वन्यजीवशास्त्रज्ञ रौफ अली यांच्या निवडक लेखांचा हा संग्रह- भारतीय पर्यावरणशास्त्राची घडण कशी झाली, हे सांगणारा..

  • ‘रनिंग अवे फ्रॉम एलेफन्ट्स’
  • लेखक : रौफ अली
  • प्रकाशक : स्पीकिंग टायगर
  • पृष्ठे : २२२, किंमत : ४९९ रुपये

|| डॉ. विनया जंगले

रौफ अली हे सालिम अली आणि हुमायून अब्दुल अलींचे जवळचे नातलग. या दोन दिग्गजांकडून मिळालेला पर्यावरण अभ्यासाचा वारसा रौफ अलींनी केवळ चालवलाच नाही, तर स्वत:च्या बुद्धिमत्तेने आणि प्रतिभेने भारतातील पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासात स्वतंत्र अशी भर टाकली. पर्यावरणशास्त्राचा अभ्यास आणि त्यातील संशोधन याबाबतचा त्यांचा जीवनप्रवास ‘रनिंग अवे फ्रॉम एलेफन्ट्स’ या पुस्तकात रौफ अलींनी मांडलेला आहे.

हत्तींना घाबरून जंगलात पुन्हा पाऊल न ठेवण्याचा निश्चय केलेल्या तरुण अलींना पुरामुळे जंगलातच पाच दिवस अडकून पडावे लागते. पाच दिवसांतच जंगलाच्या सौंदर्याने ते मोहित होतात. जंगलातील एकटेपण त्यांना आवडू लागतं. हत्तींपासून दूर जाण्याचा निश्चय केलेले अली कायमचे जंगलांच्या व  पर्यावरणाच्या अभ्यासाकडे ओढले जातात. त्यामुळे या पुस्तकाचे नाव ‘रनिंग अवे फ्रॉम एलेफन्ट्स’ असे चकवा देणारे असले तरी हा जंगल, प्राणी आणि पर्यावरणशास्त्र यांच्या परस्परसंबंधाचा मिश्किल शैलीत घेतलेला सखोल असा आढावाच आहे.

मुंदनथुराई अभयारण्यात सुरुवातीला अली ‘बॉनेट’ माकडांचा अभ्यास करायला गेले होते. या अभ्यासात त्यांनी केलेली माकडांबाबतची विलक्षण निरीक्षणं ‘मंकी सागाज्’ या प्रकरणात मांडलेली आहेत. बॉनेट माकडांच्या कळपातील माद्या आपल्या कळपातून मध्येच पळून दुसऱ्या कळपात जातात. त्यांना अडवण्यासाठी कळपातल्या कळपातच खूप धुमश्चक्री होते. कधी कधी माद्यांना अशा तऱ्हेने पळवण्यावरून दोन कळपांमध्येही धुमश्चक्री होते. माकडांबाबतचे आणखी एक गमतीदार निरीक्षण अलींनी नोंदवलेले आहे. कधी कधी एखादं माकडाचं पिल्लू चुकून झाडावरून खाली पडतं. त्याच्या या ‘माकडांना न शोभणाऱ्या’ वागणुकीमुळे दुसरी मोठी माकडं त्याच्यावर खवळून उठतात. कधी कधी एखादं मोठ माकडही झाडावरून खाली पडतं, तेव्हा ते उठताना शरमल्यासारखं हळूच आजूबाजूला पाहातं. आपल्याला कोणी दुसऱ्या माकडाने पाहिलं नाही ना, याची खात्री झाल्यावरच हळूच कळपात सामील होतं! माकडं फळं खाताना नदीच्या किनारी जाऊन खाता-खाताच मधे फळं धुऊन घेतात. जंगली फळांमध्ये असलेला चिकट गोंद धुऊन टाकण्यासाठी माकडं असं वागतात, हे रौफ अलींनी नोंदवलेले आहे.

या दरम्यान सायलेंट व्हॅलीत बांधाच्या धरणाचा मुद्दा निघाला होता. कमीत कमी या भागातलं जंगल टिकलं पाहिजे, इथे धरण बांधण्यात येऊ नये, असा स्पष्ट पवित्रा अलींनी घेतला. प्राण्यांच्या वागणुकीचे निरीक्षण करणाऱ्या शास्त्रज्ञाचे रूपांतर हळूहळू पर्यावरणविषयक कार्यकर्त्यांमध्ये होऊ लागले. सन १९८७ मध्ये नव्याने स्थापन झालेल्या पाँडेचरी विद्यापीठाला पर्यावरणविषयक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करायचा होता. हा अभ्यासक्रम बनवण्यासाठी अलींना विद्यापीठाने आमंत्रित केलं. हे नवं आव्हान स्वीकारून ते पाँडेचरी विद्यापीठात दाखल झाले. पाँडेचरी विद्यापीठातील वाईट राजकारणाचा सामना करूनही अलींनी भारतातील पहिला पर्यावरणविषयक पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम तयार केला. या विद्यापीठातून अलींनी पर्यावरणशास्त्राबद्दल स्वतंत्र दृष्टी असलेले कितीतरी विद्यार्थी घडवले. या जगावेगळ्या प्राध्यापकाचे वर्ग कुठेही भरत- घरात, बारमध्ये, विद्यापीठातील एखाद्या झाडाखालीही! या अशा वर्गामुळे अलींना इतर प्राध्यापकांच्या निंदेला सामोरं जावं लागलं. परंतु ज्यांना पर्यावरणशास्त्राची खरी ओढ होती ते विद्यार्थी या मनस्वी प्राध्यापकाच्या अस्सल ज्ञानाकडे एखाद्या पतंगाने दिव्याकडे ओढले जावे तसे ओढले गेले होते. ‘स्पॉयलिंग यंग माइन्ड्स’ या प्रकरणात अली त्यांच्या विद्यार्थ्यांच्या गोष्टी रंगून जाऊन सांगतात.

पर्यावरणशास्त्रातील स्वत:च्या संशोधनाबरोबरच अलींनी त्यांच्या समकालीन सहकाऱ्यांच्या काही महत्त्वाच्या प्रयोगांबद्दलही या पुस्तकात लिहिले आहे. रवी शंकरन हा त्यांचा एक मित्र अंदमानातील इंटरवू बेटावर करडय़ा बुडाच्या पाकोळ्यांचा अभ्यास करत होता. हा पक्षी आपल्या लाळेने घरटी बनवतो. या घरटय़ांपासून चविष्ट असे सूप तयार होते. त्यामुळे या घरटय़ांना मोठमोठय़ा पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठी मागणी असते. या करडय़ा बुडाच्या पाकोळ्यांच्या घरटय़ांचा मोठय़ा प्रमाणात चोरटा व्यापार होत होता. त्यामुळे त्यांची संख्या कमी होऊ लागली होती. या पक्ष्यांचा आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ते ज्या ठिकाणी जन्माला येतात, तिथून दूर निघून गेले तरी अंडी घालायला पुन्हा त्याच ठिकाणी येतात. त्यांच्या याच गुणधर्माचा उपयोग रवी शंकरन यांनी करून घेतला. त्यांनी पाकोळ्यांमधीलच एक जात असलेल्या पांढऱ्या पोटाच्या पाकोळ्यांची संख्या एका संरक्षित ठिकाणी चांगलीच वाढवली. त्यानंतर करडय़ा बुडाच्या पाकोळ्यांची अंडी आणून ते पांढऱ्या पोटाच्या पाकोळीच्या घरटय़ात ठेवू लागले. पांढऱ्या पोटाच्या पाकोळीने आपल्या अंडय़ांबरोबर ही अंडीही उबवली. त्यातून पिल्लंही बाहेर आली. करडय़ा बुडाच्या पाकोळीची ही पिल्लं मोठी होऊन पुन्हा घरटी बांधण्यासाठी त्याच संरक्षित ठिकाणी येऊ लागली. यातून करडय़ा बुडाच्या पाकोळ्यांची संख्या वाढण्यास चालना मिळाली.

अंदमान व निकोबार बेटांचा पर्यावरणशास्त्राच्या दृष्टिकोनातून केलेला अभ्यास हे अलींचे भारतीय पर्यावरणशास्त्राला एक मोठेच योगदान आहे. अंदमान- निकोबार बेटं ही पर्यावरणाच्या दृष्टीने स्वतंत्र अशी जैवविविधतेने नटलेली ठिकाणं आहेत. अंदमानमध्ये कित्येक दुर्मीळ वनस्पती आढळतात. त्यातील काही वनस्पती तर जगात फक्त अंदमानमध्येच आढळतात. त्यामुळे ही बेटं जरी भारताचा भाग असली तरी तेथील जैवविविधतेचा विचार करताना त्यांचं स्वत:चं असं एक स्वतंत्र अस्तित्व आणि महत्त्व आहे, हे अली यांना सुरुवातीच्या काळातच लक्षात आले. चितळ हा प्राणी अंदमान- निकोबार बेटावरचा मूळचा प्राणी नाही. सन १९२० ते ३० च्या दरम्यान काही चितळांना भारतातून तिथे नेऊन सोडलेले आहे. वाघासारख्या हिंस्र प्राण्यांचं अस्तित्व नसल्याने चितळांची संख्या अंदमान बेटांवर सर्वत्र अतोनात वाढलेली आहे. कोवळ्या रोपांवर चरणारी चितळं ही अंदमानच्या जैवविविधतेला मारक आहेत, हा विचार पहिल्याप्रथम अली यांनी मांडला. चितळांबरोबर हत्तीसुद्धा अंदमानचा मूळचा प्राणी नाही. अंदमानातील इंटरवू बेटावर एका सागाच्या ठेकेदाराकडे ४० हत्ती होते. त्याचा धंदा बुडाल्याने तो त्या ४० हत्तींना तिथेच ठेवून सन १९६० च्या दरम्यान भारतात निघून आला. हळूहळू ते हत्ती जंगली झाले. त्यांची संख्या वाढत वाढत सत्तपर्यंत पोहोचली. हे हत्ती मोठमोठय़ा झाडांच्या साली ओरबाडून टाकायचे. अंदमानातील दुर्मीळ झाडांची मोठय़ा प्रमाणात नासधूस करायचे. त्यांना खाण्यासाठीही पुरेशा वनस्पती नव्हत्या. हत्तीसारख्या प्राण्याला अंदमानवरून उचलणे व इतरत्र सोडणे आणि चितळासारख्या प्राण्याला अंदमानमधून कायमचे नष्ट करणे हे अत्यंत आवश्यक आहे, हे ठामपणे अली यांनी मांडले. मात्र त्यांच्या या विचाराला शासनस्तरावर किंवा वनखात्यातून कोणत्याही प्रकारे पाठिंबा मिळाला नाही. परंतु प्राण्यांबाबत भावनिक विचार बाजूला ठेवून पर्यावरणाच्या भविष्याचा विचार करून कठोर उपाययोजना आवश्यक असतात, हा विचार रौफ अली पुन्हा पुन्हा मांडत राहिले.

केवळ प्राण्यांबाबतच नव्हे, तर अंदमानातील पर्यावरणातल्या घातक वनस्पती आणि किटकांचाही त्यांनी अभ्यास केला. त्याबद्दलचे विवेचन ‘लिव्हिंग विथ इनव्हेजिव्ह’ या प्रकरणात त्यांनी केले आहे. तळी व नद्यांना गुदमरून टाकणाऱ्या पाणवनस्पती, पिकांवरील किडीचा बंदोबस्त करण्यासाठी आणले गेलेले, परंतु पर्यावरणाला घातक ठरलेले मित्र किडे, समुद्रातील वेगवेगळ्या प्रकारच्या हानीकारक वनस्पती, शहरी भागातील भटके कुत्रे, भटक्या मांजरी या साऱ्यांबद्दल अली यांनी या पुस्तकात लिहिलेले आहे. पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांबाबत अली संशोधनाद्वारे काही निष्कर्ष मांडत होते. त्या काळात या विषयावर भारतात कोणत्याही प्रकारचे कसलेही संशोधन झालेलेच नव्हते. काही वनस्पती ‘भारतीय’ या नावाखाली अंदमानात आणल्या गेल्या. परंतु राजकीय सीमा आणि जैवविविधतेच्या सीमा या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे कोणताही प्राणी किंवा वनस्पती बाहेरून आणताना स्थानिक जैवविविधतेचे भान राखायला हवे, हा विचार अली यांनी या पुस्तकातून मांडलेला आहे. अंदमान निकोबार बेटं ही जैवविविधतेने भरलेली एक सुंदर नैसर्गिक प्रयोगशाळा आहे. त्याची जपणूक काळजीपूर्वक करायला हवी, हे या पुस्तकातील अंदमानवरील लेखांतून पुन्हा पुन्हा पुढे येत राहते.

कोणत्याही भागातील स्थानिक जमातींना जर पर्यावरण संवर्धनासाठी तयार करायचे असेल तर त्यांच्याकडे काही एक चांगल्या उत्पन्नाचा स्रोत असला पाहिजे. निकोबारमधील स्थानिक जमातींनी खोबरं विकण्यापेक्षा शुद्ध खोबरेल तेल विकलं तर त्यांना जास्त फायदा आहे, हे ओळखून अली यांनी तसा प्रकल्प तयार केला. स्थानिक जमातींमध्ये त्यासाठी मोठय़ा प्रमाणात जागृतीही केली. त्यांच्या या प्रकल्पाबद्दल त्यांना पर्यावरणक्षेत्रातील सन २०११ सालच्या ‘सेंट अँड्रय़ूज पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. मात्र, १ एप्रिल २०१६ रोजी त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि भारतीय पर्यावरणशास्त्राची मोठी हानी झाली.

‘रनिंग अवे फ्रॉम एलेफन्ट्स’ हा जीवनप्रवास जरी अलींचा असला तरी हे त्यांचे फक्त व्यक्तिगत अनुभव उरत नाहीत. भारतातील वन्यजीव-जीवशास्त्रातील ‘डॉक्टरेट’ पदवी मिळवलेले अली हे पहिले शास्त्रज्ञ. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे भारताच्या पर्यावरणशास्त्राच्या सुरुवातीच्या काळाच्या इतिहासाचा एक उत्तम दस्तावेज झाला आहे. माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. रौफ यांच्या सहकारी-मित्रांनी रौफ यांच्या जीवनकार्याची हृद्य अशी ओळख पुस्तकाच्या सुरुवातीलाच करून दिली आहे, ती अवश्य वाचावी.

vetvinaya@gmail.com