धर्म, राष्ट्र यांसारख्या कथासंकल्पना या मानवानेच तयार केलेल्या, पण तोच या संकल्पनांचा गुलामही बनलेला, अशी स्थिती. अशा वेळी कथासंकल्पना आणि वास्तव यांतील फरक समजावून देणे गरजेचे असते. तेच युवाल हरारी यांनी केले आहे.. त्यांच्या ‘सेपियन्स- अ ब्रिफ हिस्टरी ऑफ ह्य़ुमनकाइंड’ या पुस्तकाची ओळख करून देणाऱ्या लेखमालिकेतील हा दुसरा लेख..

मानवाधिकार हे जीवशास्त्रीय वास्तव नाही, ते आपल्या जनुकीय संरचनेत अस्तित्वात नाही, एखाद्या माणसाचे शरीर खोलून पाहिल्यास त्याच्या आतमध्ये ‘अधिकार’ नावाचा काही अवयव असल्याचे दिसून येत नाही. यामुळे मानवाधिकार ही फक्त कथा आहे, ज्याचा प्रसार गेली काही शतके जगभर केला जातो आहे, ज्यावर आता अब्जावधी लोकांचा विश्वास बसलेला आहे. त्यामुळेच राजकीय आणि कायदेव्यवस्था निर्माण करण्यात आपल्याला यश आले आहे.

Viral Video Woman performs Aigiri Nandini on 17th century Jal Tarang instrument Do You Know About Jal Yantra
VIDEO: ‘जलतरंग’ वाद्यावर महिलेने सादर केले स्तोत्र; ‘या’ प्राचीन वाद्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…
complaints can be made by keeping name confidential in savitribai phule pune university
पुणे : नाव गोपनीय ठेवून करता येणार तक्रार

याचा अर्थ मानवाधिकार वाईट आहे असे नाही, किंबहुना अशा कथात्मकतेमुळे अर्थव्यवस्था आणि इतर किती तरी व्यवस्था उभ्या करण्यात माणसाला यश आलेले आहे. कथात्मकतेत सर्वात यशस्वी कथा ही पैशाची कथा आहे. आपण एक चलनी नोट घेतल्यास तिला जीवशास्त्रीय वा भौतिक किंमत नाही, तिच्या कागदापासून अवजार बनविता येत नाही किंवा ती अन्नासारखी खाता येत नाही वा पाण्यासारखी पिताही येत नाही; पण याच तुकडय़ाबद्दल राष्ट्राध्यक्षांनी, रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नर्सनी, अर्थमंत्र्यांनी जर सांगितले, की कागदाचा हा तुकडा दहा केळ्यांच्या किमतीइतका आहे, तर आपण कुठल्याही शहरात जिथे आपल्याला कुणी ओळखत नाही तिथे जाऊ शकतो आणि या नोटेच्या बदल्यात खरीखुरी केळी घेऊन खाऊ शकतो. पैशांची गोष्ट इतकी यशस्वी आहे, की तिच्या वापरातून अनेक गोष्टी विकत घेतल्या जाऊ शकतात आणि विकल्याही जाऊ शकतात. समाजव्यवस्थेचे स्थैर्य आणि तिचा पाया हा अशा अनेक कथासंकल्पनांच्या सामर्थ्यांमध्ये आणि क्षमतांवर उभा असतो. माणसे जेव्हा या मूलभूत कथांवर विश्वास ठेवणे बंद करतात तेव्हा समाज कोसळण्याची प्रक्रिया सुरू होते. याउलट कथांवरती गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवला गेला तर त्याची श्रद्धा बनते, जिथे कथा आपल्यासाठी काम करण्याऐवजी आपण कथांसाठी काम करू लागतो, किंबहुना या फक्त संकल्पना आणि कथा आहेत हेच आपण विसरून जातो आणि त्यांचे गुलाम बनतो. संकल्पनेचे गुलाम झाल्यानंतर आपण इतर माणसांना, प्राण्यांना आणि स्वत:लाही प्रचंड त्रास द्यायला सुरुवात करतो. आज जगातल्या काही भागांमध्ये धार्मिक संकल्पनांच्या रक्षणासाठी हिंसा चालू आहे, तर काही ठिकाणी धार्मिक संकल्पना आणि त्यायोगे रचलेल्या कथा मागे पडत जाऊन त्याच्या जागी नवे धर्म उभे राहात आहेत. हे नवे ‘टेक्नोधर्म’ तंत्रज्ञानावर आधारित असून ते पारंपरिक धर्माची आश्वासने देतातच, याशिवाय त्या संदर्भात जास्त चांगल्या कथाही सांगतात. यात तंत्रज्ञानाच्या मदतीने मृत्यूनंतरच्या स्वर्गाऐवजी दीर्घायुष्य, आनंद, न्याय आणि समता याच जन्मात आणली जाऊ शकते याबद्दल आश्वासने दिली जातात. वेळ जसजसा पुढे जाईल तसतसे पारंपरिक धर्म मागे पडून अधिकाधिक लोक टेक्नोधर्मावर विश्वास ठेवायला लागतील आणि जगभरावर राज्य करू लागतील. टेक्नोधर्माची कथासंकल्पना सांगण्याची क्षमताही पारंपरिक धर्माइतकीच, किंबहुना त्यापेक्षाही जास्त आहे; यातून लोक सुखी होतील हे मात्र निश्चितपणे सांगता येणार नाही. लोकांना खरोखर सुखी करायचे असेल तर कथासंकल्पना आणि वास्तव यामधला नेमका फरक समजावून देणे महत्त्वाचे आहे. हा फरक नेमका कसा ओळखायचा, या प्रश्नाचे उत्तर देताना हरारी पुन्हा मानवी वेदना आणि दु:खासंबंधी बुद्धाच्या भाष्याप्रमाणे बोलतात. एखादी गोष्ट ही कल्पना की वास्तव हे शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तिला वेदना आहेत का हे शोधून काढणे. एखादे राष्ट्र जेव्हा युद्ध हरते तेव्हा त्याला वेदना होत नाहीत. उदाहरणार्थ दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्याने ते राष्ट्र वेदनेत बुडाले होते हे वाक्य म्हणत असताना जर्मनी ही फक्त राष्ट्रसंकल्पना असते; जी फक्त लोकांच्या डोक्यातल्या विचारांचा भाग असते, ज्याला वास्तवात वेदना दिल्या जाऊ शकत नाहीत.

जगातल्या सर्वात बलाढय़ गोष्टी या कथासंकल्पना आहेत. राष्ट्रे, गुगल व अ‍ॅपलसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या, जागतिक बँक, अमेरिका, चीन, भारत या सर्व कथासंकल्पना आहेत, ज्या माणसाने शोधून काढल्या आणि आता त्या इतक्या मोठय़ा झाल्या आहेत, की माणसाचे आणि इतर जीवांचे जगणे या कल्पनांवर अवलंबून आहे. मी कोण आहे, माझ्या जन्माचे ध्येय काय आणि आयुष्य म्हणजे काय, या जीवनातल्या सर्वात महान प्रश्नांची उत्तरे आपण पारंपरिक कथासंकल्पनांमध्ये शोधत आलो आहोत. यातल्या काही कथा दोनशे वर्षे जुन्या, तर काही दोन हजार वर्षे जुन्या आहेत. ही कथा देव, स्वर्ग-नरक यांची असू शकते, तशी ती मानवाधिकारांचीही असू शकते. हरारी हे धर्म वा मानवाधिकाराच्या विरोधात नाहीत, किंबहुना या संकल्पनांशिवाय मोठी मानवसभ्यता उभी करता आली नसती; पण या कल्पनांमध्ये मूलभूत प्रश्न विचारण्यासाठी कुठलाही वाव नाही, किंबहुना मूलभूत प्रश्न विचारल्यास तुमचे तोंड बंद केले जाते किंवा मग या प्रश्नांचे उत्तर धर्मसंकल्पनेमध्ये अगोदरपासूनच उपलब्ध आहे, असे सांगितले जाते. या परिस्थितीत हरारी धर्म आणि अध्यात्म यामध्ये स्पष्टपणे फरक आहे, असे म्हणतात. आध्यात्मिक असण्यासाठी माणूस धार्मिक असायलाच हवा असे नाही. धर्म हे उत्तरांशी संबंधित आहेत, तर आध्यात्मिकता ही प्रश्नांशी संबंधित आहे. आध्यात्मिक मार्गात मी कोण आहे, सत्य नेमके काय आहे, वास्तव म्हणजेच सत्य आहे काय, असे मोठमोठे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्यांची उत्तरे कुठल्याही मार्गानी शोधली जाऊ शकतात. हे शोधत असताना समाजात पूर्वापार चालत आलेल्या परंपरा आणि व्यवस्थांनाही प्रश्न केला जाऊ शकतो. धार्मिक मार्गात थेट उत्तर तयार असते. ते आपल्याला शोधावे लागत नाही. माणूस असणे म्हणजे काय, आयुष्याचा अर्थ काय, जग कशापासून बनलेले आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे धर्मग्रंथांमध्ये अगोदरच दिलेली असतात. ही उत्तरे स्वीकारल्यानंतर कथासंकल्पना तिथेच थांबून जाते. तिला पुढे जाण्याची गरज नसते आणि वावही नसतो. हरारींच्या मते, इतिहास हा अशा प्रश्नांचे मूळ शोधण्याकरिता सर्वात महत्त्वाचे साधन आहे. मानवाधिकाराच्या संकल्पनेचा इतिहास, ख्रिश्चन, हिंदू वा कुठल्याही धर्मसंकल्पनेचा इतिहास पाहताना आपल्याला असे दिसून येते, की या सर्व मानवरचित कथासंकल्पना आहेत आणि त्यात अगणित बदल घडून आलेले आहेत. गेल्या काही शतकांमध्ये उत्तरे शोधण्यासाठी या संकल्पनांचा प्रचंड उपयोग झाला आहे, परंतु गेली काही वर्षे माणसाने ज्ञानाच्या क्षेत्रात केलेली प्रगती पाहता या संकल्पना आता त्रोटक वा अपूर्ण ठरू लागल्या आहेत. यासाठी आता या कथासंकल्पनांना बाजूला सारून सत्य नव्याने शोधले गेले पाहिजे.

मानवजातीने गेल्या दहा ते वीस हजार वर्षांत परस्परसहकार्याने केलेली प्रगती निश्चितच वाखाणण्याजोगी आहे; पण होमो सेपियन्सचा व्यक्तिगत पातळीवर विचार करता एक व्यक्ती म्हणून सेपियन्स हुशार झाले आहेत, असे हरारींना वाटत नाही. वीस हजार वर्षांपूर्वी फक्त जगण्यासाठी बऱ्याच गोष्टींची माहिती असणे आवश्यक होते. या गोष्टींमध्ये स्वत:चे अन्न मिळविणे, स्वत:ची शस्त्रे तयार करणे, स्वत:चे कपडे बनविणे, आजारी पडल्यास स्वत:वर उपचार करणे इत्यादींचा समावेश होता. वर्तमानकाळाचा विचार करता या स्वकर्माशी माणसे आपल्या पूर्वजांपेक्षा फार कमी परिचित आहेत, कारण त्यासाठी आपण अर्थव्यवस्था आणि दळणवळणांच्या साधनांवर अवलंबून आहोत. शेतीच्या शोधानंतरच्या गेल्या दहा हजार वर्षांतल्या मानवी जीवाश्मांचा अभ्यास करताना माणसाचा मेंदू मोठा होण्याऐवजी तो लहान लहान होत चालल्याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध आहेत. युवाल हरारींशी आणखी काही तज्ज्ञ याबाबत सहमत असून संगणकांचा वाढता वापर मानवी मेंदू लहान करण्याच्या प्रक्रियेला वाढवतो आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळेच शेतीच्या शोधानंतर मानवी जीवनमानात आलेली नीचतमता तंत्रज्ञानाच्या शोधांनंतर अधिकाधिक अवनीत स्वरूपाची होत चालली आहे. आपण स्वत:च्या शरीराच्या, काळाच्या आणि भावनांच्या बाबतीत अधिकाधिक असंवेदनशील होत चाललो आहोत. सदोदित फोन वा संगणकांमध्ये गढून गेलेलो असल्याने आपले सभोवतालच्या परिस्थितीबद्दल आकलन कमी होत आहे. लोकांचे लक्ष वारंवार विचलित होत असून त्यांची ग्रहणक्षमता कमी होत आहे. आपले ऐकणे, वास घेणे, स्पर्शज्ञान दिवसेंदिवस बोथट होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लोकांना स्वप्न पडणे वा ते लक्षात ठेवण्याचीही क्षमता कमी झाली आहे. यातून अर्थात सार्वजनिक दु:ख वाढत चालले आहे, पण यापेक्षाही मोठा प्रश्न आहे तो माणसे निरुपयोगी होण्याचा. बुद्धीच्या कामासाठी वाढत चाललेला संगणकाचा वापर, उपजत आणि अर्जित ज्ञानापासून घेतलेली फारकत, बोथट संवेदना आणि फक्त वर्तमानकाळापुरते सुखी होण्याच्या सवयींमुळे बुद्धिमत्ता आणि जाणिवा या एकमेकांपासून वेगळ्या होत चालल्या आहेत. सद्य:स्थितीत संगणकाने चालविलेल्या चालकविरहित कार यावर प्रचंड संशोधन चाललेले आहे. एखाद्या रस्त्यावरून संगणक माणसापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ड्रायव्हिंग करू शकत असेल, तर ते काम संगणकाकडून करून घेतले जाईल आणि त्यामुळे माणूसरूपी चालक ही संकल्पना कालबाह्य़ होईल. अशाच प्रकारे नानाविध कामे माणसांपेक्षा संगणक अधिक चांगल्या प्रकारे करू लागला असल्याने नजीकच्या भविष्यात लाखो लोक निरुपयोगी होतील. परिणामी बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढेल. अर्थव्यवस्था आणि राजकारणाचा विचार करता या निरुपयोगी माणसांचे काय करायचे, हा सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर असेल. ज्या तंत्रज्ञानाने माणसाला पराकोटीचे सामथ्र्य मिळवून दिले तेच तंत्रज्ञान आता माणसाला निरुपयोगी बनवीत आहे.

‘सेपियन्स’ हे अतिशय ओघवत्या आणि खेळकर शैलीत लिहिले गेलेले अत्यंत गंभीर पुस्तक असून त्यातल्या संकल्पना या पराकोटीचे मूलभूत प्रश्न विचारणाऱ्या आहेत. धर्म, समाजवाद, साम्यवाद, मानवतावाद या पुरातन वा जुन्या संकल्पनांवर आजही जगणाऱ्यांनी या पुस्तकापासून शक्य तितके दूर राहावे, त्याच वेळी वेगाने बदलत्या जगाच्या वर्तमानाची इत्थंभूत माहिती ठेवणारे आणि मूलभूत प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाने ‘सेपियन्स’ शक्य तितक्या लवकर वाचावे, असे सुचविता येईल.

पुढील आठवडय़ात या लेखमालिकेतून युवाल हरारी यांच्याच ‘होमो डय़ीऊज- अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टुमॉरो’ या पुस्तकाची ओळख करून घेऊ..

राहुल बनसोडे

rahulbaba@gmail.com