|| पंकज भोसले

बुजुर्ग स्कॉटिश कवी रॉबिन रॉबर्ट्सन यांची ‘द लाँग टेक’ ही काव्याचा घाट बदलून लिहिलेली कादंबरी बुकरच्या लघुयादीत स्थान पटकावून आहे. अमेरिकेच्या सिनेसांस्कृतिक, राजकीय आणि शहर उत्थापनाच्या इतिहासात घडणारे हे अ-कथनात्मक शब्दनाटय़ प्रयोगांची आतषबाजी आणि जगभरातील सार्वकालीन कादंबरीमरतड समीक्षकांनी आखलेल्या नियमांच्या पायमल्लीत समाधान मानते..

बुकर पारितोषिकाची यंदाची लघू यादी सादर करण्यास मराठीच्या कोणत्याही काळातील कादंबरीपंडितांच्या मंडळांस पाचारण केले असते, तर रॉबिन रॉबर्ट्सनच्या ‘द लाँग टेक’ नामक काव्याच्या घाटात लिहिलेल्या कादंबरीचा ‘बुकर’च्या लांबोडक्या यादीत सोडा, एकूण पारितोषिकासाठी समाविष्ट करून घेण्याच्या विचारार्थ फेरीमध्येही तिचा समावेश होण्याची शक्यता राहिली नसती. कारण आपल्या साठोत्तरी समीक्षेच्या संकल्पनेत दुष्ट-अनिष्ट आणि बांडगूळवजा संकेतांचा संहार करणे हे ‘नवसाहित्या’चे कार्य होते. मग (श्री. के.) क्षीरसागरीय कादंबरीज्ञानाचे ‘स्वयंवर’ करणाऱ्या पुढल्या बंडखोर कादंबरीमरतडोत्तर पिढीने कादंबरीचा घाट, अनुभवांचा पोत आणि रससिद्धांताचे इतके अनाकलनीय अवडंबर माजवून ठेवले, की गेल्या वीसेक वर्षांत मराठी कादंबरीतील प्रायोगिकता संपून वैश्विक पातळीवर तिचे मोठय़ा प्रमाणात बोन्सॉयीकरण झाले. १९६० पश्चातच्या लेखनावर आपण आजच्या काळातही ‘नवसाहित्या’चा शिक्का मारत असलो, तर आजच्या कठीण वातावरणात तगण्याचे अनंत संघर्ष करणारे नवोन्मेषी साहित्य कसे फुलू पाहणार, हा प्रश्न आहे.

रॉबर्ट्सनची ‘काव्यांबरी’ अनुभवल्यानंतर आपल्याकडच्या अ-प्रायोगिक कादंबरी वर्तमानाची जाणीव प्रकर्षांने होऊ शकेल. उतारवयात रॉबर्ट्सनने केलेला हा काव्यांबरीचा पहिलाच प्रयोग बुकरच्या लघू यादीपर्यंत पोहोचला आहे. यंदा बुकरची लघू यादी जाहीर झाल्यानंतर परीक्षक मंडळाने सहाही पुस्तकांच्या भाषिक ताकदीचा विशेष उल्लेख केला आहे. बांधेसूद कथानक नाही, घटनांची एकसलग मालिका नाही, अनुभवांची तथाकथित घट्ट वीण नाही किंवा समीक्षकमान्य कथ्यरचना नाही; तरीही लॉस एंजेलिस, न्यू यॉर्क, सॅन फ्रान्सिस्को या शहरांमधील तंगडतोड शब्दबद्ध करणाऱ्या नोंदी, आठवणी, पत्रे, डायरीतील पाने, छायाचित्रे आणि शहरांशी त्याच्या अभिसरणाचे एकत्रीकरण असलेले हे पुस्तक बुकर पारितोषिक पटकावण्यासाठी सिद्ध झाले आहे. यात आकर्षक मांडणीच्या लेखकीय कर्तृत्वाइतकेच त्याच्या पुस्तकरूपाला मान्यता देणाऱ्या सर्वच घटकांचेही कौतुकच आहे.

रॉबर्ट्सनचा जन्म आहे १९५५ सालचा.. स्कॉटलंडमधला. अखंड संशोधनानंतर त्यांनी रचलेला हा काव्यडोलारा आहे १९४६ ते १९५३ या सहा वर्षांतील अमेरिकी शहरांच्या स्थिती-गतीवरचा. या काल्पनिक इतिहासात अनेक घडामोडींच्या साक्षी काढल्या आहेत. दुसरे महायुद्ध अमेरिकेच्या भूमीवर घडले नसल्याने त्या देशाला फारशी झळ सोसावी लागली नाही, या जागतिक इतिहासाच्या शालेय तुकडय़ापल्याडचा नवा इतिहास यात सापडतो.

या काव्यांबरीला सुरुवात होते युद्ध सोबत घेऊन अमेरिकेत परतलेल्या कॅनडाच्या नोव्हा स्कॉटिया भागातील वॉकर या तरुणाच्या नजरेतून. कॅनडात परतता येत नसल्याने वॉकर अमेरिकेमधील शहरात राहण्याचा निर्णय घेतो. या शहराचा श्वासोच्छ्वास प्रदीर्घ वर्णनांसह त्याच्या नजरेतून दिसायला लागतो. रस्ते, गाडय़ा, पूल, पार्क, नदी, स्वस्त हॉटेल्स, मद्यालये, इमारती, दुकाने, झोपडय़ा, नाना भाषा बोलणाऱ्या विविध वंशांच्या माणसांची गर्दी, सिनेमागृहे, मनोरंजन केंद्रे अनुभवतानाही त्याला युरोपातील युद्धप्रसंगांचीच आठवण येत राहते. काही नोंदींमध्ये तो छोटुकल्या नोकऱ्या करीत स्थिर होण्याची तगमग करताना दिसतो, तर फिल्म न्वार सिनेमा पाहून आणि हॉलीवूडमधील चित्रकर्त्यांच्या गाठीभेटी घेत चित्रीकरणादरम्यान उपस्थित असलेला दिसतो. रॉबर्ट सिओदमाक या दिग्दर्शकाच्या सल्ल्यानुसार तो देशाच्या पश्चिमेच्या दिशेने प्रवास करायला लागतो. लॉस एंजेलिसमध्ये शिरल्यानंतर शिलकीतल्या दहा डॉलर्समध्ये निजायला स्वस्तातील रूम शोधताना तो रस्त्यावरच्या जाहिरातींपासून ते नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या प्रत्येक घटकाला टिपत जातो. जराही प्रवासवर्णन शैलीतले नसलेले हे वर्णन छिन्नमनस्क युद्धस्थितीचे दर्शन घडविते.

या प्रवासात तो युद्धातून परतून निराश आणि वैफल्यग्रस्त तरुणांच्या जथ्याला भेटतो. एका वृत्तपत्रासाठी बातमीदारी करण्याची नोकरी पत्करतो. तेथे युद्धाने पोळलेल्या तरुणांच्या गाथा मांडता मांडता सिनेमांच्या परीक्षणांमध्येही रमतो. तत्कालीन अमेरिकी सत्यान्वेषी पत्रकारिता करता करता तिथले राजकारण, सामाजिक जीवन यांच्यावर भाष्य करायला लागतो. हिटलरला मारण्याच्या उन्मादानंतर लोकशाही यंत्रणेतही कशी हुकूमशाही, भ्रष्ट आणि एककल्ली प्रवृत्ती तयार झाली, यावर तिरकसपणे बोलायला लागतो.

हा काळ अमेरिकी पल्प फिक्शनवर पोसलेल्या न्वार सिनेमाच्या सुवर्णयुगाचा होता. त्या न्वार सिनेमांचे चित्रसंदर्भ या नोंदींना जिवंत करतात. १९५३ सालातील डिसेंबरमध्ये ‘प्लेबॉय’ या पुढे खळबळ उडविणाऱ्या मासिकाचा जन्म झाला. यात बुकस्टॉलवरून मेरिलीन मन्रोच्या मुखपृष्ठासह दाखल झालेल्या पहिल्या अंकाची अदखलपात्र म्हणूनच गमतशीर वाटणारी नोंद आढळते.

कॅनडामध्ये आप्तांना पाठविलेल्या काही पत्रांचे मायने येथे जोडण्यात आले आहेत. एका पत्रामध्ये युद्धाच्या आधीचे दिवस किती सुंदर होते आणि युद्धानंतर आयुष्य किती बिघडले, याबाबतचा सूर दिसतो. तर अनेक पत्रांत एकटेपणाची आख्याने ठासून भरलेली दिसतात. शहरामध्ये विखुरलेल्या युद्धग्रस्त मानसिकतेच्या आपल्या समवयीन नागरिकांना हुडकताना मधल्या काळात त्याची बातमीदारी बहरते. वृत्तपत्रीय कार्यालयातील दोन-तीन सहकाऱ्यांचा आणि बिली नावाच्या कृष्णवयीन सैनिकमित्राचा उल्लेख आणि त्यांच्यासोबतचे संवाद इथे वारंवार येतात. या संवादांतून शहराच्या अधोगतीची वर्णने डोकावतात.

युद्ध आपल्या मनाच्या पोतडीत ठेवून अमेरिकी शहरांच्या दिवस-रात्री तुडविणाऱ्या या प्रवासात शहरांच्या आणि शहरवासीयांच्या विस्थापनाचेही भाकीत केले आहे. गचाळ, गुन्हेगारीकरण आणि बकाल झालेल्या वस्त्यांवर डोळा ठेवून त्यांना विस्थापित करणाऱ्या राजकीय धोरणांचे प्रारूप पुढे जगभरात अवलंबिले गेले आणि आजही थोडय़ाबहुत प्रमाणात विकसनशील देशांत राबविले जातच आहे. युद्घानंतरच्या पहिल्या पाच-दहा वर्षांत अमेरिकेतील शहरविकास योजनांतील त्रुटींची एका पत्रकाराच्या नजरेतून उडविलेली खिल्ली आणि विकासाच्या नावाखाली हजारो लोकांच्या भविष्याचा खेळखंडोबा अप्रत्यक्षरीत्या मांडला जातो. बेरोजगार तरुणांच्या दर सहा जणांच्या गटात युद्धातून परतलेला एक सैनिक असल्याची आकडेवारी येथे दाखविली जाते. देशाला नव्याने युद्धात लोटणाऱ्या आणि युद्धातून परतलेल्यांना सुरक्षित व सुखसमृद्धीचे जगणे प्राप्त करून देऊ न शकणाऱ्या अमेरिकेच्या अपयशी यंत्रणेवर वॉकरच्या माध्यमातून कडवी टीका होते. कोसळलेल्या मन:स्थितीतील तरुणांना आधार देण्याचे सोडून साम्यवाद्यांना शोधण्याच्या सरकारी यंत्रणेची फिरकी घेतलेली दिसते.

युद्धामुळे मानसिक स्वास्थ्य हरवून बसलेल्या आणि ते स्थिर होण्यासाठी आसुसलेल्या तरुणाची मुक्तछंदातील ही शब्दसहल कंटाळवाणी बनत नाही. उलट त्यातील वर्णनांत आलेल्या कित्येक घटकांचे संदर्भ शोधण्याची उत्सुकता तयार होते. उदा. ‘द ब्लॅक दाहलिआ’ या लॉस एंजेलिसमधील न उलगडलेल्या गाजलेल्या हत्या प्रकरणाचा उल्लेख येथे येतो. शहरातील वाढत्या गुन्ह्य़ांविषयी वॉकर आणि त्याचे सहकारी बोलतात, तेव्हा हॉलीवूडमध्ये यावर आलेल्या सिनेमांची आठवण व्हायला लागते. डाल्टन ट्रम्बोच्या चित्रपटांपासून ते ‘बंकर हिल’च्या पुनर्विकास योजनेविषयीच्या माहितीचे संदर्भ या लेखनाला आणखी समजून घेण्यासाठी उकरता येऊ शकतात. मग लेखकाला वर्तमानकाळात हा काल्पनिक इतिहास रचण्याची इच्छा का झाली असावी, याचा पडताळा होतो.

अ-कथनात्मक लेखनाला आकर्षकरीत्या बांधत आकलनाच्या नवनव्या शक्यता वाचकांच्या वाचन वकुबावर सोपवून देण्याचा रॉबर्ट्सनचा धाडसी प्रयत्न निव्वळ तत्कालीन अमेरिकेचीच ओळख करून देत नाही. या काव्यांबरीचा वाचनानुभव प्रत्यक्षात सीमेवर घडले नाही, तरी वर्तमानात कोणत्या ना कोणत्या पातळीवर भयसावलीने पछाडलेल्या जगभरातील समाजाच्या शतखंडित मानसिकतेची जाणीव करून देतो.

  • ‘द लाँग टेक’
  • लेखक : रॉबिन रॉबर्ट्सन
  • प्रकाशक : पिकॅडोर पोएट्री
  • पृष्ठे : २५६, किंमत : ६९९ रुपये

pankaj.bhosale@expressindia.com