निखिल बेल्लारीकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दारा शुकोह हा औरंगजेबचा मोठा भाऊ. पण सत्तासंघर्षांत यशस्वी होऊन औरंगजेब मुघलसम्राट झाला. त्याऐवजी दारा शुकोह बादशहा झाला असता तर.. या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी आधी, दारा शुकोह नेमका कसा होता, हे माहीत हवे. हे पुस्तक ते विपुल संदर्भानिशी सांगते..

इतिहासात निव्वळ ‘जर-तर’ला कोणतेही स्थान नसते, पण मानवी मनाला काही ते पटत नाही. मराठे पानिपतचे युद्ध जिंकले असते तर? शिवछत्रपती अजून काही वर्षे जगले असते तर? आदी अनेक प्रश्नांवर कमालीच्या आत्मीयतेने चर्चा करणे हे इतिहासवेडय़ा मराठी मनाला नवीन नाही. पण या किंवा यांसारख्या प्रश्नांना शब्दश: न घेता त्यांचे काही पैलू खोलात जाऊन तपासल्यास अनेक रोचक गोष्टी हाती लागतात. वरील प्रश्नांप्रमाणेच शाहजहाननंतर औरंगजेबऐवजी दारा शुकोह मुघल बादशाह झाल्यास काय झाले असते, हा प्रश्नही मध्ययुगीन भारताचा राजकीय व सामाजिक इतिहास आणि मुघल साम्राज्य यांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. फक्त तत्कालीन इतिहासच नाही, तर वर्तमानातील विचारविश्वातही दारा व औरंगजेब यांचा शिरकाव खोलवर झालेला आहे. कपट, धर्मवेड, क्रौर्य म्हणजे औरंगजेब आणि सहिष्णुता, औदार्य म्हणजे दारा असे ढोबळ समीकरण आजही समाजमनात कायम आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही अनेक लेखकांनी दाराचा आध्यात्मिक अधिकार, सूफी इस्लाम व हिंदू धर्माकडील ओढा, त्या तुलनेने औरंगजेबाचे धर्मवेड, आदी अनेक अंगांनी याबद्दल लिहिले आहे. पण दारा शुकोह नक्की कोण होता, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. अमेरिकेतील येल विद्यापीठातील इतिहासाच्या प्रा. सुप्रिया गांधी यांनी ‘द एम्परर हू नेव्हर वॉज’ या पुस्तकात या मूलगामी प्रश्नाला हात घातला आहे. हे ठरीव ठशातले चरित्र नसून दाराबरोबरच तत्कालीन मुघल राज्यव्यवस्थेचे तिच्या अनेक पैलूंसह चित्रण आहे. इ.स. १९३५ नंतर दाराचे पहिले व उपलब्ध पुराव्यांवरून निष्कर्ष काढण्याची घाई न करणारे चरित्र प्रा. गांधी यांनी लिहिले आहे.

पुस्तकाची पहिली साठेक पाने प्रा. गांधी दारा शुकोहच्या जन्माआधीची पार्श्वभूमी विशद करतात. जहांगीरविरुद्ध खुर्रम ऊर्फ शाहजहानचा संघर्ष, दोघांच्या सैन्यातील लढाया इत्यादींच्या वर्णनातून प्रा. गांधी हा शक्यतांचा खेळ अधोरेखित करतात. इ.स. १६१५ साली अजमेरमध्ये शाहजहान व अर्जुमंदबानू बेगम ऊर्फ मुमताजमहल यांचा प्रथम पुत्र दारा शुकोहचा जन्म झाला. त्याच्या आसपास झालेली जहांगीरची मेवाड मोहीम, मुघल दरबारचे सूफींशी व हिंदू साधूंशी असलेले संबंध, इंग्रजांचे आग्य्रात आगमन व थॉमस रोच्या अध्यक्षतेखालील आग्य्रातील इंग्रज शिष्टमंडळ, मुघल राजकुटुंबातील लग्ने व त्याआधारे स्वत:चे राजकीय प्रभुत्व बळकट करण्याचा राजकुटुंबीय व अन्य सरदारांचे प्रयत्न, आदी गोष्टी मुळातूनच वाचण्यासारख्या आहेत. दारा शुकोहच्या चरित्राशी प्रत्यक्ष संबंधित नसूनही मुघल राजकुटुंबीयांच्या जीवनाच्या ढोबळ संदर्भचौकटीची व पर्यायाने तत्कालीन समष्टीची कल्पना येण्यासाठी यांचे महत्त्व मोठे आहे. दाराचा जन्म झाल्यानंतर ते पिता खुर्रम बादशाहपदी आरूढ होईपर्यंतचा प्रवास काटय़ाकुटय़ांनी भरलेला आहे. अनेक कुटुंबीयांची हत्या करून खुर्रम ऊर्फ शाहजहान मुघल बादशाह झाला. हा सूड व संघर्षांचा प्रवास प्रा. गांधी यांच्या शैलीत वाचताना त्यातील थरार आणि क्रौर्य जाणवल्याशिवाय राहात नाही.

खुर्रम बादशाह झाल्यावर दाराच्या आयुष्याला स्थिरता लाभली. इ.स. १६३१ मध्ये त्याला मातृशोक झाला व इ.स. १६३३ मध्ये त्याचे नादिरा बानूशी लग्नही झाले. या लग्नाला तत्कालीन तब्बल ३२ लाख रुपये खर्च आल्याचे प्रा. गांधी आवर्जून नमूद करतात. लग्नाला आलेला कल्पनातीत खर्च, त्यातील अनेक विधी, इत्यादींचे वर्णन वाचताना सध्याच्या अब्जाधीशांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. लग्नानंतर वर्षभरात दाम्पत्याला झालेली मुलगी बालपणीच दगावल्याच्या दु:खाने दारा शुकोह गंभीर आजारी पडला. मियां मीर नामक कादिरीपंथीय सूफीने त्याला शाहजहानच्या सांगण्यावरून मानसिक आधार दिला. दारा शुकोहने त्याला आपला गुरूच मानले. मियां मीरच्या हाताखालील मुल्ला शाह हा सूफीदेखील तितकाच प्रभावी होता. सूफी साधनेतील त्याच्या प्रगतीमुळे त्याचे नाव काश्मीरमध्ये गाजत होते. इस्लामसंस्थापक मुहम्मदविषयक त्याच्या काही वक्तव्यांमुळे कट्टर उलेमांनी त्याला ठार मारण्याचा फतवा काढला; मात्र दारा शुकोहच्या मध्यस्थीमुळे त्याला जिवंत सोडण्यात आले. दाराच्या आयुष्यातील प्रबळ सूफी प्रभावाची ही नांदी होती.

भावविश्वाची जडणघडण

इथून पुढची आठेक वर्षे दारा बहुतांशी शाहजहानच्या सान्निध्यात राहिला. इ.स. १६३५ मध्ये त्याला सुलेमान शुकोह नामक एक मुलगाही झाला. इ.स. १६३९ मध्ये दाराला कंदाहार मोहिमेवर पाठवायचे ठरले. तो काबूलपर्यंत गेल्यावर मोहीम तहकूब झाली. त्यानंतर जहांआरा व दारा हे दोघे बहीणभाऊ ग्रंथनिर्मितीत गढून गेल्याचे दिसते. जहांआराने चिश्ती पंथाचे प्रसिद्ध सूफी मोइनुद्दीन यांचे ‘मुनिस-उल-अरवाह’ नामक चरित्र लिहिले, तर दाराने ‘सफिनात-उल-औलिया’ नामक सुमारे चारेकशे सूफी संतांचे संक्षिप्त चरित्र लिहिले. इ.स. १६४० मध्ये दोघांचेही ग्रंथ पूर्ण झाले. हा दाराकृत पहिला ग्रंथ. यानंतरही त्याने अनेक ग्रंथ लिहिले. इ.स. १६४२ मध्ये दारा पुन्हा एकदा सफावी कारस्थानामुळे कंदाहारच्या मोहिमेवर जाण्याची चिन्हे दिसत असतानाच, सफावी बादशाह शाह सफी मरण पावल्याच्या बातमीमुळे तो परत फिरला. या दरम्यान दारा व जहांआरा या दोघांचा मुल्ला शाहशी पत्रव्यवहार सुरूच होता. त्यातील ११ पत्रे दाराने इ.स. १६४२-४३ दरम्यानच्या ‘सकिनात-उल-औलिया’ नामक नव्या ग्रंथात समाविष्ट केली. दाराच्या जीवनातील या टप्प्यात त्याच्या मनोभूमिकेचे प्रतिबिंब त्याने रचलेल्या ग्रंथांत कसे पडते, हे प्रा. गांधींनी उत्तमरीत्या दाखवले आहे.

राजकारण व अध्यात्म

उन्हाळ्यात आग्रा सोडून काश्मीरला जाणे ही मुघलांची एक वार्षिक परंपराच होती. काश्मीरला गेल्यावर मुल्ला शाहला भेटणे हे दारा व जहांआरासाठी नित्याचेच झाले होते. इ.स. १६४५ मध्ये त्याला भेटल्यानंतर दाराने ‘रिसाला-इ-हकनुमा’ नामक नवीन ग्रंथ लिहायला घेतला. ‘रिसाला-इ-हकनुमा’मध्ये दाराने योगचक्रे, त्रिमूर्ती, आदी हिंदू कल्पनांशी साधर्म्य असलेल्या काही कल्पनांची चर्चा केलेली आहे. त्याच्यावरील वा त्याच्या गुरूंवरील काही प्रमाणातील हिंदू प्रभावाची झलक इथे दिसते. इ.स. १६४६ मध्ये मुघलांच्या बाल्ख स्वारीदरम्यान पंजाब प्रांताचे प्रशासन तेव्हा कैक महिने दाराच्याच हाती होते. ग्रंथनिर्मिती व अध्यात्म साधनेबरोबर दाराने तेव्हा काश्मीरमध्ये काही इमारतीही बांधल्या, उदा. परीमहाल.

औरंगजेब कंदाहारच्या स्वारीत अपयशी ठरल्यावर इ.स. १६५२ साली दारा तिथे गेला. त्याची तयारी करत असतानाच दाराने ‘हसनत-उल-आरिफीन’ नामक सूफी वचनसंग्रह तयार करायला घेतला. आजी व माजी प्रसिद्ध सूफींची गूढ वचने त्यात संग्रहित होती. इराणमध्ये सूफींऐवजी उलेमांचा प्रभाव वाढत होता, तसेच भारतातही होऊ नये अशा भावनेने ती टीका लिहिली असेल, असे प्रा. गांधी विशद करतात. इकडे ज्योतिष्यांनी ठरवलेल्या मुहूर्तानुसार १५ मे १६५३ रोजी वेढय़ाची तयारी सुरू झाली. पूर्वीप्रमाणेच याही वेळेस पुरेसा प्रभावी तोफखाना नसल्यामुळे मुघलांना यश मिळाले नाही. किल्ल्यातून मुघल सैनिकांना टिपून मारण्यात सफावी मात्र यशस्वी होत होते. अखेरीस याही वेळेस मुघलांना परत फिरावे लागले.

कंदाहारहून परतल्यावर दाराने ‘हसनत-उल-आरिफीन’ हा ग्रंथ पूर्ण केला व बाबा लाल नामक एका हिंदू साधूची भेट घेतली. त्यानंतर त्याचा हिंदू धर्मातील रस अजूनच वाढला. इ.स. १६५४ साली दारा दिल्लीत आला व शाहजहानसोबत तिथेच राहू लागला. त्यासह त्याने कविंद्राचार्य सरस्वती, ब्रrोंद्र सरस्वती व जगन्नाथ पंडित या हिंदू पंडितांशीही पुष्कळ विचारविनिमय केला. त्यांपैकी जगन्नाथ पंडितांनी दाराच्या स्तुतिपर संस्कृत रचनाही केली. हिंदू धर्माकडे दाराचा वाढता ओढा व रजपुतांशी वाढलेला संपर्क या दोन गोष्टी साधारण एकाच वेळी घडल्या. प्रा. गांधी यांमधील अप्रत्यक्ष कार्यकारणभाव उत्तमरीत्या उलगडून सांगतात. फक्त राजकारणासाठी म्हणून हा वरवर देखावा नसून, तत्त्वज्ञ राजाच्या आदर्श प्रतिमेबरोबरच बदलत्या परिस्थित्यनुरूप मानसिक जडणघडण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बदलण्यात या सांस्कृतिक उपक्रमाचा काहीएक वाटा असावा, हे त्यांचे मत नक्कीच चिंत्य आहे. दाराने याबरोबरच ख्रिस्ती व ज्यू धर्माबद्दलही बरीच चर्चा केली. हिंदू तत्त्वज्ञानातही दाराच्या परिचयाचे तत्त्वज्ञ बहुतेक सर्व जण अद्वैत वेदांती असल्याने त्याचा ओढा साहजिकच त्याकडे वळला.

‘बादशाह’ दारा

अध्यात्म व तत्त्वज्ञानाच्या प्रांतात स्वैर संचार चालू असतानाच दाराला इ.स. १६५५ मध्ये शाहजहानकडून एका मोठय़ा समारंभात अधिकृतरीत्या वारस म्हणून घोषित करण्यात आले. त्याच वर्षी दाराने ‘मज्म-उल-बह्रैन’ (अर्थात दोन समुद्रांचा संगम) हा ग्रंथ लिहिला. यात तो म्हणतो की, सूफी व हिंदू ‘एकेश्वरवादी’ या दोहोंमध्ये अनेक भाषिक, सांस्कृतिक फरक असले तरी दोन्ही परंपरांमधले सत्य एकच आहे. हा निष्कर्ष तत्कालीन इस्लामी वातावरणाच्या दृष्टीने क्रांतिकारक म्हणावा असाच होता. भारतातील एकेश्वरवादी अर्थात ‘मुवह्हिदान-ए-हिन्द’ या संज्ञेत नाथसंप्रदाय, वैष्णवसंप्रदाय व अद्वैत वेदान्तासारख्या काही विचारसरणींचा समावेश त्याने केला आहे. लगोलग दाराने हा ग्रंथ संस्कृतमध्ये ‘समुद्रसंगम’ या नावाने भाषांतरित करवूनही घेतला. या संस्कृत भाषांतराचा वाचकवर्ग मुघलांच्या पदरी असणारे संस्कृतज्ञ हिंदू व काशीतील पंडित हा असावा. त्यांद्वारे भारतातील विचारविश्वावर प्रभाव पाडण्याची त्याची महत्त्वाकांक्षा सरळच दृग्गोचर होते.

इ.स. १६५६ मध्ये दाराला एक स्वप्न पडले. त्यावरून त्याच्या मनोव्यापाराची उत्तम कल्पना येते. ‘योगवासिष्ठा’चे एक कथित फारसी भाषांतर वाचल्याचा हा परिणाम असावा. त्याला या स्वप्नात चक्क वसिष्ठ आणि श्रीराम दिसून वसिष्ठांनी अध्यात्ममार्गातील काही अतिगूढ गोष्टींचे ज्ञान त्याला दिल्याचा उल्लेख सापडतो. ‘योगवासिष्ठ’ ग्रंथाची एकूण संदर्भचौकट दाराला आकर्षक वाटणे हा योगायोग नक्कीच नव्हता. एक राजा म्हणून जगतानाही अध्यात्मात प्रगती करता येते, हे त्याचे सार त्याला भावले आणि लघू योगवासिष्ठाचे फारसी भाषांतर त्याने करवून घेतले. याखेरीज ‘अष्टावक्रगीते’चेही फारसी भाषांतर त्याने करवून घेतले. इ.स. १६५७च्या सुमारास आधीच्या सर्व उपक्रमांवर कडी करून दाराने तब्बल पन्नासेक उपनिषदे फारसी भाषांतरासाठी निवडली. सहाएक महिन्यांत कैक पंडित व मौलवी यांच्या चमूने भाषांतर पूर्ण केले. त्याचे नाव ‘सिर्र-ए-अकबर’ (अर्थात सर्वात मोठे रहस्य) हे होय. उपनिषदांत मोठे ज्ञानरहस्य दडले आहे अशी धारणा असल्याने हे नाव दिले असावे. याचे वैशिष्टय़ म्हणजे, ग्रंथाशेवटी ११४ संस्कृत संज्ञांचे फारसी अर्थ दिलेले असून, काही रंजक तपशील त्यांत सापडतात; उदाहरणार्थ ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्तीला चक्क ‘देवदूतत्रय’ जिब्रईल-मिकाईल-इस्रफिल मानले आहे! इस्लामच्या कट्टर एकेश्वरवादाशी हिंदू विचारांना जुळवण्यासाठी अशी ओढाताण क्रमप्राप्तच होती. दाराच्या ग्रंथनिर्मितीतले नाना प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय बारकावे उलगडताना प्रा. गांधींची लेखणी एकदम प्रभावशाली होते.

पुस्तकाचा अखेरचा भाग शाहजहानच्या मुलांमधील सत्तासंघर्षांने व्यापला आहे. इ.स. १६५७ मध्ये शाहजहान आजारी पडल्यावर मुघल साम्राज्याच्या स्थैर्याला धोका निर्माण झाला. शाहजहान काही काळाने बरा झाल्याची बातमी शुजापर्यंत न पोहोचल्याने त्याने स्वत:लाच बादशाह घोषित केले. दाराच्या सांगण्यावरून शाहजहानने शुजाविरुद्ध दाराचा मुलगा सुलेमान शुकोह व मिर्झाराजा जयसिंग या दोघांना पाठवले. काशीजवळ बहादूरपूर इथे इ.स. १६५८ मध्ये शाही सैन्याने शुजाचा पराभव केला. तरी शुजा पळून जाण्यात यशस्वी ठरला. इकडे मुरादबख्श व औरंगजेबानेही हालचाली सुरू केल्या. दोघांनीही दाराविरुद्ध शुजाशी संधान बांधले. इ.स. १६५८ मध्येच इंदूरजवळील धरमत इथे औरंगजेब व मुरादच्या संयुक्त सैन्याने शाही सैन्याचा सहज पराभव केला. यानंतर औरंगजेब व मुराद हे दाराविरुद्ध आग्य्राजवळील शामूगढ इथे उभे ठाकले. औरंगजेबाच्या पदरी तेव्हा काही मराठे सरदारही असल्याचे प्रा. गांधी आवर्जून नमूद करतात. या लढाईतही दाराचा पराभव झाला. यानंतर दाराने पंजाबात सैन्य उभारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात विशेष यश आले नाही. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी दाराला भारतभर पलायन करावे लागले. बोलन खिंडीजवळच्या मलिक जीवान नामक जमीनदाराने दग्याने दाराला औरंगजेबाच्या सैन्याच्या हवाली केले व त्याचे हालहाल करून त्याला ठार मारण्यात आले. दिल्लीत हुमायूनच्या थडग्याच्या आवारातच त्यालाही पुरण्यात आले. बऱ्याच रक्तपातानंतर औरंगजेब बादशाह बनला.

इथे दाराची दुर्दैवी कहाणी रूढार्थाने संपते, पण वाचकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करूनच! दारा हा संवेदनशील, आध्यात्मिक व प्रसंगी हळव्या मनाचा असूनही त्याने राजाची कर्तव्ये पार पाडण्यात कुचराई केल्याचे दिसत नाही. दाराचे बादशाह होणे हे अगदीच अतक्र्य किंवा अशक्यप्राय नव्हते, हे प्रा. गांधींच्या विवेचनाचे सार म्हणता येईल. त्यांची शैली अर्थवाही व लक्षवेधी आहे. अध्यात्म असो किंवा देवळांची नासधूस, प्रत्येक गोष्टीचे अनेक पैलू सांगताना पुरेशी गुंतागुंत वाचकासमोर येईल याची दक्षताही त्या घेतात. धार्मिक कट्टरता व राजकीय भूमिकेपोटी देवळे पाडणारा मुघल बादशाह हिंदू पंडितांना आश्रय देतो, या वरकरणी विरोधाभासी वाटणाऱ्या आचरणामागील नेमके मर्म त्या उलगडून दाखवतात. एखाद्या गोष्टीचे राजकीय असणे म्हणजे नक्की काय, याचे भान त्यांच्या विवेचनातून येते. फक्त हिंदू-मुसलमान संबंध नव्हे, तर सूफी-राजसत्ता संबंधही कैकदा तणावपूर्ण असत. समाजावरील सर्वंकष प्रभावासाठी अनेक घटकांत चढाओढ असे. आध्यात्मिक ग्रंथांची भाषांतरे व त्यांमागील प्रेरणा यांचे विश्व त्यांच्या शैलीतून स्पष्टपणे उभे राहते. चारेकशे वर्षांपूर्वी होऊन गेलेला दारा शुकोह आणि पर्यायाने त्याच्या जीवनाची संदर्भचौकट कशी होती, याचे समग्र आकलन या पुस्तकामुळे नक्कीच सुलभ होते. इतिहासाचे समग्र आकलन ही काळाची गरज असल्याने अशा पुस्तकांचे महत्त्व स्वयंस्पष्टच आहे.

nikhil.bellarykar@gmail.com

 

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The emperor who never was dara shukoh in mughal india book review abn
First published on: 31-10-2020 at 00:06 IST