‘अ‍ॅन फ्रँकची डायरी’ या पुस्तकाची भाषांतरं मराठीसह अनेक भाषांमध्ये कैक वर्षांपासून उपलब्ध आहेत. हिटलरी छळापासून वाचण्यासाठी गुप्तपणे अ‍ॅमस्टरडॅम शहरातच मिएप नावाच्या एका बाईकडे राहणाऱ्या एका किशोरीची ही १९४२ सालची दैनंदिनी, कोवळे अंकुर कसे कोमेजतानाही कोवळेपण जपतात याचं दर्शन घडवणारी. आजही वाचावीशी वाटणारी. प्रेमाची तारुण्यसुलभ भावना अ‍ॅनला नुकती खुणावू लागली आहे; पण शहरात घुसलेल्या नाझी सैन्यामुळे या मुलीला अकाली प्रौढपणही आलंय. त्या डायरीवर चित्रपट झाला. डायरीचा महिमा इतका की, ती वाचलेला जगभरातला कुणीही माणूस आजही अ‍ॅमस्टरडॅमला गेल्यावर ‘अ‍ॅन फ्रँकचं ते घर आजही ठेवलंय म्हणे इथं.. कुठाय ते?’ अशा चौकशा करत अ‍ॅन फ्रँक स्मृती-संग्रहालयात पोहोचतोच.

या अ‍ॅन फ्रँकच्या डायरीवरला ‘कॉपीराइट’, वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी झालेल्या तिच्या मृत्यूला सन २०१५ मध्ये ७० र्वष होऊन गेल्यामुळे संपला. या डायरीची प्रत सांभाळून ठेवून तिचं संपादन करणारे अ‍ॅनचे वडील ओटो फ्रँक यांच्याही मृत्यूला यंदा तितकीच र्वष झाल्यामुळे त्यांचाही स्वामित्व हक्क संपुष्टात आला. म्हणजे आता ही डायरी कुणीही प्रकाशित करू शकतं.. अगदी इंटरनेटवरून फुकटसुद्धा उपलब्ध करून देऊ शकतं!

पण स्वित्र्झलडच्या बाझल शहरातून चालणाऱ्या ‘अ‍ॅन फ्रँक फाउंडेशन’नं या फुकटेगिरीला आक्षेप घेतला आहे. डायरीच्या प्रत-विक्रीतून वा अनुवाद हक्क-विक्रीतून मिळणाऱ्या पैशाचा विनियोग हे फाउंडेशन मानवतावादी कार्यासाठी करायचं. त्याला आता खीळ बसेल, असं फाउंडेशनचं म्हणणं. ते कॉपीराइट कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही म्हणावं, तर सरकार हस्तक्षेप करून जुन्या कॉपीराइटचं नूतनीकरण करू शकतं. पण अ‍ॅन फ्रँकची डायरी मूळ डच भाषेत, घर अ‍ॅमस्टरडॅमला आणि फाउंडेशन मात्र स्वित्र्झलडला असं असल्यानं ‘कुठल्या देशाचं सरकार,’ हा प्रश्न आलाय.

आश्रितांना देश नसतो म्हणतात. अ‍ॅन फ्रँकपुढे मरणोत्तर ७१ व्या वर्षी हाच प्रश्न आलाय. जगली असती, तर आज ८३ वर्षांची असती ती.. पण तिची परवड सुरूच आहे.

loksatta@expressindia.com