‘द रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर’ ही ब्रिटनमधील जुन्या साहित्यिक संस्थांपैकी एक. किती जुनी? तर सुमारे २०० वर्षे. चौथ्या जॉर्जने १८२० मध्ये तिची स्थापना केली. तेव्हापासून ही संस्था इंग्रजी साहित्याच्या प्रसाराचे काम करते आहे. आणि यात नामवंत इंग्रजी साहित्यिक संस्थेचे मानद सदस्य म्हणून सहभागी होत आले आहेत. त्यात सॅम्युएल कोलरिज, जे. आर. आर. टॉल्कीन, डब्ल्यू. बी. यीट्स, रुडयार्ड किपलिंग, जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्यापासून ते आर्थर कोस्लर, चिनुआ आचेबे, मार्गारेट अ‍ॅटवूड, झेदी स्मिथ, जे. के. रोलिंग अशा अनेक साहित्यिकांचा समावेश आहे; आणि या नावांमध्ये दरवर्षी भर पडतच असते. शिवाय संस्थेतर्फे एक द्वैवार्षिक नियतकालिकही काढले जाते व काही पुरस्कारही दिले जातात आणि साहित्यविषयक कार्यक्रम तर नेहमीचेच..

असा सर्व या सोसायटीच्या कामाचा पसारा. परंतु सोसायटीविषयी इथे लिहिण्याचे आताचे कारण म्हणजे या आठवडय़ात सोसायटीतर्फे जाहीर झालेला सर्वेक्षण अहवाल. हे सर्वेक्षण होते- वाचकांचे. तुम्ही काय वाचता? किती वाचता? कोणता साहित्यप्रकार अधिक वाचता? कोणत्या साहित्यिकाचे साहित्य अधिक भावते? आदी प्रश्न या सर्वेक्षणात विचारले गेले. त्यात २००० वाचकांनी उत्तरे दिली. त्यातल्या ८१ टक्के  वाचकांनी साहित्य हे संवेदनशीलतेला आवाहन करणारे असल्याने आपण ते वाचतो, असे सांगितले.   पण साहित्याविषयी अशी उदार भूमिका घेणाऱ्या वाचकांना त्यांच्या पुस्तक व लेखकांविषयीच्या वैयक्तिक आवडीनिवडीविषयी विचारल्यावर मात्र त्यांच्या वाचकप्रवृत्तीचा निराळाच कोन समोर आला. या वाचकांच्या वाचनप्रेरणांवर गोऱ्या वंशवर्चस्वाचा, पुरुषप्रधान आणि मध्यमवर्गीय धारणांचाच प्रभाव असल्याचा निष्कर्ष या अहवालातून पुढे आला आहे. या दोन हजार वाचकांनी मिळून तब्बल ४०० लेखकांची नावे नोंदवली. त्यात केवळ २८ साहित्यिक हे कृष्णवर्णीय, आशियाई व अल्पसंख्याक वर्गातील होते. नव्याने लिहित्या झालेल्या या वर्गातील लेखक या वाचकांच्या नोंदींमधून फारसे दिसलेच नाहीत. यात सर्वाधिक पसंती शेक्सपिअरला मिळाली, तर त्याखालोखाल चार्ल्स डिकन्सचे नाव नोंदवले गेले.

ब्रिटनमधील वाचकप्रवृत्तीवर या अहवालाने केलेले भाष्य सध्या चर्चेत आले आहे. तो अहवाल सोसायटीच्या rsliterature.org  या संकेतस्थळावर पाहता येईल.