पंकज भोसले

‘कथा’ हा सुमार प्रकार असल्याचा प्रचार करून मराठीत जागतिक उंचीला जवळ जाणारी एकही कादंबरी उभी न करू शकलेल्या धुरीणांमुळेच आपल्याला चांगल्या ‘कथां’पासून वंचित राहावे लागले. मुबलकतेच्या काळात मासिकांनी कथांची ‘फॅक्टरी’ म्हणून भूमिका बजावली असली, तरी नव्वदोत्तरीतील बदलत्या जगण्याला आश्वासक ठरणाऱ्या कथा हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या लेखकांना लिहिता आल्या. विशेष म्हणजे, या काळात इतर भाषांत कथा प्रकाराचा विकास झाला. लघुतम कथांच्याही (फ्लॅश फिक्शन, मायक्रो फिक्शन- अशा) उपशाखा तयार झाल्या. पण आपल्याकडे चारदोन दिवाळी अंकांत पाच-दहा वर्षे कथा लिहिणाऱ्यांच्या संग्रहांची ‘साहित्यविश्व’नामक अदृश्य व्यवहारात अजागळ दखल घेऊन झाल्यानंतर कथालेखक संपण्याच्या प्रक्रिया नित्याच्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, हिंदीतील बहुतांश मासिकांमधून सध्या आवर्जून लिहिल्या अन् छापल्या जाणाऱ्या ‘लंबी कहानी’ या प्रकाराचे कौतुक करावे लागेल. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका, आफ्रिकेत मासिकांमधून दरवर्षी छापल्या जाणाऱ्या कथांतील सर्वोत्तमांचे एकत्रित खंड पाहून या वाङ्मय प्रकाराला फक्त आपणच गांभीर्याने घेत नसल्याचे लक्षात येऊ  शकेल.

Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत

हारुकी मुराकामी हे जपानी लेखक गेली पन्नास वर्षे आपल्या मातृभाषेतून कथा-कादंबऱ्या लिहित आहेत. लिखाणाची पहिली दहा वर्षे त्यांच्या कथा अमेरिकी धाटणीच्या म्हणून त्यांच्याच देशात नाकारल्या गेल्या. खूपशा आत्मानुभवांच्या, अमेरिकी जॅझ-पॉप आणि शास्त्रीय संगीत-संगीतकारांच्या गाजलेल्या कलाकृतींना संदर्भ किंवा कच्चामाल म्हणून वापरणाऱ्या या कथा इंग्रजीत अनुवादित झाल्या आणि लेखक आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जपानी वाचकांना या लेखकाचे महत्त्व उमजून आले. जपानमध्ये त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचे अनुवाद करणारी ‘कोडांशा (को-दान्सा) इंटरनॅशनल’ ही संस्था, त्यांचे संपादक, अनुवादक या सर्वांना लौकिक, आर्थिक सुबत्ता मिळाली. एकेका पुस्तकाच्या दीड लाखांहून अधिक निघणाऱ्या पहिल्या आवृत्त्या चटकन संपविण्याचे आणि पन्नासहून अधिक भाषांत अनुवादित होण्याचे भाग्य लाभलेले मुराकामी हे भूतलावरील सर्वात यशस्वी कथालेखक आहेत.

‘फर्स्ट पर्सन सिंग्युलर’ या त्यांच्या नव्या कथासंग्रहाची जाहिरात पाचेक महिन्यांपूर्वी ‘मर्कट’युक्त मुखपृष्ठासह करण्यात आली, तेव्हा या संग्रहातील आठ कथा कोणत्या असतील, याचे त्यांच्या चाहत्यांना कुतूहल होते. कारण मुराकामी यांच्या जपानी कथा अनुवादित होऊन इंग्रजीत प्रकाशित होण्याची स्थळे मोजून तीन आहेत. आठवड्याला एक उत्तम कथा देणाऱ्या ‘द न्यू यॉर्कर’ साप्ताहिकात त्यांच्या वर्षाला किमान दोन कथांची उपस्थिती असते. ब्रिटनमधून प्रकाशित होणाऱ्या ‘ग्रॅॅण्टा’ मासिकात वर्षाला एखादी कथा हमखास असते. पैकी ‘न्यू यॉर्कर’च्या कथा या संकेतस्थळावर मोफत वाचायला मिळतात. ‘ग्रॅण्टा’मधील त्यांची कथा किमान दोन वर्षे सर्वांकरिता (अनलॉक) उपलब्ध केली जात नाही. पण याहीपेक्षा ‘ग्रॅण्टा’चे माजी संपादक जॉन फ्रीमन यांच्याकडून निघणाऱ्या ‘फ्रीमन्स’ मासिकात मुराकामी यांची प्रसिद्ध होणारी कोणतीही कथा पुस्तक येईस्तोवर पाहायलाही मिळणे अप्राप्य असते. ही तिन्ही नियतकालिके मुराकामी यांनी ‘बाराखडी’ लिहून पाठवली तरी आकर्षकरीत्या छापतील, अशी परिस्थिती असताना ‘फर्स्ट पर्सन सिंग्युलर’मध्ये त्यांच्या तीन अप्रकाशित कथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

पुस्तकांच्या पायरसीचे आजचे जग हे आडमार्गाने चित्रपट उपलब्ध करून देणाऱ्या विश्वापेक्षा अंमळ मोठे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजावाजा असणाऱ्या प्रकाशनसंस्था आणि लेखकांची नवी कलाकृती अधिकृत बाजारात येण्याआधी या जगात उपलब्ध झालेली असते. अलीकडे या जगात पटकथाकार चार्ली कॉफमन यांची पहिली कादंबरी ‘अ‍ॅण्टकाइण्ड’ (प्रकाशनाच्या दोन दिवस आधी), निक हॉर्नबी यांची ‘ब्रेग्झिट’वरची कादंबरी ‘जस्ट लाइक यू’ (प्रकाशनाच्या एक दिवस आधी) दाखल झाली. तरीही त्यांच्या पुस्तकविक्रीत, खपाच्या उच्चांकी आकड्यांत फरक पडला नाही. या आठवड्यात सहा तारखेला प्रकाशित झालेले मुराकामी यांचे नवे पुस्तक चार तारखेपासूनच या व्यासपीठावर उपलब्ध होते, आणि तरीही पुढल्या काही दिवसांत हा कथासंग्रह मुराकामी यांच्या आधीच्या पुस्तकांच्या विक्रीविक्रमांशी बरोबरी करेल यात शंका नाही.

मुराकामी यांच्या कथा, कादंबऱ्या किंवा अकथनात्मक लेखन वाचणाऱ्यांना त्यांच्या आयुष्यातील घटनांची जंत्री बऱ्यापैकी माहिती झालेली असते, इतके त्यांनी १९६० ते ७० च्या दशकाला आपल्या लेखनामध्ये घोटवून ठेवले आहे. सुरुवातीला अनुवाद करणारी कंपनी उघडून इंग्रजी अभिजात साहित्याचे जपानी भाषांतर करणाऱ्या मुराकामी यांनी अमेरिकी शैलीला जपानी भाषेत सादर करण्याचा धडाका लावला. १९४९ साली जन्मलेल्या मुराकामी यांनी आपल्या तारुण्यात ब्रिटिश बॅण्ड ‘बिटल्स’चा जगावरचा प्रभाव अनुभवला. अमेरिकी जॅझ संगीतकारांच्या रचनांंशी सख्य केले आणि अभिजात संगीतातील सर्वोत्तमांच्या रेकॉर्ड्सचा ध्यास घेतला. जपानी संगीतवेडास, मांजरप्रेमास आणि ज्यातून गोष्ट निघू शकणार नाही, अशा विषयांना आपल्या गोष्टीचा भाग केले. मुरलेल्या कथनकाराच्या भूमिकेत सतत वावरणाऱ्या मुराकामी यांच्या ‘फर्स्ट पर्सन सिंग्युलर’मधील आठही कथा शीर्षकाला जागणाऱ्या प्रथमपुरुषी एकवचनी आहेत. बहुतांश कथा १९६० ते ७० च्या दशकातील आठवणींच्या प्रदेशाला स्पर्श करून वाचकाला नवे काहीतरी मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. समांतर कथात्म इतिहास उभारण्यात यशस्वी होतात.

माजी प्रेयसी, मैत्रीण, आवडता जॅझ सॅक्सोफोन वादक, सर्वाधिक आवडता संगीतसमूह, आवडती शास्त्रीय संगीतरचना, घडणाऱ्या विचित्र घटना, तरुणीची आत्महत्या, मांजरांचा उल्लेख, स्वत:च्या कादंबऱ्यांचा उल्लेख, स्वत:च्या खऱ्याखुऱ्या नावाचा उल्लेख, डायरीतील नोंदी, काही कवितांचा गुच्छ… अशा मुराकामीच्या लेखनात पुनरावृत्त होणाऱ्या घटकांचा या कथांत अंतर्भाव आहे.

संग्रहातील पहिली कथा ‘क्रीम’ ही एका संध्याकाळी पियानोवादन करणाऱ्या मैत्रिणीने जाहीर कार्यक्रमात साथसंगतीकरिता दिलेल्या निमंत्रणानंतर तरुण नायकाच्या मनात घडणाऱ्या मानसिक आंदोलनाची आहे. मोठा प्रवास करून कार्यक्रमस्थळी गेल्यानंतर तेथे कुणीच उपलब्ध नसल्यामुळे फसविले गेल्याच्या भावनेत नायक जवळच्या एका बागेत विसावतो. तेथे श्वास घेण्यासंबंधी अधूनमधून होणारा विकार उत्पन्न होतो. एका वृद्धाशी त्याची कर्मधर्म-संयोगाने गाठ पडते. तत्त्वज्ञानी थाटात बोलणारा वृद्ध त्याला ध्यानधारणेची एक पद्धत शिकवू पाहतो. ‘ऑन ए स्टोन पिलो’ नावाच्या कथेत एका रात्रीची शय्यासोबत मिळालेल्या तरुणीची आठवण आहे. ‘ऑन ए स्टोन पिलो’ नावाचा हस्तलिखित कवितासंग्रह लिहिणाऱ्या आणि निवेदक नायकाला कैक दिवसांनंतर पोस्टाद्वारे हा कवितासंग्रह पाठविणाऱ्या या मुलीचा संपर्क अचानक तुटल्याची खंत या कथेत आहे. एका रात्रीत घडणाऱ्या घटनांचे वर्णन मुराकामी यांच्या काव्यमय शैलीत वाचायला गंमत वाटते.

‘चार्ली पार्कर प्लेज् बोसा नोव्हा’ ही ‘बर्ड’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या कृष्णवंशीय अमेरिकी जॅझ वादकाच्या समांतर काल्पनिक इतिहासाची कथा मुराकामी यांच्या संगीतदर्दीपणाची उंची दाखवून देणारी. यात त्यांनी आपल्या हायस्कूलमधल्या नियतकालिकासाठी लिहिलेल्या कथाशीर्षकाच्या निबंधाचा भाग जोडला आहे. ‘चार्ली पार्कर प्लेज् बोसा नोव्हा’ अशा प्रकारची कोणतीही रचना या वादकाने ध्वनिमुद्रित केलेली नसताना, त्या काल्पनिक निबंधाचा निवेदकाच्या मनावर गोंदला गेलेला परिणाम या कथेत येतो. न्यू यॉर्कमधील एका भेटीत जुन्या रेकॉर्ड्सच्या बाजारात ‘चार्ली पार्कर प्लेज् बोसा नोव्हा’ या नावाची रेकॉर्ड अपघाताने निवेदकाच्या दृष्टिपथात येते. आपण केलेल्या काल्पनिक गमतीचे मूर्त आणि वास्तव स्वरूप पाहून हा निवेदक गोंधळून जातो. रेकॉर्डची किंमत अधिक सांगितली गेल्याने ती घेण्याचे टाळतो. हॉटेलात परतल्यावर पश्चात्तापाने रात्र कशीबशी घालवून सकाळी जुन्या रेकॉर्ड्सचे दुकान उघडण्याच्या वेळी तेथे पोहोचतो. पण त्याला आदल्या दिवशी दिसलेल्या रेकॉर्डचा थांगपत्ता लागत नाही. चार्ली पार्करच्या इतिहासाबरोबर त्याच्या वादनाचा साक्षात्कार एका जपानी चाहत्याच्या शब्दांमधून अनुभवणे, हा या कथेचा आत्मा आहे.

‘विथ द बिटल्स’मध्ये मुराकामी सहजपणे वाचकाला कथावटवृक्षाच्या विविध फांद्यांवर फिरवून आणतात. हायस्कूलमध्ये एका सुंदर तरुणीच्या हातात ‘विथ द बिटल्स’ या शीर्षकाची रेकॉर्ड पाहून हरखून गेल्याच्या स्मृतीपासून निवेदक कथा सुरू करतो. कथा अर्थातच या तरुणीभोवती फिरत नाही. हायस्कूलमधील पहिल्या प्रेमिकेविषयीचा स्मृतिप्रदेश ओघाने यायला लागतो. पण कथा या प्रेमिकेभोवतीही उरत नाही. या प्रेमिकेने आपल्या घरी बोलावल्याच्या एका आठवणीवर ती केंद्रित होते. निवेदक तिच्या घरी पोहोचतो, तेव्हा प्रेयसी तिच्या घरात नसते. तिचा मोठा भाऊ घरात असतो. प्रेयसीची वाट पाहण्याच्या दरम्यान तो प्रेयसीच्या भावाला आपल्या पाठ्यपुस्तकातील एक कथा वाचून दाखवितो. स्मृतिभ्रंशाच्या आजाराने ग्रस्त प्रेयसीच्या भावाच्या डोक्यात कित्येक वर्षे नायकाने वाचून दाखविलेल्या कथेची स्मृती मात्र शिल्लक राहिलेली असते.

‘कन्फेशन्स ऑफ ए शिनागावा मंकी’ ही पंधरा वर्षांपूर्वी मुराकामी यांनी लिहिलेल्या एका कथेचा उत्तरार्ध आहे. महिलांचे नाव चोरून त्यांचे अस्तित्व संपविणाऱ्या माकडाने आपल्या गुन्ह््यांची निवेदकाशी केलेली विस्तृत चर्चा, हे या कथेचे स्वरूप आहे.

‘कर्नावल’, ‘याकुल्ट स्वॅलोज् पोएट्री कलेक्शन’ आणि ‘फर्स्ट पर्सन सिंग्युलर’ या संग्रहातील अप्रकाशित कथा. पैकी ‘कर्नावल’ ही रॉबर्ट शूमन यांच्या विख्यात ‘कर्नावल’ या संगीतरचनेच्या वेडाविषयीची आहे. एका कुरूप मैत्रिणीसह सहा महिने या रचनेचा आस्वाद घेताना घडणाऱ्या घटनांची ही अ-प्रेमकथा आहे. ‘याकुल्ट स्वॅलोज् पोएट्री कलेक्शन’ जपानच्या स्थानिक बेसबॉल संघाचा खेळ पाहून स्फुरलेल्या कवितांविषयीची आणि त्यातून उद््भवलेल्या एका काल्पनिक कवितासंग्रहाविषयीची, तर ‘फर्स्ट पर्सन सिंग्युलर’ एका रहस्यमयी दिवसाची उकल न करता ताणत नेलेल्या रहस्याविषयीची कथा आहे. सगळ्या कथांची जातकुळी भिन्न असली, तरी पकडून ठेवण्याचे सामर्थ्य समान आहे.

मुराकामी यांच्या आधीच्या लेखनात डोकावलेल्या संकल्पना प्रदेशांचा ओळखीचा भाग या कथांमध्येही असला, तरी मुराकामी यांची मुरलेली शैली, या कथांना नव्या-आवडणाऱ्या रूपात वाचकांसमोर ठेवते. ‘कथा’ माध्यमाच्या आविष्कारक्षमतेची आपल्या अर्वाचीन कथासंस्कृती-परंपरेने नाकारलेली बाजू उमजून घ्यायची असेल, तर सध्या तरी मुराकामी यांची कथा वाचणे हा उत्तम अभ्यास ठरेल.

pankaj.bhosale@expressindia.com