|| नंदा खरे

काही कथा-कादंबऱ्या सध्याच्या समाजात काल्पनिक मोडजोड करून, बदल करून ‘नवे समाज’ घडवत त्यांची तपशीलवार चित्रं मांडत असतात. इंग्रजीत अशा कल्पनेतल्या सुखकारक समाजाच्या रेखाटनांना ‘युटोपिया’ आणि भेडसावणाऱ्या-भेवडावणाऱ्या चित्रांना ‘डिस्टोपिया’ म्हणतात. अशा साहित्याची, त्यातल्या सामान्य सूत्रांची ओळख करून देणाऱ्या पाक्षिक लेखमालेचे हे प्रास्ताविक..

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

आपण ज्या जगात जगतो-वावरतो त्याची काही अंगं, काही पद्धती आपल्याला आवडतात; तर काही नकोशा वाटतात. आपण आपल्या परीनं चांगल्या पद्धती वाढाव्यात म्हणून, वाईट भाग कमी व्हावा म्हणून प्रयत्न करत असतो. यांतला सोपा प्रकार म्हणजे इतरांशी बोलणं, जे चिडचिड-चडफड-त्रागा अशा पातळीला पोहोचतं. एखादी सेवाभावी संस्था काढणं किंवा तिला मदत करणं ही जरा पुढची पायरी झाली. याहून पुढचं पाऊल म्हणजे राजकीय कृती करणं, चळवळी, पक्ष-बांधणी वगैरे. अगदी थोडे लोक याहून पुढे जात जात धर्मसंस्थापनापर्यंत पोहोचू शकतात! हा सगळा ‘कृतिशील अवकाश’ झाला. काही थोडे लोक (पुस्तकी, बैठे, माझ्यासारखे) मात्र सध्याच्या समाजात काल्पनिक मोडजोड करून, बदल करून ‘नवे समाज’ घडवतात आणि कथा-कादंबऱ्यांच्या रूपात त्यांची तपशीलवार चित्रं काढून इतरांपुढे मांडतात.
असे काल्पनिक समाज फक्त त्या कथा-कादंबऱ्यांमध्येच असतात; वास्तवात नाही. स्थळकाळात त्या ‘जागा’ अस्तित्वातच नसतात! अशा कथात्म साहित्याला इंग्रजीत युटोपियन साहित्य म्हणतात. युटोपिया म्हणजे ‘नसलेली जागा’ किंवा ‘न-स्थान’. मराठी विश्वकोश ‘युटोपिया’साठी ‘अस्थितादर्श’ असा शब्द सुचवतो, तो मला तरी बोजड आणि नेमका नसलेला वाटतो. त्याऐवजी ‘नस्थान’ (युटोपिया), ‘नस्थानी’ (युटोपियन) हे शब्द सोपे आणि नेमके आहेत.

कल्पनेचे घोडे दौडवायच्या दिशा वेगवेगळ्या असू शकतात. समाजातली चांगली वाटणारी अंगं वाढवून किंवा नव्याने घालून चांगले समाज घडतील. उलट वाईट अंगं ठसवून, वाढवून भीषण समाजही रेखाटले जातील. इथेही एक पेच पुढय़ात येतो, की चांगलं कशाला म्हणायचं, वाईट म्हणजे काय यावरही एकमत शक्य नाहीच! पण ढोबळ मानाने माणसांचं बऱ्यावाईटावर एकमत असतं असं मानून पुढे जाऊ! इंग्रजीत सुखकारक समाजाच्या रेखाटनांना ‘युटोपिया’ आणि भेडसावणाऱ्या-भेवडावणाऱ्या चित्रांना ‘डिस्टोपिया’ म्हणतात. आपण ‘सुनस्थान’ आणि ‘कुनस्थान’ असे शब्द वापरू, कारण ते सोपं जाईल.

जरी आपण आत्तापर्यंत कथा, कादंबऱ्या, कथात्म साहित्य असे शब्द वापरले असले; तरी जमाना मल्टिमीडियाचा, बहुमाध्यमिक असा आहे. आज ग्राफिक कादंबऱ्या, चित्रपट, दूरदर्शन-मालिका, पथनाटय़ं असे अनेक प्रकार कथात्म साहित्याची कामं करत असतात; कधीकधी तर जास्त प्रभावीपणे. पण आजच्या टप्प्यावर सुनस्थानी-कुनस्थानी कृतींची लिखित रूपंच आपण पाहू.

मराठी साहित्यात ‘नस्थानी’ साहित्याचं ‘दालन’ लहानखुरं आहे. ‘दालन’ कसलं, जिन्याखालचं खबदाड म्हणा! मूळ मराठी अशा दोनच साहित्यकृती मला माहीत आहेत. एक म्हणजे वि. वा. शिरवाडकर ऊर्फ ‘कुसुमाग्रज’ यांची ‘कल्पनेच्या तीरावर’ ही १९५६ सालची कादंबरी, आजही छापली जात असलेली. दुसरं नाव आहे काशीबाई कानिटकर यांच्या ‘पालखीचा गोंडा’ या १९२८ सालच्या दुर्मीळ कादंबरीचं. ‘कल्पनेच्या तीरावर’मध्ये शिरवाडकर बऱ्याच गमती करतात, ज्यातली मुख्य म्हणजे तो समाज कामव्यवहाराचा जाहीर उल्लेख ‘भद्र’ मानतो; पण जेवण्याखाण्याचे उल्लेख ‘अभद्र’ मानतो! काशीबाई कानिटकर स्त्रियांना जास्त स्वातंत्र्य, विशेषत: आर्थिक, दिलं तर काय होईल ते ‘पालखीचा गोंडा’मधून सुचवतात, अगदी स्त्रियांनी टांगा चालवण्यापर्यंत. आज रिक्षा-ओला-उबर स्त्रियांनी चालवण्याच्या काळात हा फुसका बार वाटेल; पण काशीबाई १९२८ साली, सुमारे शतकापूर्वी लिहीत होत्या. मी स्वत: पाचेक वर्षांपूर्वी ‘उद्या’ नावाच्या कादंबरीतून अत्यंत अमानुष मुक्त बाजारपेठी जग रेखाटायचा प्रयत्न केला. दुर्दैवानं (!) माझी बत्तिशी बऱ्याच तपशिलात वठली. इतरही साहित्य असेल, पण माझ्या मर्यादित मराठी वाचनात ते आलेलं नाही. कोणी इतर मराठी ‘नस्थानी’ साहित्याची वाट दाखवली, तर तीही तपासता येईल. पण ‘बुकमार्क’ पानाचा स्वभाव इंग्रजी ग्रंथकेंद्री आहे. तेव्हा मराठी नस्थानी विश्व असं थोडक्यात निपटून आपण इंग्रजीकडे वळू.

इंग्रजीत नस्थानी साहित्य संख्येनं, दर्जानं आदरणीय आहे. काही मित्रांबरोबर या साहित्याची चव मराठी वाचकांना देण्याची इच्छा म्हणा, आस म्हणा, गेली काही र्वष मला पछाडते आहे. का होते आहे ही इच्छा?
माणसांना गोष्टी आवडतात, निबंध आवडत नाहीत. एखादी गोष्ट वाचत असताना, चित्रपट पाहात असताना त्यातले अनुभव आपण थेटपणे घेत असतो. अगदी गोष्ट ऐकणाऱ्या-पाहणाऱ्यांच्या मेंदूंची स्कॅन-चित्रं काढून हे सिद्ध झालं आहे. ही परिणामकारकता निबंध वगैरे साधू शकत नाहीत. म्हणून आपल्यासारख्या साध्या माणसांना महाभारत पाहायला आवडतं, भगवद्गीता-उपनिषदं वाचायला नाही! एखाद्या सेवाभावी संस्थेशी जुळवून घेणं, राजकीय पक्ष किंवा धार्मिक पंथ जवळ करणं यांपेक्षा ‘अगा जे घडलेच नाही/ तयाची चर्चा’ करणं आपल्याला आवडतं. जरा वाट बदलतो. राष्ट्र सेवा दलाचं ‘महाराष्ट्र दर्शन’, शाहीर अमर शेख आणि अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे, सत्यशोधक जलसे वगैरे बंद झाल्यानं महाराष्ट्रातील प्रागतिक विचार मागे पडला. तो अवकाश टीव्हीवरच्या महाभारत-रामायणानं भरून काढला. या कुशल कथनाची-नॅरेटिव्हची आकलनीयता बहुतेक वर्गाना रुचली; कारण माणसं गोष्टींची भुकेली होती, आणि दुसरे पर्यायच नव्हते. भाजपच्या यशात याचा वाटाही मोठा आहे! पाहा, माझं हे म्हणणं पटतं का ते.

तेव्हा आपल्या समाजाच्या सामाजिक- राजकीय कक्षा वाढवायला नस्थानी साहित्याची ओळख करून देणं उपयोगी ठरेल. गालिब स्वत:बद्दल लिहितो : ‘हुई मुद्दत के गालिब मर गया पर याद आता है/ वो हर इक बात पर कहना के यूं होता तो क्या होता!’ तर आपण गालिबचा प्रश्न स्वत:ला विचारत, इतरांनी दिलेली नस्थानी उत्तरं तपासायला हरकत नसावी! त्यासाठीची ही लेखमाला.. ‘अव-काळाचे आर्त’!

हे सगळ्यांनाच पटेल असं नाही. कधी तरी १९९०-२०००च्या सुमाराला एका वरच्या पिढीतल्या विचारवंताशी पर्यावरणवादावर चर्चा होत होती. गृहस्थ आदरणीय होते; नुसतेच ‘परिसंवादी’ नाही. अर्नेस्ट कॅलेनबाखच्या ‘ईकोटोपिया’ या नस्थानी कादंबरीचा उल्लेख झाला. ही कादंबरी पर्यावरणवादी राष्ट्र कसं असेल याचं वर्णन करते. ‘गुरूदेव’ जरा रागावले. गंभीर चर्चेत कादंबरी! पण ‘ईकोटोपिया’वर बेतलेला जर्मन हरित पक्ष निवडणुकांमध्ये दहा टक्क्यांवर मतं खेचतो. ब्राझीलमधलं कुरिचिबा शहर ‘ईकोटोपिया’चीच तत्त्वं वापरून स्वत:ची ‘अ कन्व्हिनियंट ट्रथ’ अशी कीर्ती घडवून आहे. आम्ही ‘ईकोटोपिया’ची प्रत पुरावा म्हणून सादर करू शकलो नाही, पण जर्मन हरित पक्षाचा जाहीरनामा मात्र दाखवू शकलो!

अनेक नस्थानी कथा-कादंबऱ्या तपासताना वेगळेही मुद्दे उपजतात. नस्थानी साहित्य आणि विज्ञान साहित्य यांच्यात भेद कसा करायचा? काही कथनं ओळखीच्या इतिहासात फेरफार करतात; उदाहरणार्थ जयंत नारळीकरांची पानिपतच्या युद्धाचा वेगळा शेवट सुचवणारी कथा. इंग्रजीत याला ‘पर्यायी इतिहास’ (ऑल्टरनेटिव्ह हिस्टरी) म्हणतात; त्याचं नस्थानी साहित्याशी नातं काय? सर्व नस्थानी साहित्य काही मूठभर अंगांवर जोर देतं. खासगीपणा, स्त्री-पुरुष संबंध, समाजातली श्रेणीबद्धता, एका वर्गानं दुसऱ्यांची पिळवणूक करणं, नागरिकांवर नियंत्रण ठेवणाऱ्या नियमबद्ध व्यवस्था, यंत्राधिष्ठित समा- यांसारखे मुद्दे नवनव्या रूपांत भेटत राहतात. तेव्हा नुसत्या एकेका साहित्यकृतीचा परिचय आणि तिचं परीक्षण देण्याबरोबर काही ‘सामान्य’ सूत्रं रचता येतील का? या मुद्दय़ांवरची चर्चा या लेखमालेचा भाग असावी का? जागतिक साहित्य-समीक्षेत नस्थानी साहित्याला गांभीर्यानं घेतलं जातं, कारण त्यात काही समान सूत्रं दिसतात आणि त्यांद्वारे सद्य:कालीन मानवी परिस्थितीविषयी काही भाष्य केलं जातं. किंबहुना या प्रकारच्या साहित्यात तत्कालीन समाजांच्या भीती, त्यांचे पूर्वग्रह, जगाच्या आकलनाविषयीचे त्यांचे गैरसमज उघडे पाडण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळेच जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या लेखकांना त्याचं आकर्षण वाटलं आणि त्यातून अनेक अभिजात साहित्यकृती निर्माण झाल्या. त्यामुळे या लेखमालेत निव्वळ पुस्तक-परिचय करून देण्यापेक्षा ही समान सूत्रं आणि त्यातून तत्कालीन समाजाविषयीचं (किंवा कदाचित आताच्या आपल्याविषयीचंही!) आपलं आकलन अधिक व्यापक, अधिक समंजस, अधिक डोळस करता येईल असं वाटतं.

कुणाला वाटेल की, वृत्तपत्र या माध्यमात नको तितकं गांभीर्य आणलं जातं आहे. मला मात्र हे मत वाचकाचा अपमान करतं असं वाटतं. ‘लोकसत्ता’तील वाचकपत्रव्यवहार पाहता, तिथे कोणत्याही प्रकारे सुलभीकरण करण्याची (ज्याला इंग्रजीत थेट अपमानास्पद रूपात ‘डम्बिंग डाऊन’ म्हणतात!) गरज वाटत नाही. त्यामुळे काही अभिजात साहित्यकृतींचा परिचय आणि त्याद्वारे जगाकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याचा प्रयत्न या लेखमालेतून होईल. ‘लोकसत्ता’च्या वाचकांना हा प्रयत्न कसा वाटतो, हे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक असू!

nandakhare46@gmail.com