News Flash

‘दुर्मीळ’ प्रतिभावंत!

ज्येष्ठ लेखिका आणि प्रतिभावान अनुवादक शांता गोखले यांना महाराष्ट्र फाऊंडेशनचा ‘साहित्य जीवनगौरव’ पुरस्कार उद्या पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे.

|| संकल्प गुर्जर

ज्येष्ठ लेखिका आणि प्रतिभावान अनुवादक शांता गोखले यांना महाराष्ट्र फाऊंडेशनचा ‘साहित्य जीवनगौरव’ पुरस्कार उद्या पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने, त्यांच्या प्रदीर्घ अनुवादकार्याचा घेतलेला आढावा..

आधुनिक भारताचे इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काही वर्षांपूर्वी ‘द्वैभाषिक विद्वानांचा उदय आणि ऱ्हास’ या विषयावर निबंध लिहिला होता. त्यांच्या विवेचनाचा आशय असा होता की, साधारणत: १९२० ते १९७० या काळात प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत समर्थपणे विचार आणि लेखन करू शकणाऱ्या भारतीय विद्वानांची संख्या बरीच होती. यामध्ये सी. राजगोपालाचारी ते इरावती कर्वे अशी मांदियाळी दाखवता येऊ  शकते. मात्र, गेल्या पन्नासेक वर्षांत अशा द्वैभाषिक विद्वानांच्या-लेखकांच्या संख्येत क्रमाने घटच होत गेली आणि प्राधान्याने एकाच भाषेत विचार व लेखन करू शकणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत गेले. नेमक्या याच काळात शांता गोखले यांनी दुर्मीळ होत जाणाऱ्या द्वैभाषिक विद्वानांची परंपरा पुढे चालवत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत लेखन केले आहे. मात्र, केवळ द्वैभाषिक असणे इतक्याच कारणासाठी शांता गोखले ‘दुर्मीळ’ आहेत असे नव्हे. स्वतंत्र लेखन करण्याची प्रतिभा आणि क्षमता सिद्ध झालेली असूनही (त्यांच्या आईच्या प्रेरणेने) अनुवादाकडे विशेष लक्ष देऊन मराठीतील अभिजात, उत्तमोत्तम साहित्यकृती इंग्रजीत अनुवादित करून त्यांना आंतरराष्ट्रीय दरवाजे खुले करून देण्यामध्ये शांता गोखले यांचा मोठा वाटा आहे.

इंग्लंडमधील ब्रिस्टल विद्यापीठातून पदवी घेतलेल्या शांता गोखले (जन्म : १९३९) वयाच्या तिशीत निस्सीम इझिकेल या कवी- नाटककार-कलासमीक्षकांमुळे खऱ्या अर्थाने लेखन-अनुवादाकडे वळल्या. गेल्या ५० वर्षांत एक उत्तम लेखक, अनुवादक, नाटककार, समीक्षक, सदरलेखक अशा विविध भूमिकांमध्ये त्या सहजतेने वावरलेल्या आहेत. त्यांनी अनेक सिनेमे (उदा. ‘कथा दोन गणपतरावांची’) आणि माहितीपटांच्या पटकथासुद्धा लिहिलेल्या आहेत. ‘रीटा वेलिणकर’ आणि ‘त्या वर्षी’ या त्यांच्या मराठी कादंबऱ्या प्रसिद्धच आहेत. मराठी नाटय़सृष्टीचा इंग्रजीत इतिहास लिहिलेल्या गोखले यांनी स्वत: ‘अविनाश’ हे नाटक लिहिले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्रातील कलाविषयक पानाचे संपादन त्या करत. त्याशिवाय काही इंग्रजी दैनिकांत त्यांनी नर्मविनोदी शैलीत दीर्घकाळ लेखनही केले आहे.

काम केलेल्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी ठसा उमटवला असला, तरीही गोखले यांची विशेष दखल घ्यावी असे काम अनुवादाच्या क्षेत्रातले आहे. दि. पु. चित्रे यांच्याप्रमाणेच स्वत: उत्तम लेखक असतानाही आपल्या भाषेतील इतर साहित्यकृतींचे अनुवाद करण्यात त्यांनी रस घेतला. चित्रेंमुळे हमीद दलवाई यांच्यासारखा प्रतिभावंत लेखक-कार्यकर्ता राष्ट्रीय स्तरावर इंग्रजी विश्वात जाऊ  शकला. तेच काम गोखलेंनी मराठीतील काही निवडक, चांगल्या पुस्तकांबाबत केले आहे. विष्णुभट गोडसे वरसईकरांनी १८५६-५७ च्या सुमारास उत्तर भारतातील प्रवासाच्या अनुभवावर ‘माझा प्रवास’ हे पुस्तक लिहिले होते. मराठीतील सुरुवातीच्या काळातील एक महत्त्वाचे प्रवासवर्णन मानल्या जाणाऱ्या त्या पुस्तकात १८५७ च्या बंडाविषयी उद्बोधक व वैशिष्टय़पूर्ण माहिती वाचायला मिळते. दुर्गा खोटे या ‘चांगल्या घरातून’ सिनेसृष्टीत गेलेल्या पहिल्या अभिनेत्री. एक विधवा स्त्री ते प्रसिद्ध अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या खोटेंनी ‘मी, दुर्गा खोटे’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले होते आणि ते गाजलेही होते. ही दोन्ही वैशिष्टय़पूर्ण पुस्तके शांता गोखलेंनी इंग्रजीत अनुवादित केली आहेत.

आणखी एक महत्त्वाचे आत्मचरित्र गोखलेंनी अनुवादित केले आहे, ते म्हणजे लक्ष्मीबाई टिळकांचे- ‘स्मृतिचित्रे’! मराठीतील अभिजात वाङ्मयात समाविष्ट केले जाणारे‘स्मृतिचित्रे’ हे पुस्तक प्रबोधनकाळात ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या टिळक पती-पत्नींचे जीवन समजून घेण्यासाठी, तसेच त्यातील प्रांजळपणासाठीही वाचले जाते. शांताबाई कांबळे यांनी लिहिलेले ‘माज्या जल्माची चित्तरकथा’ हे एका दलित स्त्रीने लिहिलेले पहिले आत्मचरित्र मानले जाते. गोखलेंनी त्या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाचा अनुवाद १९८० च्या दशकात ‘फेमिना’ या खास स्त्रियांसाठी वाहिलेल्या इंग्रजी मासिकात छापल्याने त्याच्या उच्चभ्रू वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहचू शकले होते.

उद्धव शेळके (‘धग’) व मकरंद साठे (‘अच्युत आठवले आणि आठवण’) यांच्या कादंबऱ्या इंग्रजीत नेणाऱ्या गोखलेंनी महत्त्वाची मराठी नाटकेही अनुवादित करून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली. विजय तेंडुलकर (‘गिधाडे’, ‘सखाराम बाइंडर’), महेश एलकुंचवार (‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ व ‘युगान्त’ ही त्रिनाटय़धारा), चिं. त्र्यं. खानोलकर (‘अवध्य’) ते सतीश आळेकर (‘बेगम बर्वे’), गो. पु. देशपांडे (‘उद्ध्वस्त धर्मशाळा’) अशा नाटककारांची नाटके गोखलेंनी अनुवादित केली आहेत. २००० साली प्रकाशित झालेला मराठी नाटय़सृष्टीचा इतिहास (‘प्लेराइट अ‍ॅट द सेंटर : मराठी ड्रामा फ्रॉम १८४३ टू द प्रेजेंट’) लिहितानाही त्यांनी १३ समकालीन नाटककारांना ते नाटकाकडे कसे वळले, त्यांना नाटकाविषयी काय वाटते आदी प्रश्नांवर बोलते केले आहे. या मुलाखतींसह ‘सावल्या’, ‘चारचौघी’ व ‘व्हय, मी सावित्रीबाई’ यांसारख्या निवडक आठ नाटकांतील काही भाग गोखलेंनी अमराठी वाचकांच्या सोयीसाठी इंग्रजीत अनुवादित करून छापला आहे. या पुस्तकातून नाटय़सृष्टीचा दीडशे वर्षांचा एक व्यापक पट डोळ्यांसमोर उभा राहतो. नाटककार सत्यदेव दुबे आणि वीणापाणि चावला यांच्या नाटय़प्रवासावर पुस्तके संपादित केलेल्या शांता गोखलेंचे नाटय़क्षेत्र व इतर कलांना दिलेले योगदान इतके मोठे आहे, की त्यांना २०१५ मध्ये ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार लाभला होता.

आपल्या समाजात अनुवादकाला त्याच्या कामाचे श्रेय आणि आर्थिक मोबदला या दोन्ही बाबतीत फारशी प्राप्ती होत नाही. तसेच ‘फिक्शन’चा अनुवाद करणे हे ‘नॉन-फिक्शन’ लेखनाच्या अनुवादापेक्षा कठीण काम असते. मात्र, स्वत: उत्तम लेखक असतानाही शांता गोखले अनुवादाकडे का वळल्या? तर ‘एक प्रकारचा evangelical incentive अनुवादातून मिळतो’ असे त्या स्वत:च सांगतात. आपल्या भाषेतील साहित्य इतर भाषांमध्ये घेऊन जाणे, त्याला आंतरराष्ट्रीय दरवाजे खुले करून देणे हे काम सातत्याने करण्यासाठी केवळ अनुवादाची वा साहित्याची  गोडी असणे पुरेसे नसते. त्यासाठी एका बाजूला आपल्या भाषेत पाय घट्ट रोवलेले असावे लागतात, तर दुसरीकडे बाहेरच्या जगाविषयी कुतूहल-आत्मीयता असावी लागते. त्यामुळेच आत्मकेंद्रित असणे हे लेखकासाठी उपकारक ठरत असले तरीही अनुवादकाला ते मारक ठरते. उलट अनुवादकाच्या मानसिक आणि बौद्धिक प्रेरणा जितक्या जास्त समाजसन्मुख असतील, तितके त्याचे काम अधिक चांगले होते. शांता गोखलेंनी केलेले अनुवाद हे केवळ साहित्यकृती म्हणून महत्त्वाचे नसून त्या कलाकृतींना मराठी समाजाच्या वाटचालीतही महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या अनुवादांमुळे मराठी भाषेचे वैभव असलेल्या साहित्यकृती व्यापक, इंग्रजीभाषिक समूहापर्यंत पोहचू शकल्या. तसेच इंग्रजी अनुवादामुळे त्या कलाकृती पुढे इतर प्रादेशिक भाषांत जाण्याचे मार्ग खुले होतात. शांता गोखलेंच्या कामाकडे या चौकटीत पाहायला हवे. तरच त्याचे खरे महत्त्व आपल्या लक्षात येईल.

एखाद्या लेखकाला जितके महत्त्व द्यायला हवे तितकेच- किंवा काही वेळा त्याहून जास्तसुद्धा- महत्त्व त्या लेखकाचे साहित्य इतर भाषांत अनुवादित करणाऱ्या व्यक्तीलाही द्यायला पाहिजे. कारण अनुवादकाला नुसते भाषांवर प्रभुत्व असून चालत नाही. त्याला लेखकाची भाषा व शैली, त्या भाषेतील विशिष्ट सांस्कृतिक परंपरा जशी अवगत असावी लागते, तसेच ज्या भाषेत अनुवादित करायचे आहे त्या भाषेची व संस्कृतीचीसुद्धा नेमकी जाण असावी लागते. त्याशिवाय लेखनातील विशिष्ट संदर्भ अर्थ व आशयाला धक्का न लावता अनुवादित करताच येणार नाहीत. उदा. कमल देसाईंच्या ‘हॅट घालणारी बाई’ या कादंबरीत नवे फर्निचर घरात ‘हुच्च’ दिसेल अशा अर्थाचे वाक्य आले आहे. त्यातील फर्निचरसाठी वापरलेल्या ‘हुच्च’ या शब्दाचा इंग्रजी अनुवाद कसा करायचा? दुसरे उदाहरण- ‘माज्या जल्माची चित्तरकथा’ या शीर्षकातील ‘चित्तरकथा’ या शब्दातून शांताबाई कांबळे यांच्यासारख्या दलित लेखिकेला जो आशय अभिप्रेत आहे तो इंग्रजीत नेमकेपणे कसा व्यक्त करता येईल? ‘चित्तरकथा’ या शब्दासाठी सहा शब्दकोश पालथे घालूनही शांता गोखलेंना अचूक शब्द सापडला नाही. मात्र, अचूक प्रतिशब्द शोधणे आणि तो सापडत नसेल, तर त्या शीर्षकाचा अन्वयार्थ नेमकेपणे पकडू शकेल अशा रीतीने ‘द स्टोरी ऑफ माय टॅटर्ड लाइफ’ असा अनुवाद करणे हे स्वतंत्र लेखन करण्याइतकेच सर्जनशील काम आहे. आज वय ऐंशीच्या घरात असले तरीही गोखलेंना डॉ. श्री. व्यं. केतकरांचे ‘ब्राह्मणकन्या’ आणि साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ या दोन पुस्तकांचे अनुवाद करायचे आहेत.

महाराष्ट्र फाऊंडेशनच्या साहित्य जीवनगौरव पुरस्कारासाठी शांता गोखलेंचे अभिनंदन करतानाच त्यांच्यासारखे द्वैभाषिक लेखक-विचारवंत का ऱ्हास पावले आणि या ऱ्हासामुळे आपल्या समाजाचे किती सांस्कृतिक-वैचारिक नुकसान झाले आहे, यावरही विचार करायला हवा.

sankalp.gurjar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 12:02 am

Web Title: loksatta book review 33
Next Stories
1 आत्मवृत्तांच्या (आगामी) तऱ्हा..
2 हृदयाचे गूढ उकलताना..
3 तीन ‘वादां’चा साहित्य जागर!
Just Now!
X