|| अपर्णा दीक्षित

‘ठीकच आहे’.. ‘इतकं चालायचंच’.. ‘जे आहे ते असू द्या’.. ‘मी एकटी/टा काय करू शकणार आहे’..  भारतीयांच्या ‘चलता है’ मनोवृत्तीची ही काही अभिव्यक्तीरूपं! या ‘चलता है’ मनोवृत्तीची चिकित्सा करत, तिचे दुष्परिणाम दाखवत काही निष्कर्षांपर्यंत हे पुस्तक आलं आहे. परंतु हे निष्कर्ष वाचकाला तर्काची अतर्क्य झेप घ्यायला लावतात..

समाजाची प्रगती रोखून धरणारे घटक जसे आर्थिक, समाजशास्त्रीय, राजकीय यांची गुंतागुंत असणारे असतात, तसेच ते कधी कधी वृत्तींचेही असतात. जेव्हा समान वृत्तींनी प्रभावित अनेक व्यक्ती साधारण सारखे निर्णय घेऊ  लागतात, तेव्हा संपूर्ण निर्णयप्रक्रियेचे स्वरूपच त्या ठरावीक वृत्तीच्या साच्यात बद्ध होते. ‘वैयक्तिक’ वाटणाऱ्या निवडी, निर्णयप्रक्रिया यांचे सार्वत्रिकीकरण करता येईल, इतक्या त्या वृत्ती ठळक होतात. अशीच एक कळत-नकळतपणे जोपासली गेलेली भारतीय वृत्ती म्हणजे- ‘चलता है’! तीच ‘चलता है इंडिया : व्हेन ‘इट्स ओके!’ इज नॉट ओके’ या पुस्तकाचा मुख्य विषय बनून येते.

पुस्तकाच्या प्रस्तावनेतच लेखकाने ‘चलता है’ला संदर्भानुसार अर्थाच्या किती छटा असू शकतात, हे दाखवून दिलं आहे. इतकं मोठं रेल्वेचं जाळं असणाऱ्या आपल्या देशात महिन्याला काही अपघात- ‘चलता है’ (ठीकच आहे); गुणवत्तेची फारशी पर्वा न करता प्रसिद्ध कंपन्यांच्या उत्पादनांची नकली उत्पादने बाजारात आणणे आणि खपणे- ‘चलता है’ (इतकं पुरेसं आहे- गुड इनफ); प्रत्येक शहरात झोपडपट्टय़ा अळंब्यांसारख्या वाढू दे-  ‘चलता है’ (जे आहे ते असू दे, नाही तर गरीब कुठे जातील?); सरकारी कार्यालयांमध्ये लाच द्यावीच लागते- ‘चलता है’ (मी एकटी/टा काय करू शकणार आहे).. ही काही उदाहरणे! एकाच शाब्दिक अभिव्यक्तीत असे अर्थाचे अनेक पदर दडलेले असतात. ते उलगडून दाखवण्यासाठी भाषेबरोबरच सामाजिक- सांस्कृतिक- जैविक प्रक्रियांची ओळख असावी लागते, हे यातून अधोरेखित होतं.

संपूर्ण पुस्तकात ‘चलता है’ला ‘सीएच’ (उऌ) म्हटलं गेलं आहे. पुस्तकाची मांडणी करत असताना देशातील चार क्षेत्रांची (शिक्षणव्यवस्था, रस्ते वाहतूक, सिनेजगत, क्रीडा क्षेत्र) निवड केलेली आहे. हीच क्षेत्रं निवडण्यामागची कारणमीमांसाही दिली आहे. ती अशी की- या क्षेत्रांत शासनप्रणाली, खासगी प्रणाल्या व जनता या भागधारकांचा सहभाग आहे. हा सहभाग जवळपास सगळीकडे असतोच. शिवाय पुढे लेखक असं मांडतो की, सिनेमा आणि शिक्षण याबाबतीत भारत परंपरागतपणे बलशाली आहे, तर रस्तेवाहतूक आणि क्रीडा यांमध्ये कमकुवत आहे. कुठलीही आकडेवारी किंवा सबळ संदर्भाशिवाय वर्तवलेलं हे ढोबळ निरीक्षण वर्गीकरणाच्या पातळीवर ठीक वाटत असेलही; मात्र मीमांसा म्हणून फारसे तर्काधारित वाटत नाही.

लेखक अल्पेश पटेल यांचं असं म्हणणं आहे की, या चार क्षेत्रांतील ‘चलता है’ वृत्तीबद्दलचे निष्कर्ष हे कृषी, आरोग्य, संरक्षण- या आणि अशा सर्व क्षेत्रांना तंतोतंत लागू पडतील. या प्रत्येक क्षेत्राचं वैविध्य लक्षात घेतलं आणि ऐतिहासिक, आर्थिक यांसारख्या घटकांची वृत्तीशी होणाऱ्या समीकरणांची गुंतागुंत ध्यानात घेतली, तर वरील निष्कर्ष तर्काची झेप वाटल्याशिवाय राहणार नाही.

पुस्तकात एकूण चार मुख्य भाग आहेत. पहिल्या भागात ‘चलता है’ या मनोवृत्तीभोवती गुंफलेल्या सामाजिक जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे. या छोटेखानी प्रकरणाचा मुख्य उद्देश ‘चलता है’ची व्याख्या करणं आणि त्याचं मोजमापन करणं असा आहे. एकीकडे ‘चलता है’ संतुष्टतेचं प्रतीक आहे, तर दुसरीकडे उदासीनतेचं. या परस्परविरोधी वातावरणात ‘चलता है’ची व्याख्या लेखकाच्या मते ‘निष्क्रियता’ अथवा ‘कृतीचा अभाव’ अशी आहे. अशाच प्रकारच्या वृत्ती दर्शवणाऱ्या भाषिक अभिव्यक्ती इतर देशांतही (लॅटिन अमेरिकेतील देश, आखाती देश, फ्रान्स, भारतीय उपखंडातील देश) पाहायला मिळतात, असं निरीक्षणही लेखकानं नोंदवलं आहे.

यानंतर ‘चलता है’चे मोजमापन कसं करावं, यावर भाष्य करताना पुढील तीन मार्ग सुचवले आहेत – बदलाचा वेग, आंतरराष्ट्रीय ठोकताळे, जनतेचा दबाव! हेच तीन मार्ग का? शिवाय ‘आंतरराष्ट्रीय ठोकताळे’ ठरवत असताना स्वत:ची तुलना आपल्यासारख्याच देशांशी (जीडीपी, दरडोई उत्पन्न यांतील सारखेपण) तर करावीच, पण प्रामुख्याने प्रगत देशांशीही करावी असा लेखकाचा अट्टहास आहे. याची कारणं देताना लेखक असं म्हणतो की, भारताच्या इतिहासाकडे पाहिल्यास तो महान आहे असं लक्षात येतं; शिवाय संख्याशास्त्रीयदृष्टय़ा आपण ज्या देशांच्या यादीत आहोत, त्यांच्या तुलनेत यश मिळवण्याची आपली कुवत खूप जास्त आहे. दुसरं म्हणजे, आपण जर प्रगत देशांचा आदर्श ठेवला तर ध्येयपूर्तीमध्ये आपण कुठे कमी पडतो आहोत, हे आपल्या लक्षात येईल.

वरवर पाहता ही विधानं ‘ठीक’ वाटत असली, तरी अख्खं पुस्तक बेतण्यासाठी पुरेशी सक्षम आहेत का, याचा विचार व्हायला हवा असं जरूर वाटतं. याच तर्काचा वापर करत, मग इतर महान इतिहास असलेल्या देशांशीही तुलना योग्य ठरेल. ‘भारतीय महान इतिहासाचे आपल्यात बळ आहे’ या आंतरिक प्रेरणेवर अवलंबून संख्याशास्त्रीय वास्तव असं वास्तवात डावलता आलं असतं, तर हे लिखाण आणखी ताकदीचं नक्की ठरलं असतं! पुस्तकातील पुढील सर्व भाग वर नमूद केलेल्या गृहीतकांवर बेतलेले आहेत आणि म्हणूनच अनेक सर्वेक्षणांचा आणि अभ्यासांचा, तसेच दुय्यम (आयत्या) संदर्भावर आधारित या भागांचा पायाच डळमळीत आहे असं हे पुस्तक वाचताना पुन:पुन्हा जाणवत राहतं.

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात ‘जे चालू आहे ते असू द्यावं’ (लेट इट बी) या ‘चलता है’च्या रूपाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. वर नमूद केलेल्या चार क्षेत्रांचा आढावा घेताना, त्या-त्या क्षेत्रातील धोरणांच्या अंमलबजावणीबद्दल पुरेसा विचारविनिमय केलेला दिसून येतो. धोरणांबरोबरच इतर सर्वेक्षणं, जागतिक आकडेवारींचे संदर्भ हे सुसंगतीने मांडले आहेत. त्याला जोडून काढलेले निष्कर्ष आणि अनुमानं यांची ग्राह्य़ता तपासून पाहणं अनेकदा जिकिरीचं ठरतं. तसेच सारख्याच आकडेवारीतून संभाव्य अशा इतर शक्यता निर्माण होतात. त्यामुळे उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या योग्यतेबद्दल प्रश्न पडत राहतात.

उदाहरणार्थ, शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्न उपस्थित करताना, विशेषत: भारतातल्या शिक्षकांच्या गुणवत्तेबद्दल भाष्य करताना लेखक पुढील आकडेवारी देतो – २०१२ मध्ये ‘सीटीईटी (सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट)’मध्ये ९९ टक्के, म्हणजे ७.९५ लाख उमेदवार अनुत्तीर्ण झाले. पुढे या परिस्थितीची तुलना चीनशी व नंतर फिनलंडबरोबर करून या देशांनी ‘गुणवत्ता’ सुधारण्यासाठी तिथे केलेल्या प्रयत्नांचे वर्णन लेखकानं केलं आहे. ज्याअर्थी आपल्याकडे अनुत्तीर्णाचे प्रमाण इतके जास्त आहे, त्याअर्थी आपणही अशा योजना राबवल्या पाहिजेत. या निष्कर्षांस संपूर्ण विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, जी परीक्षा ९९ टक्के इच्छुक उमेदवार उत्तीर्णच होऊ  शकत नाहीत, त्या परीक्षेतच काही मूलभूत दोष आहेत का? त्याची पडताळणी नको का व्हायला? ज्याप्रमाणे चीन आणि फिनलंडच्या धर्तीवर गुणवत्तासुधारणा योजनांचा आग्रह धरला आहे, त्याचप्रमाणे तिथल्या परीक्षांचीही आपल्या परीक्षांशी तुलना होऊ  शकते. मग आपल्या परीक्षाच बदलायला हव्यात, असा निष्कर्ष निघण्यास वाव आहे. मग कोणते निष्कर्ष जास्त ग्राह्य़ मानायचे?

तिसऱ्या भागात पाच ठळक विषयांना धरून ‘चलता है’कडे पाहायचा प्रयत्न केला आहे. ‘गुणवत्ता’, ‘जोखीम तत्परता’, ‘चिकाटी’, ‘आकांक्षा’, ‘जागरूकता’ या प्रगतीच्या ध्यासाने भारलेल्या संकल्पनांभोवती गुंफलेला हा भाग सादर करत असताना- सतत अमेरिका, चीन, जर्मनी, झालंच तर जपान, द. कोरिया, सिंगापूर यांचे दाखले कोणत्याही आवश्यक आधारभूत समानता प्रस्थापित न करता पाहायला मिळतात. त्यात अजून भर म्हणून, बडय़ा बडय़ा कॉर्पोरेट संस्था कशा प्रकारे इनोव्हेशन्स- नवकल्पना (आणि सढळ पैसा खर्च) करत तुफान यशस्वी होत आहेत/ झाल्या आहेत; त्यांच्या देशांच्या यशास हातभार लावत आहेत, हेही लेखक आवर्जून मांडतो. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘चलता है’ मानसिकता मोडून काढण्यात आणि नवकल्पना राबवण्यात कसा पुढाकार घेत आहेत, याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उल्लेखही आहेत.

चौथा- म्हणजे शेवटचा भाग ‘चलता है’ वृत्तीची मूळ कारणं आणि त्यातून मार्ग शोधणे यासाठी राखून ठेवला आहे. यात ‘चलता है’ अजिबात खपवून न घेणारे (ल्ल-उऌ) ‘निन्जा’ आपल्याला हजारोंच्या संख्येने हवे आहेत, हा एक प्रमुख उपाय सुचवला आहे. उपायातील (नावापासून भावापर्यंत) सुलभीकरणाकडे जरी दुर्लक्ष करायचं ठरवलं, तरी सावित्रीबाई फुले कशा खऱ्या ल्ल-उऌ निन्जा होत्या हे वाचल्यावर अशा अतिसुलभीकरणाची कीव आल्यावाचून राहत नाही. शिवाय, आरक्षणासारख्या तरतुदीनं खरं तर जातिभेद वाढवला आहे, मागास प्रवर्गातील व्यक्ती खुल्या प्रवर्गातील जास्त पात्र व्यक्तींच्या संधी गिळंकृत करत आहेत; म्हणून आपण मागास प्रवर्गातील व्यक्तींसाठी वेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांच्या संधीच (ऑलिम्पिक पदांसाठी तयारी, रस्तेसुरक्षा वाढवणे) उपलब्ध कराव्यात, तसेच मागास गटात ‘चलता है’ला विरोध करणाऱ्या निन्जांची फौज उभारावी- अशा सांविधानिक तत्त्वांना आणि मर्यादांना धक्का देणाऱ्या वैविध्यपूर्ण उपायांची रेलचेल आहे.

तर.. वाचकाला भरपूर माहिती देणारं पुस्तक नेमकी दिशा द्यायच्या भूमिकेत डळमळीत होताना दिसतं. अर्थात, पुस्तकाच्या मुख्य मुद्दय़ाला धरून प्रत्यक्ष आकडेवारी उपलब्ध नसणार हे साहजिक आहे; परंतु पुस्तकात नोंद केलेले अनेक निष्कर्ष तर्काची अतर्क्य झेप वाचकाला घ्यायला भाग पाडतात, हे निश्चित!

अशा व्यापक विषयांना न्याय देणारं लिखाण याआधीही अनेकांनी केलं आहे. उदाहरणार्थ, मार्क टुली, अमर्त्य सेन, गुरचरण दास इत्यादी. अशाच भारतीय वृत्तीचा- ‘जुगाड’चा वेध घेणारा लेख अर्थतज्ज्ञ स्वामिनाथन अय्यर यांनी लिहिला होता. ज्यात जुगाड ही वृत्ती भारतीयांना कसे वेळोवेळी यश देते, अशी भूमिका त्यांनी घेतली होती, ज्यावर पुढे प्रत्युत्तरंही लिहिली गेली. तेव्हा, विषयाचा आवाका मोठा असणं ही मुख्य अडचण नसून निष्कर्षांप्रत येण्यासाठीची शिस्त आणि प्राथमिक संदर्भशोधनाचे कसब कमी पडणं, हे कारणही नाकारता येत नाही.

  • ‘चलता है इंडिया: व्हेन ‘इट्स ओके!’ इज नॉट ओके’
  • लेखक : अल्पेश पटेल
  • प्रकाशक : ब्लूम्सबरी इंडिया
  • पृष्ठे : २८५, किंमत : ४९९ रुपये

aparna.a.dixit@gmail.com