News Flash

महाराष्ट्रीय प्रबोधनाची कुळकथा…

शिवाजी महाराजांच्या राज्यधोरणाबद्दलही पुस्तकात वाचायला मिळते.

‘रेनेसान्स स्टेट’ लेखक : गिरीश कुबेर प्रकाशक : हार्पर कॉलिन्स पृष्ठे : २४०, किंमत : ५९९ रुपये

|| मिलिंद म्हैसकर

महाराष्ट्राच्या करकरीत बुद्धिवादी वृत्तीचा तळ शोधू पाहणारे हे पुस्तक प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळांतील महाराष्ट्रीयांची कथा सांगते…

गिरीश कुबेर यांचे नवे पुस्तक ‘रेनेसान्स स्टेट’ म्हणजे महाराष्ट्रीय इतिहासाबाबतची बौद्धिक मेजवानी आहे. हजारो नोंदी, संदर्भ वाचकाच्या माथ्यावर आदळून त्याला भंडावून, कंटाळवून सोडणाऱ्या प्रकांडपंडिताचे हे इतिहासकथन नाही. तसेच ‘आधी निवाडा, नंतर (लागलाच तर) युक्तिवाद’ या धाटणीचे हे प्रचारकी, आरोळीठोक साहित्य नाही. एका मुरब्बी, पण संवेदनशील पत्रकाराने मराठी माणसाविषयी मांडलेला हा शोध त्यामुळेच रंजक ठरतो. साचेबद्ध विचारसरणीहून स्वतंत्र राहून व्यक्त होत राहिलेले नरहर कुरुंदकर यांना अर्पण केलेल्या या पुस्तकाचा बाजही एकसुरी स्तुतिसुमने उधळण्याचा नाही. महात्मा फुलेंच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रातच अनेक प्रतिगामी प्रथा घर करून आहेत किंवा सर्वाधिक धरणे असलेला महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत राहतो, अशी अंजने डोळ्यांत घालायला लेखक घाबरत नाही. त्याचप्रमाणे महात्मा गांधींचे गुरू, आद्य शिष्य तसेच खूनकर्ते हे महाराष्ट्रीयच- त्यातही चित्पावन ब्राह्मण- होते, असे अनेक बारकाव्याचे तपशील पुस्तकात विखुरलेले आहेत.

मराठी माणूस नेमका कसा आहे याची नाडीपरीक्षा, त्याच्या प्रवृत्तीचा तळ शोधणे हे गहिरे सूत्र या पुस्तकात आहे. मधु दंडवतेंचा लोभस किस्सा उपोद्घातातच दिला आहे. आपल्या तत्त्वांशी, आपल्या माणसांशी प्रतारणा न करण्याला दंडवतेंनी सर्वोच्च पदप्राप्तीच्या महत्त्वाकांक्षेपेक्षाही अधिक किंमत दिली. वानगीदाखल आलेले हे उदाहरण बोलके आहे. आम्ही भारतीय प्रशासकीय सेवेत काम करत असतानाही हा अनुभव घेतो. इतर राज्यांतील अधिकाऱ्यांचा जेव्हा मराठी माणसाशी संबंध येतो तेव्हा- ‘किती साधी, सरळमार्गी, सत्प्रवृत्त माणसे आहेत ही!’ असाच सर्वसाधारण अभिप्राय येतो (म्हणजे, ‘किती घाबरट, बिनमहत्त्वाकांशी, चलाखीचा अभाव असलेली माणसे आहेत ही’ असाही त्याचा अर्थ होऊ शकतो!). महाराष्ट्र कायमच दिल्लीचे तुणतुणे वाजवत राहिला, दुय्यम भूमिका निभावत राहिला, ही महाराष्ट्राची पिढ्यान्पिढ्यांची दुखरी नस कुबेर यांनी कौशल्याने पकडली आहे. मनु, पतंजली, बुद्ध, महावीर, रामायण, महाभारत हे सारे उत्तर भारतातले. त्यामुळे त्या दबावापुढे/प्रभावापुढे महाराष्ट्र किती झुकला, किती वाकला आणि केव्हा आव्हान उभे करून ठाकला, याचा पुस्तकात घेतलेला आढावा आवर्जून वाचायला हवा. ‘हिमालयाच्या मदतीला सह््याद्री गेला धावून’ ही गौरवभिक्षा किती काळ ओरपत राहायची, हा प्रश्न पुस्तकात वेगवेगळ्या संदर्भांत उभा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, पहिले बाजीराव आणि बाळ गंगाधर टिळक हे तीन अपवाद वगळता, महाराष्ट्राने दिल्लीपुढे स्वतंत्ररीत्या आव्हान उभे केले नाही, हे महत्त्वाचे निरीक्षण लेखकाने मांडले आहे. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट, वाकाटक, यादव अशा राजवटींचा प्रदीर्घ दोन हजार वर्षांचा इतिहास लेखकाने रेखाटला आहे.

पण महाराष्ट्राची ही ‘आधी न सांगितलेली कथा’ खास बहरू लागते ती साहजिकच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आजही कायम का आहे, याचे उत्तर पुस्तकात मिळते. जवळपास सर्वच विचारसरणींच्या मंडळींनी शिवाजी महाराजांना ‘आपले’ सिद्ध करायचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे, नेतृत्वगुणांचे वर्णन लेखकाने खूप खुबीने केलेले आहे. शिवाजी महाराजांचे ‘स्वराज्य’ प्रत्येक सामान्य माणसाला आपले वाटत असे. प्रत्येक सामान्य माणूस हा त्यात वाटेकरी होता. प्रत्येक माणसाला राज्य आपले वाटणे याहून नेतृत्वाची कोणती मोठी कसोटी? मुसलमानी सत्तेला आव्हान दिलेला एक हिंदू राजा किंवा मराठी राजा ही शिवाजी महाराजांची खरी ओळख नव्हे. महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची झेप त्याहून किती तरी व्यापक होती. स्वराज्यात सामान्य माणूसच केंद्रस्थानी राहावा व त्याच्यावर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी महाराजांनी केलेल्या नियमावल्या थक्क करणाऱ्या आहेत. त्यांच्याइतका प्रजा आणि सैनिक यांच्याविषयी ममत्व असलेला दुसरा राज्यकर्ता सापडणार नाही. नाहक प्राणहानी त्यांनी कधीच होऊ दिली नाही. वेळप्रसंगी माघार घेतली, तह केले. लढाई का करायची, या प्रश्नाचे उत्तर डोक्यात स्पष्ट नसेल तर लढाई म्हणजे निव्वळ अहंकार आणि सैनिकांचे बळी इतकीच उरते. अशी एकही लढाई महाराजांनी केली नाही.

शिवाजी महाराजांच्या राज्यधोरणाबद्दलही पुस्तकात वाचायला मिळते. पुणे प्रांतात लढाईमुळे शेतकरी पळून गेले, त्यांच्यावर कर्जे होतीच. ती कर्जे महाराजांनी सरसकट माफ केली नाहीत. त्याऐवजी वसुली स्थगित ठेवली. पण शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत देण्याचे (उदा. बैल नसतील तर बैल घेऊन द्यावा, इत्यादी) आदेश अधिकाऱ्यांना दिले आणि जे शेतकरी चांगली पिके घेतील त्यांची कर्जे माफ केली. सैन्य चांगले चालायचे असेल तर सैनिक आणि अधिकाऱ्यांची फळी या दोन्ही गोष्टी उत्तम लागतात. या दोन्ही गोष्टी महाराजांना जवळपास शून्यातून निर्माण कराव्या लागल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महाराजांच्या सैन्याची रचना आजच्या आधुनिक सैन्याप्रमाणे होती. यात ‘कमान्ड अ‍ॅण्ड कण्ट्रोल’ची सुसंबद्ध रचना होती. त्या काळच्या मुघल किंवा इतर कुठल्याही सैन्यात अशी पद्धत नव्हती. महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या, त्यात या सुसंबद्ध रचनेचा मोठा हिस्सा आहे. मराठी माणूस युद्धात जिंकतो आणि तहात हरतो असे म्हटले जाते, आणि ते खरेही आहे. पण शिवाजी महाराज कधीही तहात हरले नाहीत. युद्ध जिंकून नवीन मुलुख मिळवला, की त्याचे व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे आहे, हे त्यांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी व्यवस्थापनात वेचून वेचून माणसे निवडली होती. साधारणपणे जो उत्तम सेनापती असतो तो या व्यवस्थापनात कमी पडतो आणि उत्तम व्यवस्थापक लढाया जिंकू शकत नाही. पण या दोन्ही प्रकारच्या तालेवार मंडळींना एकत्र प्रेमाने सांभाळावे लागते, ही प्रशासनातील मेख महाराजांनी नेमकी जाणली होती.

एरवी साधी राहणी असणाऱ्या महाराजांनी राज्याभिषेकावर मोठा खर्च केला. पाच दिवस चाललेल्या या जंगी सोहळ्यास देशभरातून हजारो निमंत्रित उपस्थित होते. यामागचा महाराजांचा धोरणीपणा खासच. शिवाजी महाराजांची राज्यकारभाराची तत्त्वे, त्यांतली जाती-धर्म समानता, त्यांच्या लष्कराची- विशेषत: आरमाराची रचना… अशा अनेक पैलूंवर पुस्तकात प्रकाश टाकला आहे.

एकोणिसावे शतक ते स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतचा काळ हा महाराष्ट्राच्या दृष्टीने प्रखर विचारमंथनाचा काळ. या काळातील अनेक व्यक्तिमत्त्वांविषयी भरगच्च माहिती पुस्तकात आहे. उदाहरणार्थ, अव्वल दर्जाचे अर्थतज्ज्ञ असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी प्रख्यात अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांना आव्हान देऊन भारताने सुवर्ण विनिमय दर स्वीकारणे कसे अयोग्य ठरेल हे सिद्ध करून दाखवले होते आणि त्यातून पुढे रिझर्व्ह बँकेचा जन्म झाला, तसेच डॉ. आंबेडकरांना वकील म्हणून करावा लागलेला संघर्ष आणि त्यांनी सुरुवातीच्या काळात जिंकलेल्या महत्त्वाच्या खटल्यांची रंजक माहिती पुस्तकात आहे. डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या निर्णयामागे प्रबोधनकार ठाकरेंची भूमिका प्रभावी होती, हेही पुस्तकातून माहीत होते.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, कॉम्रेड डांगे, समाजवादी एस. एम. जोशी अशी विभिन्न विचारांची मंडळी एकत्र आली. या मंडळींच्या वैचारिक भूमिकांमधील तफावतीपेक्षा महाराष्ट्राचे हित वरचढ ठरले आणि मराठी भाषक महाराष्ट्र मुंबईसह अस्तित्वात आला.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे अप्रतिम चित्रण लेखकाने केले आहे. त्यांच्याविषयीच्या प्रकरणाला ‘भारताचे न झालेले सर्वोत्तम पंतप्रधान’ असे शीर्षक देऊन लेखक त्यांच्याविषयीचा आदरभाव व्यक्त करतो. महाराष्ट्र घडवताना यशवंतरावांनी मौलिक दृष्टी दाखवली होती. साहित्य, संगीतादी कलांचे भोक्ते, जाणकार असलेल्या बुद्धिप्रामाण्यवादी यशवंतरावांनी पंचायत राज व्यवस्था, औद्योगिक धोरण अशा देशासाठी आदर्शवत ठरलेल्या योजना आखल्याच; पण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली ‘मराठी विश्वकोश मंडळा’ची स्थापना करून ‘सॉफ्ट पॉवर’चे महत्त्व जाणवून दिले होते. अशा या गुणी नेत्याला विविध घटनांमुळे पंतप्रधानपदावर दावा सांगता आला नाही किंवा तसे धैर्य ते दाखवू न शकल्याचे निर्भीड विवेचन लेखकाने केले आहे.

यशवंतरावांचे पट्टशिष्य शरद पवार यांनी मात्र वेळोवेळी तसे धाडस दाखवल्याचे लेखक दाखवून देतो. हा ऊहापोह करताना, लोकांचा मोठा पाठिंबा असणे हे घातक कसे ठरते, हे लेखकाने दर्शवून दिले आहे. त्यामुळे दरबारी राजकारणी महत्त्वाचे बनत जातात. हे सर्व वाचताना, काळ/देश कोणताही असो, राजकीय सूत्रे (स्वत:च्या सर्वोच्च खुर्चीला जराही शह द्यायची क्षमता ज्याच्यात आहे त्याचा सतत पाणउतारा करणे, त्याला दूर ठेवणे, त्याचा काटा काढणे ही ती सूत्रे!) कशी कायम असतात, याचा प्रत्यय येतो. शरद पवार यांच्या दीर्घ कारकीर्दीत सहकार व साखर उद्योगातून निर्माण झालेली समृद्धी, मराठवाडा विद्यापीठ नामांतर, स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचे धोरण, मोठी औद्योगिक झेप अशा असंख्य पैलूंवर उत्तम विवेचन पुस्तकात वाचायला मिळते. ‘शेतकरी संघटने’च्या शरद जोशींनी शेतीप्रश्न शास्त्रीय पद्धतीने कसे मांडले, याविषयीही लेखकाने लिहिले आहे. तसेच मराठी माणूस, कामगार यांना आपलेसे करत झालेला शिवसेनेचा झंझावाती उदय, वसंतराव भागवतांच्या ‘माधव’ सूत्रामुळे उभे राहिलेले नवे नेतृत्व व अशा अनेक प्रवाहांचा वेध लेखकाने घेतला आहे. प्रमोद महाजनांच्या अकाली जाण्याने देशाच्या सर्वोच्च पदाचे मराठी माणसाचे स्वप्न पुन्हा एकवार भंग पावल्याची हळहळही लेखकाने व्यक्त केली आहे. तथापि, या महान राज्यात इतकी अलौकिक रत्ने निपजलेली आहेत की, दिल्लीपुढे न झुकण्याचे व दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न भंग पावणार नाही. हा मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा मुद्दा लेखकाने ठासून मांडला आहे. सामाजिक-राजकीय घटनाक्रमांमधील बारकावे टिपत असतानाच दादासाहेब फाळके, शिवकर बापूजी तळपदे, शंकर आबाजी भिसे, ‘सर्कस’वाले छत्रे अशा विविध क्षेत्रांतील महानुभावांबद्दलही लेखकाने आत्मीयतेने लिहिले आहे.

अर्थात, महाराष्ट्राचे, महाराष्ट्रीय व्यक्ती-संस्थांचे देदीप्यमान्य कर्तृत्व अडीचशे पानांत समाविष्ट करणे अवघडच. परंतु देशातील सर्वाधिक संपन्न, उल्लेखनीय, कर्तृत्वशाली अशा महाराष्ट्राबद्दलचा हा एक मोलाचा दस्तावेज आहे, हे नक्की. राज्यकर्ते, प्रशासक, अभ्यासक, पत्रकार यांनी हा ग्रंथ अभ्यासायलाच हवा.

लेखक वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 12:14 am

Web Title: girish kuber new book renaissance state story maharashtra akp 94
Next Stories
1 बुकबातमी : अवघड प्रश्नाला सोपे उत्तर!
2 हुकूमशाहीच्या पडद्याआड…
3 परिचय : ते देखे कवी…
Just Now!
X