News Flash

धाडसी पत्रकाराचे वृत्तांकनानुभव…

पाश्चात्त्य वृत्तपत्रे ब्राझीलचे सध्याचे अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांचे वर्णन ‘ट्रम्प ऑफ द ट्रॉपिक्स’ असे करतात.

एडवर्ड स्नोडेन आणि ग्लेन ग्रीनवाल्ड

|| अजिंक्य कुलकर्णी

‘व्हिसल ब्लोअर’ ठरलेल्या एडवर्ड स्नोडेनने स्वत:कडील डिजिटल बाड पत्रकार ग्लेन ग्रीनवाल्ड यांच्याकडे दिले. त्या माहितीच्या आधारे ग्रीनवाल्ड यांनी केलेले वार्तांकन आणि त्यादरम्यान त्यांना आलेले अनुभव, यांकडे मागे वळून पाहणाऱ्या पुस्तकाविषयी…

 

एडवर्ड स्नोडेन याने अमेरिकी गुप्तचर संस्था नॅशनल सिक्युरिटी एजन्सी अर्थात एनएसएची इराक, अफगाणिस्तान युद्धासंबंधित संगणकीय व्यवस्थेत उपलब्ध गुप्त कागदपत्रे, माहिती ‘हॅक’ करून फोडली. ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’चे धाडसी पत्रकार ग्लेन ग्रीनवाल्ड यांच्याकडे या सर्व गुप्त माहितीचे डिजिटल बाड स्नोडेनने हाँगकाँगमध्ये झालेल्या भेटीत सुपूर्द केले. पुढे ग्रीनवाल्ड ही माहिती अभ्यासून मानवतेला काळिमा फासणाऱ्या युद्धासंदर्भात खळबळजनक तथ्ये सादर करतात आणि अमेरिकेचा ‘(स्वयंघोषित) लोकशाहीचा पुरस्कर्ता’ हा मुखवटा उतरवतात. २०१२ साली ग्रीनवाल्ड यांनी स्नोडेनकडून मिळालेल्या या माहितीच्या आधारे ‘द गार्डियन’मध्ये वृत्तांकन केले. ग्रीनवाल्ड २०१८ नंतर पुन्हा चर्चेत आले ते ब्राझीलचे नवनिर्वाचित अध्यक्ष जाइर बोल्सोनारो आणि ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सर्जिओ मोरो यांनी केलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडणाऱ्या वार्तांकनामुळे. ग्रीनवाल्ड यांनी या सर्व वार्तांकनांविषयीचे अनुभव ‘सीक्र्युंरग डेमॉक्रसी : माय फाइट फॉर प्रेस फ्रीडम अ‍ॅण्ड जस्टिस इन बोल्सोनारोज् ब्राझील’ या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात मांडले आहेत. ग्रीनवाल्ड हे मूळचे उत्तर अमेरिकेतले, पण गेल्या दीड दशकापासून ते दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमध्ये स्थायिक झाले आहेत.

पाश्चात्त्य वृत्तपत्रे ब्राझीलचे सध्याचे अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांचे वर्णन ‘ट्रम्प ऑफ द ट्रॉपिक्स’ असे करतात. ब्राझीलमध्ये २१ वर्षे चालत आलेली लष्करी हुकूमशाही १९८५ मध्ये संपुष्टात आली. त्यालगतच्या काळात लष्करात कॅप्टन पदावर असलेले आणि पुढे काँग्रेसचे- म्हणजे तिथल्या केंद्रीय कनिष्ठ सभागृहाचे- सदस्य झालेले बोल्सोनारो २०१८ मध्ये ब्राझीलचे अध्यक्षही झाले. मात्र, या बोल्सोनारो यांचा ब्राझीलमधील कारभार लष्करी राजवटीच्याच दिशेने सुरू आहे. एका भाषणात ते म्हणाले, ‘मी अजूनही पुरेसे लोक मारलेले नाहीत. माझ्या विरोधकांचा अजून मी तितकासा मोठा छळ केलेला नाहीये.’ बोल्सोनारो ही अशी वक्तव्ये वारंवार करतात; कारण त्यांना सतत माध्यमांचे लक्ष स्वत:वर केंद्रित ठेवायचे असते. तर… ग्रीनवाल्ड यांना एका अज्ञात संगणक हॅकरने ब्राझीलमधील मोठमोठ्या राजकीय व्यक्तींची डिजिटल संभाषणे, त्यांच्या मोबाइलमधील लघुसंदेश यांचा दस्तावेज दिला होता. ते वाचून-ऐकून ग्रीनवाल्ड यांना ब्राझीलमधील उच्चपदस्थांचा भ्रष्टाचार ध्यानात आला. अध्यक्ष झाल्यावर बोल्सोनारो भाषणात म्हणाले की, ‘आपले पहिले काम हे ब्राझीलला ‘फोल्ह्या डी साओ पाउलो’मुक्त (ब्राझीलमधील सर्वात प्रसिद्ध वर्तमानपत्र) करण्याचे असेल.’ पत्रकारांबद्दल त्यांची ही अशी वक्तव्ये नेहमीचीच झालेली होती. ‘साओ पाउलो’ या वर्तमानपत्राने २०१८ च्या अध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारात बोल्सोनारो यांच्या पक्षाचा अवैध अर्थपुरवठा उघडकीस आणला होता. बोल्सोनारो यांच्यापेक्षाही त्यांचे सरकार भयंकर आहे. बोल्सोनारो सरकारमध्ये माजी न्याय आणि सार्वजनिक सुरक्षामंत्री असलेले सर्जिओ मोरो यांनी ब्राझीलमधील बड्या धनिकांना चौकशीविनाच गजाआड केले होते. मोरो यांच्या या ‘सिंघमगिरी’मुळे आज ते बोल्सोनारो यांच्यापेक्षाही जास्त प्रसिद्धीझोतात आलेले आहेत. पण न्यायमंत्रीच असे अन्यायकारक वागत असेल, तर ‘कायद्याचे राज्य’ आहे असे म्हणता येईल का, हा मोठा प्रश्नच आहे?

‘टाइम’ साप्ताहिकाने २०१६ साली जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये या सर्जिओ मोरोंची गणना केली होती. त्यांचा असा हा प्रभाव पडण्याचे कारण म्हणजे २०१४ साली ब्राझीलमध्ये झालेले एक मोठे तपास प्रकरण, जे ‘ऑपरेशन कार वॉश’ या नावाने प्रसिद्ध आहे. या तपास यंत्रणेचे न्यायाधीश म्हणून मोरो यांनी काम पाहिले होते. धडाधड तपासणी परवाना (सर्च वॉरंट्स) काढण्याचा आणि ‘पेट्रोब्रास’ या तेल कंपनीमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा सपाटाच लावला होता मोरोंनी. या ‘ऑपरेशन कार वॉश’बद्दल पुस्तकातच वाचलेले बरे! ‘ऑपरेशन कार वॉश’नंतर मोरो यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. ‘ऑपरेशन कार वॉश’च्या वकिलांची फौज डाव्या विचारसरणीकडे झुकलेली होती. साहजिकच या प्रकरणातून वाचण्यासाठी मोरो यांना बोल्सोनारोंची आणि बोल्सोनारो यांना मोरोंची गरज होती.

ग्रीनवाल्ड यांना याबद्दलची सर्व माहिती एका अज्ञात हॅकरने दिली होती. त्या मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी ती त्यांनी माहिती-तंत्रज्ञान तज्ज्ञाकडे पाठवली. ही माहिती बाहेर येऊ नये यासाठी मोरो यांनी पोलिसांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. ग्रीनवाल्ड यांनी गुन्हा केला आहे, त्यांना अटक करा, असेही ते म्हणाले. तर इकडे ग्रीनवाल्ड यांची ट्विटर, फेसबुक व इतर समाजमाध्यमांवर बदनामी करण्याची मोहीमच बोल्सोनारो समर्थकांकडून उघडली गेली होती, असे ग्रीनवाल्ड म्हणतात. त्या मोहिमेची पातळी इतकी घसरली होती की, बोल्सोनारो यांनी ग्रीनवाल्ड आणि डेव्हिड मिरांडा (विरोधी पक्षाचे तरुण नेते) यांच्या समलैंगिक विवाहावरून अगदी शेलक्या शब्दांत शेरेबाजी केली होती. डेव्हिड हे ब्राझीलमधील डाव्या विचारांच्या पक्षाकडून संसद सदस्य आहेत. या शेरेबाजीबद्दल बोल्सोनारोंविरुद्ध या दोघांनी तक्रार केली, तेव्हा बोल्सोनारो यांचे स्पष्टीकरण असे : ‘मी तर ते अगदी उपरोधाने बोललो होतो.’ अमेरिकेच्या भूमीवर ज्या ज्या ठिकाणी डाव्या विचारसरणीने डोके वर काढण्याचा थोडा जरी प्रयत्न केला, तरी तिचा समूळ नायनाट करणे हे जणू आपले धर्मकर्तव्यच असल्याप्रमाणे अमेरिकेकडून होणारे वर्तन हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही.

१९६४ साली ज्यो गुलार्त यांचे डाव्या विचारसरणीचे सरकार बहुमताने निवडून आले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी सीआयए व ब्राझीलच्या लष्करातील अधिकाऱ्यांच्या मदतीने गुलार्त यांच्या पक्षातील सदस्यांना उरुग्वेमध्ये पलायन करण्यास भाग पाडले होते. सुरुवातीला अमेरिकेने आणि सीआयएने आपला यात सहभाग आहे हे नाकारले; पण काही दशकांनंतर यासंबंधी कागदपत्रे बाहेर पडली, तेव्हा मात्र हे कबूल करण्यावाचून अमेरिकेपुढे पर्याय नव्हता. ब्राझीलमध्ये लष्करी हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवण्यास आणि लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पहिली ठिणगी पडली ती १९७५ साली. ‘कल्चर टीव्ही’ या वृत्तवाहिनीचे संपादक व्लादिमिर हरजोग यांचा खून करून लष्कराने त्या खुनाला आत्महत्या ठरवण्याचा प्रयत्न केला होता. राबी सोबेल हे तेथील सुधारणावादी नेतेदेखील म्हणाले होते की, ‘ब्राझीलने लोकशाहीकडे पुन्हा वाटचाल करण्यास हरजोग यांचा खून उत्प्रेरक ठरला.’

अमेरिकेने ब्राझीलपुढे अशा अडचणी निर्माण करण्याची कारणे ग्रीनवाल्ड स्पष्ट करतात. पहिले कारण म्हणजे, २००३ ते २०११ या काळात ब्राझीलने सर्व क्षेत्रांत घेतलेली झेप, तसेच अमेरिकेच्या टाचेखाली राहणे हे ब्राझील वारंवार धुडकावून लावू लागला. शिवाय ‘ब्रिक्स’ संघटनेतले ब्राझीलचे स्थानही अमेरिकेला सहन होणारे नव्हते. ब्राझील आणखी एका गोष्टीसाठी महत्त्वाचा आहे. ती म्हणजे ब्राझीलच्या भूमीत सापडणारी अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती. ब्राझीलमध्ये ही नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात आहे, यावर शास्त्रज्ञांचे एकमत आहे. दुसरे म्हणजे, अ‍ॅमेझॉनचे खोरे. वर्षाला ४० दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइडपैकी एकटे अ‍ॅमेझॉनचे जंगल २४ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड जिरवते. २०१९ साली ब्राझीलच्या अ‍ॅमेझॉन जंगलात आग लागली होती. याला राजकीय अंगाने वाचा फोडली ती फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केलेल्या एका ट्वीटने. त्या ट्वीटवर बोल्सोनारो यांनी मॅक्रॉन यांच्या पत्नीवरून अतिशय अश्लाघ्य असे रिट्वीट केले होते. अ‍ॅमेझॉनला लागलेली आग तिच्या नैसर्गिक वेगाने जंगलाला आपल्या कवेत घेत नव्हती, तर एका व्यक्तीच्या धोरणलकव्यामुळे व चुकीच्या विचारसरणीमुळे पसरत जात होती. ती व्यक्ती अर्थात बोल्सोनारोच! अ‍ॅमेझॉनच्या जंगलाला लागलेली आग पेटती का ठेवली गेली? कारण त्या जंगलात राहणाऱ्या आदिवासींना मिळणारे कायद्याचे जबरदस्त संरक्षण. आदिवासींना बळजबरीने जंगलातून काढता येत नव्हते. बोल्सोनारो यांनी जंगल संरक्षण करणाऱ्या संस्थांचे अधिकारही कमी करून टाकले होते. हे सर्व करण्याचे कारण जंगलतोड करून बोल्सोनारो यांना जागा ‘डेव्हलप’ करायची होती आणि ‘चांगले उद्योग’ स्थापन करायचे होते.

ग्रीनवाल्ड यांनी जेव्हा एडवर्ड स्नोडेनबद्दल ‘द गार्डियन’मध्ये वार्तांकन करण्यास सुरुवात केली, तेव्हा ब्रिटिश सरकार त्यावर प्रचंड संतप्त झाले होते. म्हणून स्नोडेनशी संबंधित वार्तांकन करणारे जे जे पत्रकार असतील त्यांना लंडनच्या हीथ्रो विमानतळावर अडवण्यात आले. या चमूमध्ये सिने-दिग्दर्शिका लॉरा पोइट्राज यासुद्धा होत्या. ग्रीनवाल्ड यांचे पती डेव्हिड मिरांडांवर तर दहशतवादी कायद्याअंतर्गत कारवाई झाली. हीथ्रो विमानतळावर नऊ तास चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या सगळ्यांच्या ताफ्यातून फक्त डेव्हिड मिरांडांचीच निवड का केली गेली? कारण स्पष्ट करताना ग्रीनवाल्ड म्हणतात, त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनीच हे कबूल केले की, डेव्हिडचीच निवड करण्याचे कारण म्हणजे ते ना ब्रिटिश आहेत ना अमेरिकी, ते ब्राझीलियन होते म्हणून. दुसरे कारण ते कृष्णवर्णीय आहेत व इतर सर्व मंडळी ही श्वेतवर्णीय होती.

पत्रकारितेत येऊ पाहणाऱ्या किंवा असलेल्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकते. एखाद्या अज्ञात व्यक्तीकडून आपल्याला काही माहिती मिळत असेल, तर त्या व्यक्तीशी कशा प्रकारे बोलले पाहिजे; ती व्यक्ती देत असलेली माहिती खात्रीशीर आहे का, की आपल्यालाच फसवण्यासाठी काही जाळे विणले जात आहे, याबद्दलची सतर्कता कशी बाळगावी याचे धडेही अप्रत्यक्षरीत्या हे पुस्तक देऊन जाते. एडवर्ड स्नोडेनसंबंधी वार्तांकन चालू असताना एका टीव्ही पत्रकाराने ग्रीनवाल्ड यांना विचारले की, इतके खळबळजनक वार्तांकन करत असताना अमेरिकी सरकारने काही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला नाही का? किंवा इतर कुणाकडूनही तुम्हाला धमकावण्याचा काही प्रयत्न झाला नाही का? ग्रीनवाल्ड यांनी उत्तर दिले : ‘नाही’! साहजिकच आपल्याकडील पत्रकारितेशी याची तुलना करणे हे ओघाने आलेच. आपल्याकडे पत्रकारांनी वार्तांकन केले की त्यांना धमकावण्याचे फोन्स, ईमेल्स येणे; महिला पत्रकाराच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाणे; संपादकांवर हल्ले करणे, कुजबुज मोहिमा चालवणे, वगैरे चित्र समोर येते. आणखी एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे- युरोपीय आणि अमेरिकी पत्रकारांना मिळणारे कायद्याचे भरभक्कम संरक्षण! शेवटी ग्रीनवाल्ड म्हणतात की, मी जे काही केले ते ब्राझीलमधील लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या मजबुतीसाठी केले. हे असे केल्यामुळेच मला बरे वाटते. यातच लोकांचे हित सामावलेले आहे.

ajjukul007@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 12:13 am

Web Title: reporting experience of a brave journalist akp 94
Next Stories
1 बुकबातमी : ‘द गार्डियन’ची २०० वर्षं!
2 अव-काळाचे आर्त : अक्षर नुरले ‘अ-क्षर’
3 बातमीमागची पुस्तके…
Just Now!
X