03 June 2020

News Flash

व्यवस्थापनाचे धडे..

मागील ४२ वर्षे हिंदुस्तान युनिलिव्हर या निर्देशांकाचा भाग राहिली आहे.

‘द सीईओ फॅक्टरी : मॅनेजमेंट लेसन्स फ्रॉम हिंदुस्थान युनिलिव्हर’ लेखक : सुधीर सीतापती प्रकाशक : रोली बुक्स प्रा.  लि. पृष्ठे : २७२, किंमत : ५९९ रुपये

वसंत माधव कुळकर्णी

प्रदीर्घ काळ वृद्धीदरात सातत्य राखलेली जगाच्या पाठीवर हिंदुस्तान युनिलिव्हर अर्थात एचयूएलसारखी दुसरी कंपनी नसावी. उत्पादनांची विविधता, ती ग्राहकांपर्यंत पोहोचविणारे वितरकांचे जाळे ही या कंपनीची वैशिष्टय़े आहेतच, पण व्यावसायिक व्यवस्थापक घडविण्याचे काम ही कंपनी गेली अनेक दशके करत आहे. तिच्या या वैशिष्टय़ांची विस्ताराने ओळख करून देणाऱ्या पुस्तकाविषयी..

मुंबई शेअर बाजाराचा ‘बीएसई सेन्सेक्स’ या भारतातील पहिल्या शेअर निर्देशांकाची सुरुवात होऊन ४२ वर्षे लोटली. त्यात हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड अर्थात ‘एचयूएल’ या कंपनीचा समावेश पहिल्या दिवसापासून आहे. त्या वेळच्या बाजार भांडवलाच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेली ही कंपनी ९ एप्रिलच्या मुंबई शेअर बाजारातील बंद भावानुसार ५.१३ लाख कोटींचे भांडवली मूल्य राखून सेन्सेक्समध्ये तिसऱ्या क्रमांकावरची सर्वात मौल्यवान कंपनी आहे. मागील ४२ वर्षे हिंदुस्तान युनिलिव्हर या निर्देशांकाचा भाग राहिली आहे. गेल्या सहा दशकांपासून हिंदुस्तान युनिलिव्हर भारताच्या पहिल्या पाच सर्वात मूल्यवान (सर्वाधिक बाजार भांडवली मूल्य) असलेल्या कंपन्यांमध्ये आपले स्थान कायम राखून आहे. भांडवली गुंतवणुकीसाठी एखाद्या कंपनीच्या ज्या भांडवलावरील लाभ (रिटर्न ऑन कॅपिटल) वगैरे निकषांचा विचार केला जातो, एचयूएलचे ते निकष सर्वोत्कृष्ट असल्याने कंपनीचा दलाल स्ट्रीटवर कायम दबदबा राहिला आहे. कंपनीच्या १९५८च्या वार्षिक अहवालानुसार एक कोटी असलेला कंपनीचा नफा ६० वर्षांत सहा हजार कोटींवर पोहोचला. या काळात एचयूएलच्या नफ्यात वार्षिक १५ टक्के दराने वार्षिक वाढ झाली. जगाच्या पाठीवर प्रदीर्घ काळ वृद्धीदरात सातत्य राखलेली दुसरी कंपनी नाही. कंपनीलानफा आणि बाजारमूल्याची नवीन शिखरे पादाक्रांत करणे शक्य झाले, कारण एचयूएलच्या उत्पादनातील वैविध्य आणि ही उत्पादने ग्राहकांपर्यंत घेऊन जाणारे वितरकांचे जाळे. प्रत्येक दहापैकी नऊ भारतीय महिन्यातून एकदा तरी एचयूएलचे उत्पादन वापरतात. ही ग्राहकसंख्या गूगल किंवा फेसबुकच्या वापरकर्त्यांपेक्षा कैकपटींनी अधिक आहे.

गुंतवणूकदारांना समृद्ध करणाऱ्या एचयूएलने आपल्या कारखान्यात ज्या सहजतेने साबणाच्या वडय़ा तयार केल्या, तितक्याच सहजतेने आणि घाऊक प्रमाणात व्यावसायिक व्यवस्थापक घडवले. भारतातील अनेक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात एचयूएलमधून केल्याने ही कंपनी जणू भारतीय उद्योगाला मुख्य कार्यकारी अधिकारी पुरविणारा कारखाना आहे. एचयूएलच्या या आणि अशा अनेक वैशिष्टय़ांची ओळख ‘द सीईओ फॅक्टरी : मॅनेजमेंट लेसन्स फ्रॉम हिंदुस्तान युनिलिव्हर’ या पुस्तकात लेखक सुधीर सीतापती यांनी करून दिली आहे. लेखक एचयूएलचे कार्यकारी संचालक आणि उपाध्यक्ष आहेत. ते आयआयएम अहमदाबादच्या १९९७-९९ तुकडीचे विद्यार्थी होते. पदव्युत्तर पदविका प्राप्त करून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून एचयूएलमध्ये दाखल झालेले सीतापती मागील २० वर्षे कंपनीच्या सेवेत आहेत. सध्या ते कंपनीच्या ‘फूड्स अ‍ॅण्ड रिफ्रेशमेंट’ या विभागाचे विद्यमान प्रमुख आहेत.

ब्रिटिशांच्या काळात स्थापन झालेल्या ‘लिव्हर ब्रदर्स’ने इतक्या वर्षांत अधिग्रहण आणि विलीनीकरणाच्या माध्यमातून अनेक नवीन व्यवसायांत प्रवेश केला. पॉण्ड्स, ब्रूकबाँड लिप्टनसारख्या कंपन्यांचे विलीनीकरण, तर टाटा ऑइल मिल्स, लॅक्मे आणि क्वालिटी आइस्क्रीम या कंपन्यांचे अधिग्रहण करत सध्याची एचयूएल साकारली आहे. आइस्क्रीम, तयार खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने ही एचयूएलच्या अधिग्रहणाची उत्तम उदाहरणे आहेत. लेखकाच्या मते, सध्याच्या रूपातील एचयूएल कंपनी स्वातंत्र्यानंतर १९५८ मध्ये अस्तित्वात आली. त्यानंतरच्या काळातील एचयूएलच्या कार्यशैलीची ओळख लेखकाने करून दिली आहे.

भारतीय उद्योगांमधील असे अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, जे कधीकाळी एचयूएलच्या सेवेत होते. अनेक भारतीय कंपन्या त्यांच्या व्यवस्थापकांची निवड करताना एचयूएलमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून दाखल झालेल्या व्यवस्थापकास का पसंती देतात, या प्रश्नाचे उत्तर हे पुस्तक वाचून मिळू शकते. लेखकाच्या मते, आपल्या संभाव्य ग्राहकांच्या गरजा ओळखून त्या गरजा भागविणाऱ्या उत्पादनाची निर्मिती करणे, ते उत्पादन वाजवी किमतीत उपलब्ध करून देणे म्हणजे व्यवस्थापन! कुठल्याही व्यावसायिक कंपनीचा कणा म्हणजे कंपनीचे व्यवस्थापक. एचयूएलने व्यावसायिक व्यवस्थापकांची कार्यसंस्कृती जोपासलेली आहे. कंपनीचे ग्राहक ज्या आर्थिक-सामाजिक पार्श्वभूमीतले आहेत, त्यांच्याप्रमाणेच एचयूएलनेही आपले व्यवस्थापक निवडताना हीच पार्श्वभूमी असलेल्यांना प्राधान्य दिल्याचे दिसून येते, असे निरीक्षण लेखक नोंदवतो. व्यवस्थापक घडवताना काटकसरी, आकांक्षी आणि नम्र, परंतु ठाम व्यवस्थापक घडविण्यात एचयूएल यशस्वी झाल्याचे लेखक म्हणतो.

एचयूएलमधील कार्यसंस्कृतीवर भाष्य करताना लेखक लिहितो, एचयूएलमध्ये केवळ संचालक आणि गाडीचालक टाय लावतात, आम्ही सगळे औपचारिक पोशाखात येतो. लिव्हरमध्ये अधिकारी साध्या पोशाखात येतात; लिव्हरमध्ये जशी जीन्स-टी शर्ट संस्कृती नाही, तशी सूटबूटवाली इन्व्हेस्टमेंट बँकिंग संस्कृतीसुद्धा नाही. चौकटीबाहेरच्या विचारांना लिव्हरने उत्तेजन दिले आहे. रिन बारच्या जाहिरातीत कायम वेगवेगळ्या कारणांनी कपडय़ावर पडलेल्या एका डागाची गोष्ट असते. ‘कुछ दाग अच्छे होते है’ हे वास्तव याच चौकटीबाहेरील विचारांना उत्तेजन दिल्याचे उदाहरण आहे.

लेखकाला एचयूएलमधील कारकीर्दीने खऱ्या भारताचा परिचय झाला. इथे लेखकाने एक किस्सा सांगितला आहे. लेखक सर्फ डिर्टजटचे व्यवस्थापक होते. त्यांचे तत्कालीन वरिष्ठ आणि रेमण्डचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बहल यांनी लेखकाला सिंगापूरच्या दौऱ्यावर संचालक वेजबर्ग यांच्याबरोबर जाण्यास सांगितले. वेजबर्ग वार्षिक परिषदेत एका सादरीकरणासाठी त्यांच्या वरिष्ठांना भेटायला जात होते. या सादरीकरणात वेजबर्ग यांचा मदतनीस म्हणून लेखकाला पाठविण्यात आले. सर्व व्यवस्थापक अशा साहाय्यकास ‘बॅग कॅरियर’ म्हणून संबोधत असत. या प्रवासासाठी लेखकाला आठ हजार रुपयांचा भत्ता देण्यात आला आणि प्रथमच लेखकाने बिझनेस क्लासने विमान प्रवास केला. या प्रवासात आवडीचे अन्नपदार्थ मागविण्याची मुभा होती. आवडीचा चित्रपट पाहता आला. लेखक सिंगापूरला एका हॉटेलमध्ये थांबले. तिथे खोलीचे एका रात्रीसाठी भाडे २५० डॉलर्स होते आणि ते ज्या आलिशान रेस्टॉरंटमध्ये रात्री जेवले तिथे त्यांनी मागविलेल्या भाताची किंमत लेखकाच्या तत्कालीन एका महिन्याच्या पगाराइतकी होती! मध्यमवर्गीय घरातून अभ्यासाच्या आणि कष्टाच्या जोरावर त्या पदावर पोहोचलेल्या लेखकाला हा अनुभव खूप काही शिकवून गेला.

लेखकाच्या मते, प्रशिक्षणार्थी म्हणून दाखल झाल्यापश्चात एचयूएलमध्ये दहाएक वर्षे काढल्यावर तुम्ही एखाद्या विभागाचे प्रमुख होता, तुम्ही तुमचे निर्णय घेण्याइतकी सत्ता हाती येते. मार्केटिंग अर्थात विपणनामध्ये ‘फोर पी’ला महत्त्व आहे. प्रॉडक्ट, प्लेस, प्रमोशन आणि प्राइस. यांपैकी लेखकाच्या मते ग्राहकाच्या गरजा भागविणारे उत्तम प्रॉडक्ट म्हणजे उत्पादन सर्वात महत्त्वाचे आहे. उत्पादन चांगले नसेल तर उर्वरित ‘तीन पी’ना काही अर्थ उरत नाही. ग्राहकाला उत्पादन वापरल्यावर समाधान मिळाले तर ते उत्पादन यशस्वी होणारच. लेखक मुंबईत आइस्क्रीम विभागात काम करीत असताना विक्रेते दुकानदार अन्य कंपन्यांचे फ्रीझर ठेवत असत; परंतु एचयूएलचे फ्रीझर ठेवायला तयार नसत. लेखकाने याचे कारण शोधल्यावर असे कळले की, एचयूएलचे फ्रीझर मोठे आहेत, त्यामुळे इंचाइंचाचे व्यवस्थापन करणाऱ्या दुकानदारांची मोठय़ा फ्रीझरना पसंती नसते. म्हणजे एखादे उत्पादन यशस्वी होण्यासाठी ते उत्पादन कसे प्रदर्शित केले, याचासुद्धा महत्त्वाचा वाटा असतो. लेखकाने यासाठी लहान फ्रीजर बनवले, तरीसुद्धा या फ्रीजरना दुकानदारांची पसंती लाभली नाही. कारण या फ्रीझरना अधिक वीज लागत असे. असे काही अपयशाचे प्रसंगसुद्धा या पुस्तकात वाचायला मिळतात.

एकुणात, एका यशस्वी कार्यसंस्कृतीची आणि व्यावसायिक व्यवस्थापक घडवण्याऱ्या प्रशिक्षणाची ओळख करून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे.

shreeyachebaba@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 12:04 am

Web Title: the ceo factory management lessons from hindustan unilever book review abn 97
Next Stories
1 बुकबातमी : ‘घटनाकारां’चे न्यायअष्टक
2 राष्ट्रवादाकडून अपेक्षाभंगापर्यंत..
3 शेजार हरवलेले पुस्तक..
Just Now!
X