधारात ठेवण्यात आले याची माहिती दिली. या वेळी भुत्तो यांनी अणुकार्यक्रमातील काही घटना लेखकाला सांगितल्या. धडाडीच्या भुत्तो यांनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाची आखणी करत उत्तर कोरियाची मदत मिळविली, असे लेखक सांगतो. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, श्रीलंकेचे संरक्षणमंत्री ललित अतुलथमुडली, इस्रायलचे पंतप्रधान यित्झाक राबिन, इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात, पाकिस्तानचे लष्करशहा झिया उल-हक यांच्या हत्येच्या घटनांवर लेखकाने वार्ताकन केले आहे, तर बेनझीर यांच्या हत्येनंतर लेखकाने ‘गुडबाय, शहजादी’ हे पुस्तकच लिहिले. इराण, इराक, सीरिया या देशांतील विविध लष्करी, दहशतवादी कारवाया, अरब-इस्रायल संघर्ष लेखकाने स्वानुभवाने मांडलेला आहे. अरब राष्ट्रांतील मुस्लीम स्वत:ला ‘धर्मनिष्ठ’ मानतात. मात्र, तरीही धर्माच्या नावावर हिंसाचार घडविण्यात धन्यता मानतात, हे सत्य मांडण्यात लेखक कुठेही कमी पडलेला नाही.
पुस्तकाच्या अखेरच्या टप्प्यात लेखकाने संपूर्ण पत्रकारितेच्या कार्यकालाचा आढावा घेतला आहे. त्या आधीच्या प्रकरणांतून एवढय़ा जागतिक महत्त्वाच्या घटना सांगणाऱ्या या पुस्तकाचे स्वरूप काहीसे आत्मचरित्रात्मक आहे, असेही काहींना वाटेल. ‘मी’ काय केले हे लेखक अधूनमधून प्रत्येक प्रकरणात सांगतो हे खरे, परंतु यापलीकडे, पत्रकाराचे अनुभवकथन म्हणून याकडे पाहायला हवे. जागतिक पातळीवर विविध देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धविषयक घडामोडींचे वार्ताकन करताना लेखकाने अनेक पत्रकार मित्र गमावले, त्या अपमृत्यूंच्या कथाही पुस्तकात येतात. यावरूनच विदेशी प्रतिनिधी म्हणून पत्रकारिता करणे किती जिवावर बेतणारे आणि धोक्याचे आहे हे लक्षात येते. लेखकाने वार्ताकन केलेल्या घटना तात्कालिक असल्या तरी त्या घटनांना आज ऐतिहासिक महत्त्व आहे, हे निश्चित.

 

उमेश जाधव
umesh.jadhav@ expressindia.com

 

‘बुलेट्स अँड बायलाइन्स : फ्रॉम द फ्रंटलाइन्स ऑफ काबूल, दिल्ली, दमास्कस अँड बियाँड’
लेखक : शाम भाटिया
प्रकाशक : स्पीकिंग टायगर
पृष्ठे : २४८, किंमत : ५९९ रुपये