15 July 2020

News Flash

चित्र-प्रदेशात अ‍ॅलिस!

‘अ‍ॅलिस’ची अद्भुतकथा १५५ वर्षांत चित्रांमुळेसुद्धा ग्रंथजगताच्या इतिहासाचा ठेवाच ठरते..

जयप्रकाश सावंत

‘अ‍ॅलिस’ची अद्भुतकथा १५५ वर्षांत चित्रांमुळेसुद्धा ग्रंथजगताच्या इतिहासाचा ठेवाच ठरते..

‘अ‍ॅलिस इन वंडरलँड’ या अक्षर साहित्यकृतीला १५५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘लिटहब’ या आंतरजालावरील दैनिक साहित्यपत्रिकेने तिच्या ४ मे १९२० च्या अंकात ‘अ‍ॅलिस’च्या चाहत्यांसाठी एक मौलिक ठेवा उपलब्ध करून दिला आहे.  ४ मे हीच तारीख निवडण्याचं कारण म्हणजे ‘अ‍ॅलिस’चा निर्माता चार्ल्स डॉजसन ऊर्फ लुइस कॅरल याने नौकाविहार करत असताना त्याच्यासोबत असलेल्या ज्या दहा वर्षांच्या अ‍ॅलिस लिड्ल हिला ही गोष्ट सांगितली होती, तिचा हा जन्मदिवस. वरील अंकात ‘अ‍ॅलिस’च्या वेगवेगळ्या प्रतींसाठी चित्रं काढणाऱ्या अनेक चित्रकारांपैकी वीस चित्रकारांची चित्रं दिली आहेत. ज्या पुस्तकाची सुरुवातच त्यातल्या नायिकेच्या ‘चित्रं किंवा संवाद नसलेल्या पुस्तकांचा काय उपयोग?’ या उद्गाराने होते, त्याला दिलेली ही मानवंदना औचित्यपूर्ण म्हणावी लागेल. इथे कॅरलने त्याच्या १८६४च्या मूळ हस्तलिखितात स्वत: काढलेल्या  (चित्र क्र. १) चित्रांपासून ते प्रसिद्ध बालसाहित्यकार व चित्रकार अँथनी ब्राऊन यांनी काढलेली  २०१५ सालची चित्रं आपल्याला पाहायला मिळतात. कॅरलची स्वत:ची चित्रंही खरं तर चांगली होती; पण त्यांत सफाई नव्हती. तेव्हा व्यावसायिक यशाच्या दृष्टिकोनातून ‘अ‍ॅलिस’च्या १८६५ सालच्या पहिल्या छापील आवृत्तीसाठी, त्या काळातला ‘पंच’ साप्ताहिकाचा नामवंत व्यंगचित्रकार जॉन टेनिअल याच्याकडून चित्रं करून घेण्यात आली (चित्र क्र. २ ). या चित्रांचीही गणना आता क्लासिक सदरात होते, तरीही अनेक प्रकाशकांना वेळोवेळी वेगळ्या चित्रकारांकडून ‘अ‍ॅलिस’ची सजावट करून घ्यायचा मोह होत असतो आणि चित्रकारही या कामासाठी उत्सुक असतात. शिवाय ‘अ‍ॅलिस’ हे जगातील सर्वाधिक भाषांतरित झालेल्या पुस्तकांपैकी एक आहे व त्यामुळे त्या-त्या भाषेत काम करणाऱ्या रेखाटनकारांकडूनही सजावट करून घेतली जाते. ‘लुइस कॅरल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका’चे अध्यक्ष मार्क बस्र्टीन यांनी म्हटलंय की, या पुस्तकात  कॅरलने त्यातल्या व्यक्तिरेखांची किंवा घटनास्थळांची काटेकोर वर्णनं करायचं टाळलं असल्याने चित्रकारांना ती आपल्या कल्पनेतून रेखाटून पाहावीशी वाटत असावीत. यामुळे हे एक सर्वाधिक चित्रकारांनी सजावट केलेल्यांतलं पुस्तक ठरलंय. न्यू यॉर्कच्या पब्लिक लायब्ररीत तब्बल १५०० वेगवेगळ्या  चित्रकारांनी सजवलेल्या ‘अ‍ॅलिस’च्या प्रती असल्याचं सांगण्यात येतं.

‘लिटहब’च्या या अंकात ‘अ‍ॅलिस’च्या १८९९ सालातल्या पहिल्या अमेरिकन आवृत्तीतली चित्रं आहेत. या पुस्तकाच्या स्वीडिश आणि जपानी भाषेतल्या अनुवादांमधली चित्रं आहेत. पेंग्विनने यायोई कुसामा या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जपानी चित्रकर्तीकडून सजावट करून घेतलेली  (चित्र क्र. ३) इंग्रजी भाषेतलीच एक आवृत्ती २०१२ मध्ये प्रकाशित केली, तिच्यातील चित्रंही या अंकात दिली आहेत.  सर्रिअ‍ॅलिस्ट चित्रकार मॅक्स अर्न्‍स्ट याने काढलेल्या ‘अ‍ॅलिस’ शीर्षकाच्या अनेक चित्रांतल्या, न्यू यॉर्कच्या मॉडर्न आर्ट म्युझियममध्ये असलेल्या चित्राची छायाप्रतही इथे पाहायला मिळते.

अर्थात इथे उपस्थित असलेल्या चित्रकारांमधलं, किंबहुना ‘अ‍ॅलिस’च्या सर्व चित्रकारांमधलं सर्वात थोर नाव म्हणजे साल्व्हादोर दाली  (चित्र क्र. ४). रँडम हाऊस प्रकाशन संस्थेतल्या कुठल्या बुद्धिमान संपादकाला ‘अ‍ॅलिस’मधली फँटसी आणि दालीची कला यांतला संबंध लक्षात आला याची नोंद नाही; पण त्याच्यामुळे दालीने सजावट केलेली अ‍ॅलिसची एक विशेष आवृत्ती मिसिनस प्रेस/ रँडम हाऊसतर्फे १९६९ साली प्रकाशित झाली. दालीने तिच्यातील बारा प्रकरणांसाठी प्रत्येकी एक आणि शीर्षकपानासमोर छापायला एक अशी तेरा चित्रं करून दिली. साडेअठरा गुणिले तेरा इंचांच्या सुटय़ा पानांची ही प्रत मोरोक्कोत चामडय़ाच्या पेटीत काळजीपूर्वक बंद करून तिची फक्त २५०० प्रतींची आवृत्ती प्रसृत करण्यात आली, ज्यामुळे लवकरच ही प्रत दुर्मीळ आणि न परवडणाऱ्या पुस्तकांच्या यादीत दाखल झाली. मात्र सुदैवाने पाच वर्षांपूर्वी ‘अ‍ॅलिस’ला १५० वर्ष झाल्याच्या निमित्ताने प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेसने दालीची तीच चित्रं वापरून एक नवी आवृत्ती ‘अ‍ॅलिस’ आणि दालीच्या चाहत्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

हे सर्व वाचताना मला ‘अ‍ॅलिस इन वंडरलँड’चा एक संग्राहक जोएल बिरेनबॉम याची आठवण आली. पुस्तक संग्राहकांच्या जगाशी कसलाही संबंध नसलेला बिरेनबॉम एका अतक्र्य योगायोगातून पट्टीचा संग्राहक कसा बनला याची कथा ‘रेअर बुक्स अनकव्हर्ड’ या रिबेका रेगो बॅरीलिखित पुस्तकात वाचायला मिळते. अमेरिकेतील व्हॉयेजर प्रेस या प्रकाशनाने २०१५ साली प्रकाशित केलेल्या या पुस्तकात दुर्मीळ पुस्तकं शोधकांच्या पन्नासांहून अधिक कथा आहेत. त्यांतली ही बिरेनबॉमची कथा आगळीच आहे. साहित्यात फारसा रस नसलेला जोएल बिरेनबॉम हा इंजिनीअर शिकागोच्या वेस्टर्न इलेक्ट्रिक नावाच्या कंपनीत नोकरी करत होता. १९७९ सालातल्या एके दिवशी सहज गप्पा मारायला म्हणून तो आपल्या सहकारी मित्राच्या केबिनमध्ये गेला. हा मित्र टेलिफोनवर दुसऱ्या कोणाशी बोलत असल्याने बिरेनबॉम त्याच्या टेबलावर पडलेलं ‘शिकागो सन-टाइम्स’ हे वर्तमानपत्र उचलून चाळू लागला. बिरेनबॉमने नंतर सांगितल्यानुसार ‘शिकागो सन-टाइम्स’ हे काही त्याचं नेहमीचं वर्तमानपत्र नव्हतं आणि ते तो कधी वाचतही नसे. त्या दिवशी इतर काही हाताशी नसल्याने त्याने ते पाहिलं एवढंच. या वर्तमानपत्रातल्या एका जाहिरातीने त्याचं लक्ष वेधून घेतलं. त्या जाहिरातीतली व्यक्ती साल्वादोर दालीची चित्रं असलेली ‘अ‍ॅलिस इन वंडरलँड’ या पुस्तकाची प्रत १७५ डॉलर्सना विकू इच्छित होती.

ही दोन्ही नावं बिरेनबॉमच्या परिचयाची होती. किशोरवयात अभ्यास-सहलीचा भाग म्हणून त्याने न्यू यॉर्कच्या मेट्रोपोलिटन म्युझियमला भेट दिली होती आणि त्या वेळी तिथे पाहिलेल्या दालीच्या ‘क्रुसिफिक्शन’ या भव्य चित्राने त्याला भारावून टाकलं होतं. अशाच तऱ्हेने ब्रुकलिनच्या टेक्निकल हायस्कूलमध्ये शिकत असताना त्याचा ‘अ‍ॅलिस’शीही संबंध आला होता. इंग्रजी भाषेच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून त्याला एका साहित्यकृतीवर बोलायचं होतं आणि त्याला ते अवघड वाटत होतं. तेव्हा त्याच्या शिक्षकांनी त्याला मार्टिन गार्डनर संपादित ‘अनोटेटेड अ‍ॅलिस इन वंडरलँड’ची प्रत दिली, जिच्यातील गार्डनरच्या नोंदींचा आधार घेऊन त्याला आपलं भाषण सजवता आलं होतं. यामुळे ही दोन्ही नावं एकत्र आलेली पाहून त्याला कुतूहल वाटलं. त्याने थोडी अधिक चौकशी केली तेव्हा शिकागोतल्या एका ग्रंथालयाच्या ग्रंथपालाकडून त्याला या विशेष आवृत्तीबद्दल अधिक माहिती मिळाली. त्याला हेही कळलं की दुर्मीळ पुस्तकांच्या बाजारात तिची किंमत ६०० डॉलर्सच्या आसपास आहे. (हा लेख लिहिताना मी सहज गूगलवर शोध घेतला तर मला तिचं त्या खास पेटीसहितच्या प्रतीचं  दर्शन घडलं : किंमत फक्त तेरा हजार डॉलर्स.. सुमारे! )

तर साहजिकच बिरेनबॉमने त्या जाहिरातीत दिलेल्या नंबरावर फोन केला आणि वेळ ठरवून तो दिलेल्या पत्त्यावर गेला. ते एक लहानसं घर होतं आणि एक तरुण मुलगा ‘अ‍ॅलिस’ची प्रत घेऊन तिथे त्याची वाट बघत होता. तो ज्या तऱ्हेने थोडाही डाग लागू नये म्हणून पांढरेशुभ्र हातमोजे घालून पुस्तक हाताळत होता, ते पाहून बिरेनबॉम प्रभावित झाला. पुस्तक घेऊन बिरेनबॉम घरी आला. पण त्याच्या आयुष्यातील ‘अ‍ॅलिस’विषयीचा योगायोग एवढय़ावर संपायचा नव्हता. त्याच्या वहिनीला (किंवा मेहुणीला – सिस्टर-इन-लॉ!) त्याच्या या खरेदीबद्दल कळलं. ती ग्रंथपालनशास्त्राची प्राध्यापक होती आणि स्वत:ही लहान मुलांच्या पुस्तकांची  संग्राहक होती. तिने त्याला ग्रॅहम ओवेंडेनचं ‘इलस्ट्रेटर्स ऑफ अ‍ॅलिस’ हे पुस्तक विकत घेऊन ‘अ‍ॅलिस’च्या वेगवेगळ्या प्रतींचा त्याचा स्वत:चा संग्रह करण्याबद्दल सुचवलं. इथून बिरेनबॉमचा संग्राहक बनण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. ठिकठिकाणच्या दुकानांना, प्रदर्शनांना भेट देत त्याने ‘अ‍ॅलिस’च्या प्रती जमवायला सुरुवात केली आणि त्यात नकळत गुंतून गेला. रिबेका बॅरी यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं (२०१५), त्या वेळी बिरेनबॉमच्या संग्रहात ‘अ‍ॅलिस’च्या १२२२ वेगवेगळ्या प्रती जमा झाल्या होत्या. त्यांतल्या १८० जॉन टेनिअलच्या चित्रांसहित होत्या; तर ६०५ प्रतींना वेगळ्या चित्रकारांची सजावट होती; आणि ४३७ विविध भाषांमधली भाषांतरं होती. बॅरीबाईंनी दिलेल्या माहितीनुसार बिरेनबॉमने नंतर स्वत:च ‘अ‍ॅलिस इन वंडरलँड’च्या संग्राहकांचं एक मंडळ स्थापन केलं. पुढे तो ‘लुइस कॅरॉल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका’ या संस्थेचा काही काळ अध्यक्षही झाला! आहे की नाही हे सारं , कॅरलची अ‍ॅलिस म्हणते त्याप्रमाणेच, ‘क्युरिअसर आणि क्युरिअसर’?

 

‘लिटहब’च्या अंकातली ही वीस चित्रकारांची चित्रं पुढील दुव्यावर पाहता येतील : https://lithub.com/20-artists-visions-of-alice-in-wonderland-from-the-last-155-years/

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 3:51 am

Web Title: pictures of 20 artist in wonderful story of alice zws 70
Next Stories
1 मुरब्बी (व्हीपी) मेनन..
2 मराठीतल्या जाई, नंदा..
3 आरोग्य क्षेत्राची अस्वस्थता!
Just Now!
X