|| श्रद्धा कुंभोजकर

आधुनिक महाराष्ट्र घडवणाऱ्या विचार, संस्था आणि व्यक्तींचा चिकित्सक शोध घेणाऱ्या इतिहास-ग्रंथाचा हा परिचय..

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
Sanjay Raut
मराठी माणूस व एकीकरण समितीत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान – संजय राऊत
Loksatta Lokrang Maharashtra Foundation is recognized in Maharashtra for awards in literary and social fields
पंचम देणे सामाजिक जाणिवेचे !

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात- १८१८ साली पेशवाईचा पाडाव झाल्यावर भारतात आणि अर्थातच महाराष्ट्रात इंग्रजी सत्ता दृढमूल झाली. यानंतर बऱ्याच काळाने १८८५ साली भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजेच काँग्रेसची स्थापना झाली आणि भारतीय स्वातंत्र्य लढय़ाला मूर्त रूप आले. परंतु हा स्वातंत्र्य लढा अचानक फोफावला नव्हता. त्याआधी राजा राममोहन रॉय यांच्यापासून पुढे अनेक भारतीय विचारवंतांनी येथील जनतेच्या मनात स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची स्वप्ने बीजरूपाने पेरली. त्यांना आधुनिक शिक्षण, संस्थात्मक जीवनाचा अनुभव, मुद्रणाच्या आणि दळणवळणाच्या सोयी अशा गोष्टींचे खतपाणी मिळाले. आणि मग भारतीय जनतेच्या स्वातंत्र्य लढय़ाचा वृक्ष काँग्रेस आणि इतर अनेक वैचारिक चळवळींच्या विस्तारातून आकाराला आला.

१९ व्या शतकातील या बहुमुखी घडामोडींमुळे आधुनिक भारताच्या इतिहासात या काळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेक भारतीय आणि परदेशी अभ्यासकांनी या काळातील ठळक घटनांवर तसेच उत्तुंग व्यक्तिमत्त्वांवर अभ्यास केले आहेत. तपशीलवार वर्णन करणाऱ्या अभ्यासांपासून ते या काळाच्या तुकडय़ाकडे वर्ग, जात, लिंगभाव, अर्थकारण; इतकेच काय, वैचारिक इतिहासाच्या चौकटीमधूनही विविध अभ्यासकांनी पाहिले आहे. त्यापैकी प्रा. ज. वि. नाईक हे आधुनिक भारताच्या इतिहासलेखनासाठी लागणाऱ्या मूळ संदर्भ-साधनांवर जबरदस्त हुकमत असणारे अभ्यासक म्हणून सुप्रसिद्ध आहेत. मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातून विभागप्रमुख म्हणून ते १९९३ मध्ये सेवानिवृत्त झाले. भारतीय इतिहास परिषद, महाराष्ट्र इतिहास परिषद, कोकण इतिहास परिषद अशा इतिहासकारांच्या प्रतिष्ठित संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. मुंबईतील शासकीय दफ्तरखान्यातील अस्सल कागदपत्रे अभ्यासून त्यांनी लिहिलेले संशोधननिबंध जगभरातील अभ्यासकांनी वाखाणले आहेत. परंतु विविध संशोधनपत्रिकांमध्ये १९७०-९० च्या दशकांत प्रसिद्ध झालेले हे संशोधन एकत्रित पुस्तकस्वरूपात उपलब्ध नसल्याने १९ व्या शतकातल्या महाराष्ट्राचा भारतीय दृष्टिकोनातून, पण इंग्रजी भाषेत लिहिलेला ग्रंथ सहजासहजी उपलब्ध नव्हता. ‘कलेक्टेड वर्क्‍स ऑफ जे. व्ही. नाईक’ हा प्रा. नाईक यांच्या २० निबंधांचा संग्रह प्रकाशित करून ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ने अभ्यासकांची आणि आधुनिक महाराष्ट्राबद्दल कुतूहल असणाऱ्या जिज्ञासू वाचकांची मोठी सोय केली आहे. मुरली रंगनाथन् यांची अतिशय अभ्यासपूर्ण आणि सहृदय प्रस्तावना लाभल्यामुळे या ग्रंथाचे संदर्भमूल्य आणखी वाढले आहे. सरधोपट पद्धतीने ग्रंथाची विभागणी न करता या काळातील विचार, संस्था आणि व्यक्तिमत्त्वांभोवती या ग्रंथाचे तीन भाग केले आहेत.

‘आयडिआज्’ या पहिल्या भागात या काळातील वैचारिक ताणेबाणे स्पष्ट करून दाखवले आहेत. इंग्रजी राज्यात काठीला सोने बांधून काशीला जाण्याइतकी सुरक्षितता असल्याने भारतीयांनी या नव्या सत्तेचे स्वागतच केले असा एक लोकप्रिय समज आहे. मात्र, ‘ब्रिटिश राजसत्तेच्या सुरुवातीच्या काही वर्षांतच या सत्तेचे शोषणकारी स्वरूप येथील विचारवंतांना जाणवले होते’ हे (सुप्रसिद्ध तर्खडकर बंधूंपैकी) भास्कर पांडुरंग यांनी ‘ए हिंदू’ या नावाने ‘बॉम्बे गॅझेट’ या दैनिकात १८४१ साली लिहिलेल्या आठ पत्रांच्या अभ्यासातून प्रा. नाईक यांनी स्पष्ट केले आहे. वृत्तपत्रीय पत्रलेखनातून शासनावर टीकेचे कोरडे ओढण्याची ही परंपरा लोकहितवादींच्या ‘शतपत्रां’नी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या ‘निबंधमाला’ने पुढे समृद्ध केली. वैचारिक इतिहास कसा लिहावा, याचा वस्तुपाठ म्हणता येईल अशा काटेकोर अभ्यासातून प्रा. नाईक दाखवून देतात, की या परंपरेचे मूळ इंग्लंडमध्ये ‘ज्युनिअस’ या पत्रलेखकाने १७६९-१७७२ या काळात- म्हणजे ‘निबंधमाला’च्या शंभर वर्षे आधी लिहिलेल्या पत्रांमध्ये आहे. इतकेच नव्हे, तर ‘आमच्या देशाची स्थिती’ या चिपळूणकरांच्या गाजलेल्या निबंधाचे शीर्षकदेखील ज्युनिअसच्या ‘स्टेट ऑफ द नेशन’ या पहिल्या लेखाच्या मथळ्याचे भाषांतर आहे!

इंग्रजी राज्य ही दैवी देणगी’?

इंग्रजी राज्याच्या सुरुवातीच्या काळात ‘विद्यापीठाची स्थापना झालेली नसतानाही येथील विचारवंत जागतिक आणि प्रादेशिक घडामोडींची जाणीव राखून होते’- हा मुद्दा सिद्ध करताना प्रा. नाईक यांनी १९ व्या शतकातील ‘प्रभाकर’, ‘धूमकेतू’ आणि ‘ज्ञानदर्शन’ या मराठी नियतकालिकांचे मूळ अंक अभ्यासून त्यांचे संपादक भाऊ महाजन यांच्या पत्रकारितेचा अभ्यास मांडला आहे.

अनेक अभ्यासकांच्या मते, स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण होण्यापूर्वी महाराष्ट्रीय विचारवंतांना इंग्रजी राज्य ही ‘दैवी देणगी’ आहे असे वाटे. ही ‘दैवी देणगी’ची संकल्पना कुठून आली? तिचा स्वीकार डोळे मिटून केला गेला, की तिला विरोध केला गेला? अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा घेऊन प्रा. नाईक दाखवून देतात, की इंग्रजांनी पदच्युत केलेल्या अभिजनवर्गाने ‘सर्वनाशे समुत्पन्ने र्अध त्यजति पण्डित:’ या न्यायाने तात्पुरत्या माघारीचा भाग म्हणूनच ‘दैवी देणगी’चा विचार मान्य केला होता. जहालपंथीयांनीच नव्हे, तर नामदार गोखलेंनी स्थापन केलेल्या ‘भारत सेवक समाज’नेदेखील या ‘दैवी देणगी’च्या संकल्पनेचा नंतरच्या काळात त्याग केल्याचे ते दाखवून देतात.

जहालपंथीयांचे मुकुटमणी लोकमान्य टिळक यांच्या एका अलक्षित श्रेयाचाही निर्देश प्रा. नाईक करतात. ते म्हणजे- ‘मराठा’ या वृत्तपत्रामधून कार्ल मार्क्‍सच्या लिखाणाचा येथील वाचकांना परिचय करून देणारे टिळक हे पहिले भारतीय होते. टिळकांनी खोती कायद्याच्या वेळी आपल्या पारंपरिक खोताच्या भूमिकेला न विसरता कुळांच्या ऐवजी खोतांची बाजू उचलून धरल्यामुळे त्यांच्या अभिजन प्रवृत्तीवर अनेक इतिहासकार टीका करतात. मात्र प्रा. नाईक यांची भूमिका अशी आहे, की टिळक हे काही एकाच भूमिकेत गोठलेले नेते नव्हते. भारतभर त्यांच्या नेतृत्वाला जसजशी मान्यता मिळत गेली तसतशी त्यांनी कामगार आणि शेतमजुरांच्या हिताचीही भूमिका स्वीकारायला सुरुवात केली होती. अमेरिकेत कृष्णवर्णीयांची गुलामगिरी नष्ट व्हावी यासाठी झटणाऱ्या थिओडोर पार्कर (१८१०-१८६०) या विचारवंताचा भारतीयांवरील प्रभावही ते स्पष्ट करतात. धर्म आणि धर्मचिकित्सा या दोन्हींच्या मंथनातून महाराष्ट्रातील प्रबोधन घडून आले, असे प्रा. नाईक यांचे प्रतिपादन आहे. या भागाचा जणू उपसंहार करणारा लेख एकंदर महाराष्ट्राने भारतीय स्वातंत्र्य लढय़ाच्या प्रत्येक टप्प्यावर दिलेल्या वैचारिक योगदानाचा अभ्यास मांडतो.

दोन अल्पजीवी प्रयोग

या विचारमंथनाला कारणीभूत ठरलेल्या विविध संस्थांचा अभ्यास ‘इन्स्टिटय़ूशन्स’ या दुसऱ्या भागात मांडला आहे. १८२३ साली स्थापन झालेल्या ‘गणित-शिल्प विद्यालया’चा अभ्यासक्रम, तेथील विद्यार्थी, त्यांची पाश्र्वभूमी आणि त्यांची प्रगती या सर्व गोष्टींचा अस्सल साधनांवरून अभ्यास करून प्रा. नाईक असे विश्लेषण मांडतात, की ‘मराठी माध्यमा’तून तंत्रशिक्षणाचा हा प्रयोग अतिशय फलप्रद होता. परंतु काही इंग्रजी अधिकाऱ्यांच्या इच्छेपुढे नाइलाज होऊन हा प्रयोग बाल्यावस्थेतच १८३२ मध्ये बंद केला गेला, आणि पुढच्या काळात मातृभाषेपासून तोडलेल्या इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली. असाच सामाजिक क्षेत्रात अल्पजीवी ठरलेला प्रयोग म्हणजे- ‘परमहंस सभा’! या सभेच्या पुरोगामी व जातविरोधी स्वरूपाची चर्चा करतानाच या सुधारणा काळाच्या पुढे होत्या हेही ते दाखवून देतात. काळाच्या पुढे असणाऱ्या संकल्पना मांडल्या जातात तेव्हा समाजाला त्या हास्यास्पद वा किरकोळ वाटतात. परंतु त्यातून अभिप्रेत असणारी सुधारणा ही मूलगामी स्वरूपाची आहे हे समाजाला कळत नाही. याचे प्रा. नाईक यांनी दिलेले मनोरंजक उदाहरण म्हणजे- परमहंस सभेचे सभासद असणाऱ्या रामचंद्र बाळकृष्ण यांनी १८६५ साली नेटिव्ह जंटलमन लोकांनी कुटुंबासमवेत सर्कस पाहण्यास उत्तेजन देणारा क्लब स्थापन केला होता! वरवर पाहता मनोरंजनासारख्या साध्या गोष्टीचा संदर्भ दिसला तरी, त्यामागे येथील सद्गृहस्थांनी आपल्या पत्नीसह सार्वजनिक ठिकाणी फिरावे, तिला समाजात प्रतिष्ठेचे, बरोबरीचे स्थान द्यावे यासाठी हा प्रयत्न होता, हे प्रा. नाईक स्पष्ट करतात.

केवळ तपशिलांच्या जंजाळात वाचकाला गुंगवणाऱ्या विद्वत्ताप्रचुर ग्रंथकारापेक्षा लहानात लहान बाबीचा अन्वयार्थ स्पष्ट करून इतिहासातील सौंदर्यस्थळे खरा इतिहासकारच दर्शवू शकतो. प्रा. नाईक यांनी हे आव्हान सहज पेलले आहे. मात्र तपशिलांकडे ते दुर्लक्ष करत नाहीत. स्वतंत्र भारताचे राष्ट्रीय बोधवाक्य झालेले ‘मुंडकोपनिषदा’तील ‘सत्यमेव जयते’ हे वचन सर्वप्रथम ‘प्रार्थना समाजा’ने बोधवाक्य म्हणून स्वीकारले होते, हे ते सिद्ध करतात. प्रार्थना समाजाच्या सदस्यांच्या माहितीचा संख्यात्मक अभ्यास करून त्यांनी हेही दाखवून दिले आहे, की सुधारणांची स्वप्नाळू इच्छा बाळगताना कोणताही ठोस सामाजिक कार्यक्रम न मांडल्यामुळे आणि सभासदांचे स्वरूप ‘उच्च जातवर्गीय उच्चशिक्षित तरुण पुरुष’ असेच राहिल्याने त्याचे स्वरूप ‘सत्यशोधक समाजा’सारखे सर्वसमावेशक होऊ  शकले नाही. परंतु सर्वसमावेशकतेच्याच जाहीर उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाचे स्वरूपही खरे तर फारसे समावेशक नव्हते हेही या अभ्यासातून स्पष्ट होते. मात्र प्रा. नाईक यांचे म्हणणे असे आहे : ‘या उत्सवातून हिंदू-मुस्लिमांत जातीय तणाव निर्माण झाला असे नसून, त्यात काही प्रमाणात का होईना, दोन्ही धर्माचे लोक भाग घेत असत.’

तिसऱ्या भागात डॉ. भाऊ  दाजी, रा. गो. भांडारकर, महात्मा जोतिराव फुले, गोपाळ कृष्ण गोखले आणि र. धों. कर्वे या विलक्षण व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास मांडलेला आहे. डॉ. भाऊ दाजी लाड यांचे संशोधक म्हणून असणारे अनन्यसाधरण महत्त्व प्रा. नाईक यांनी उजेडात आणले आहे. महारोगावर ‘खस्ता’ अथवा ‘कवटी’ नावाच्या वनस्पतीचा वापर करून भाऊ  दाजींनी औषध बनवले आणि त्याच्या वैद्यकीय चाचण्या होईपर्यंत ते प्रकाशित न करण्याचा वैज्ञानिकदृष्टय़ा सजगपणाही त्यांनी दाखवला. भारतविद्येच्या क्षेत्रात एशियाटिक सोसायटीसमोर त्यांनी अनेक शोधनिबंध सादर केले. व्हिक्टोरिया म्हणजेच आजचे जिजामाता उद्यान, तेथील संग्रहालय, कागद कारखाना, कापड गिरण्या, एकूणच मुंबईच्या आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील त्यांचे भरीव योगदान प्रा. नाईक यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. मात्र इतिहासकाराने नायकाबाबत भक्तिभावाला दूर कसे ठेवावे, याचे प्रा. नाईक यांच्या लिखाणातील एक उदाहरण पूर्वगौरववादी इतिहासलेखनाच्या पाश्र्वभूमीवर उद्बोधक ठरते. भाऊ  दाजी यांच्या शिक्षकांनी लिहिलेल्या अस्सल नोंदींच्या अभ्यासावरून त्यांच्या शिक्षकांचे एक मत पुस्तकात उद्धृत केले आहे : ‘हा विद्यार्थी (डॉ. भाऊ दाजी) अभ्यासात फारसे लक्ष न देता इतिहास आणि भाषाविषयाच्या नावाखाली वेळ वाया घालवत आहे’!

महात्मा फुले, नामदार गोखले आणि र. धों. कर्वे यांच्या कर्तृत्वाचेही सुयोग्य ऐतिहासिक मूल्यमापन या भागात केले आहे. परंतु प्रा. नाईक यांच्या लेखणीला खरा बहर येतो तो इतिहासकारांनी काहीशा दुर्लक्षिलेल्या सर रा. गो. भांडारकरांवरील लेखामध्ये. भारतीय इतिहास आणि साहित्याभ्यासात भांडारकरांनी इतकी मोलाची भर घातली, की ते भारतीय आणि परदेशीही विद्वानांच्या प्रेमादरास पात्र झाले. त्यांच्या कर्तृत्वाचे प्रा. नाईक यांनी केलेले मूल्यमापन मुळातूनच वाचनीय आहे. प्रा. नाईक लिहितात : ‘भांडारकरांमधला विद्वान हा त्यांच्या ग्रंथांहून दशांगुळे अधिकच होता. त्यांनी दीर्घकाळ केलेल्या मनाच्या तपश्चर्येचे फळ म्हणजे एखादे पुस्तक नव्हते, तर त्यांचे पूर्ण व्यक्तिमत्त्वच होते. त्यांना आयुष्यात अनेक वेदना आणि कसोटय़ा सोसाव्या लागल्या. पण त्यांनी एखाद्या संताप्रमाणे स्थितप्रज्ञतेने आणि समत्वबुद्धीने आपला क्रूस पेलला होता.’

महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या, आधुनिक होण्याच्या काळाबद्दल अस्सल संदर्भ-साधनांच्याच आधाराने लिहिलेले हे पुस्तक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या दृष्टीने अतिशय मौलिक आहे. इतिहासाच्या क्षेत्रात आज अधिकारवाणीने सांगितला जाणारा तथ्यात्मक इतिहास झपाटय़ाने लोप पावत आहे. व्यक्तिनिष्ठ, आत्मकेंद्री आणि ‘सत्योत्तर’कालीन वावटळीमध्ये ‘ह्य़ूमनाइझ, इक्वलाइझ, स्पिरिच्युअलाइझ’ या तत्त्वांना अनुसरून अर्थात मानवी चेहरा असणाऱ्या, समताधिष्ठित आणि नैतिकतावादी अशा काही विशिष्ट मूल्यांची जपणूक केली पाहिजे या जाणिवेतून लिहिले गेलेले असे इतिहासग्रंथ त्यामुळेच वेधक ठरतात.

  • ‘द कलेक्टेड वक्र्स् ऑफ जे. व्ही. नाईक : रिफॉर्म अ‍ॅण्ड रेनेसान्स इन नाइन्टीन्थ सेन्च्युरी महाराष्ट्र’
  • लेखक : जे. व्ही. नाईक
  • प्रकाशक : एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई
  • पृष्ठे : ३८०, किंमत : ७५० रुपये

shraddha@unipune.ac.in