‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ ही अरुंधती रॉय यांची पहिली कादंबरी १९९७ साली आली होती. त्या कादंबरीचं वाचकांकडून कौतुक झालं आणि बुकर पुरस्कारही मिळाला. पुढच्याच वर्षी- १९९८ साली भारतानं अणुस्फोटाची चाचणी केली. त्याविषयी रॉय यांनी म्हटलं आहे की, ‘‘त्या वेळी आसपास बरंच काही घडत होतं, त्यात माझ्या पहिल्या कादंबरीचं चहूबाजूंनी कौतुकही होत होतं आणि त्याच वेळी ही अणुबॉम्बची चाचणी झाली. मी त्याविषयी काहीही बोलणं किंवा मौन राहणं ही राजकीय कृतीच ठरणार होती; पण मी काही बोलले नसते तर मग मी त्या उत्सवाचा एक भाग बनले असते आणि तो उत्सव मला मंजूर नव्हता.’’ त्यानंतर त्यांनी ‘द एण्ड ऑफ इमॅजिनेशन’ या शीर्षकानं एक दीर्घ निबंध लिहिला. पुरस्कारात मिळालेले पैसे नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंटस् (एनएपीएम) या पुरोगामी चळवळींच्या राष्ट्रीय समन्वय संस्थेला देऊन टाकले. तेव्हापासून आंदोलनांच्या सक्रिय पाठिराख्या लेखिका म्हणून अरुंधती रॉय परिचित झाल्या. त्यांनी सातत्याने सामाजिक – राजकीय प्रश्नांवर टोकदारपणे लिहिलं. त्यांच्या निबंधांचा संग्रह प्रसिद्ध झाला. त्यांच्या या काळातील लेखनामुळे आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांची प्रतिमा वादग्रस्तही झाली. शोषितांच्या, विस्थापितांच्या, काश्मिरी आणि नक्षली आंदोलनांकडे त्या सहानुभूतीने पाहतात, असा आरोप त्यांच्यावर झाला तरी त्या सातत्याने वंचितांच्या बाजूने उभ्या राहत आल्या. मध्ये वीस र्वष निघून गेली. गतवर्षीच्या जूनमध्ये त्यांची दुसरी कादंबरी प्रसिद्ध झाली. या कादंबरीतला काळही या गेल्या दोन दशकांतल्या मंथनाचा काळ आहे. सुमारे साडेचारशे पृष्ठांची, १२ प्रकरणांची ही कादंबरी ‘हॅमिश हॅमिल्टन’कडून एकाच वेळी तीस देशांत प्रकाशित करण्यात आली.

या दोन दशकांच्या काळाला मुखर करणारे अनेकविध आवाज या कादंबरीत आहेत. आंदोलनांची समर्थक-कार्यकर्ती असलेल्या रॉय यांच्या अ-कथात्मक लेखनातूनही त्यांचा उद्देश परीघ आणि परिघावरच्यांचे आवाज ऐकणं आणि त्यांना प्रतिसाद देणं हाच राहिलेला आहे. या दोन्ही गोष्टी परस्परांशी पूरकच आहेत, असं त्या त्यांच्या नव्या कादंबरीतून सांगू पाहताहेत.

हे बहुविध आवाज जे आहेत त्यांत तृतीयपंथी, स्वत:ला मुस्लीम म्हणवणारा दलित, काश्मिरी नागरिक, भारतीय नागरी सेवेतले अधिकारी, निर्ममपणे हत्या करणारे खुनी, हस्तक, लाचार पत्रकार, आदिवासी, कलावंत, घुबडं, मांजरं अशा अनेकांचे आहेत. हे आवाज ज्या अवकाशातून येतात ती ठिकाणंही- जुन्या दिल्लीतलं कब्रस्तान, युद्धग्रस्त काश्मीर, नक्षल लढायांनी ग्रस्त अशी मध्य भारतातील जंगलं, दलित संघर्षांला कारण ठरलेलं उना, १८ व्या शतकातलं पण आंदोलनांचं ठिकाण झालेलं जंतरमंतर आणि  तिथं भ्रष्टाचाराविरुद्ध झालेलं अण्णा हजारेंचं आंदोलन, अहमदाबाद-गोध्रानंतरच्या दंगलीतला गुजरात अशी वैविध्यपूर्ण आहेत.

कादंबरीत प्रत्येक प्रकरणाआधी आगा शाहीद अली, ज्याँ जेने, जेम्स बॉल्डविन, पाब्लो नेरुदा आणि इतरांची अर्थपूर्ण अशी अवतरणं दिलेली आहेत. पहिल्या प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या अवतरणात ‘संधिकाळात सूर्यास्त झाल्यानंतर आणि उजेड रेंगाळत असताना कावळे परत येतात आणि वटवाघळं बाहेर पडतात’ असं वर्णन करून, लेखिका ‘चिमण्या हरवत चालल्या आहेत आणि गिधाडं डायक्लोफिनॅक या विषामुळे हळूहळू नष्ट होत गेली’ अशी माहिती देते. ‘डायक्लोफिनॅक’ हे औषध स्नायुदुखीसाठी आणि अधिक दूधनिर्मितीसाठी म्हशी-गाईंना दिलं जातं. दुग्धोत्पादन असं वाढत जाताना प्रत्येक मरणाऱ्या गाई-म्हशीतून आलेलं डायक्लोफिनॅक गिधाडांना नष्ट करणारं ठरलं. हे सांगून पुढचं वाक्य येतं- ‘आपले जुने मित्र असलेले हे पक्षी निघून जाणं कुणाच्या फारसं लक्षात आलं नाही. पाहण्यासाठी त्यापलीकडे त्यांना बरंच काही होतं.’

याचा संबंध कादंबरीतल्या पुढच्या एकूण आशयाशी जोडता येतो. सांप्रदायिक हिंसेची चिकित्सा हा कादंबरीचा गाभा आहे. ही हिंसा कशी उत्पन्न होते? तिला कोण कसं खतपाणी घालतो? सरकारं आणि सैन्याद्वारे केल्या जाणाऱ्या दमनाचा यात कसा सहभाग असतो? अशा प्रश्नांचा शोध या कादंबरीतून घेतला जातो; पण यातलं एक (तृतीयपंथी) पात्र म्हणतं तसं, खरं कारण लोकांची इतरांच्या दु:खाबद्दलची अनास्था हेही आहे.

ज्यांनी रॉय यांची पहिली कादंबरी वाचली असेल, त्यांना त्या कादंबरीत वापरलेली लालित्यपूर्ण भाषा तशा प्रकारे या कादंबरीत आढळणार नाही. रॉय यांचं गद्य डौलदार आणि वाचनीय असतं. ही कादंबरी मात्र आधीच्या कादंबरीपेक्षा सर्वस्वी वेगळी आहे. मोठय़ा स्तरावरचा, गुंतागुंतीचा, एकरेषीय नसलेला असा संघर्ष ही कादंबरी मांडते. भाषेच्या पातळीवरही ती ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’पेक्षा वेगळी आहे. जुन्या दिल्लीत वापरली जाणारी भाषा, उर्दू-काश्मिरी भाषेतले शब्द, तृतीयपंथीयांच्या विश्वात वापरले जाणारे फारसी शब्द, आंदोलनातल्या घोषणा, हिंदी सिनेमातली गाणी, शिव्या, उर्दू शायरीतले शेर असा मुबलक वापर कादंबरीभर दिसतो. कादंबरीतला काळाचा पटही आजच्या काळापर्यंत भिडलेला असा अर्धशतकभराचा आहे. यातलं महत्त्वाचं पात्र- ‘अंजुम’ हा जुन्या दिल्लीतला हिजडा आहे. त्याच्या आयुष्याचा बराच काळ तो त्याच्या समुदायासोबत राहिलेला आहे आणि नंतर दिल्लीतल्या एका कब्रस्तानात राहत आहे. हिजडय़ांचं जग वेगळं आहे. त्यातला एक म्हणतो, ‘‘नेहमीच्या सर्वसामान्य जगातले लोक महागाई, मुलांच्या फिया, शाळा, नवऱ्याचं मारणं, बायकांचे व्यभिचार, हिंदू-मुस्लीम दंगे, भारत-पाकिस्तान युद्ध अशा गोष्टींनी त्रस्त असतात; पण हे सगळं तर आपल्या आतच घडत असतं. आपल्या आतच चालू असतात दंगली. भारत-पाकिस्तान आपल्या आत असतं. ते थांबत नाही कधी.’’

हकीम मुलाकत अली आणि त्यांची पत्नी जहांआरा बेगम यांच्या कहाणीनं ही कादंबरी सुरू होते. चंगेझखानाचे वंशज असणारे आणि काव्य-शायरीत रुची असलेले मुलाकत अली यांना वाटतं, की शायरी हाही उपचाराचा एक भाग असू शकतो. आफताबचा जन्म होतो. हे मूल ‘वेगळं’ आहे हे त्यांच्या लक्षात येतं. असं ‘वेगळं’ मूल जन्मल्यावर त्यांचा सगळ्या गोष्टींवरचा जणू विश्वासच उडतो. मुलगी आणि मुलगा यांपैकी काहीही नसणाऱ्या या अपत्यामुळे उद्ध्वस्त झालेली जहांआरा बेगम संत हजरत सरमद शहीदच्या दग्र्यावर जाऊ  लागते. त्यानंतर हजरत सरमद शहीदची कथा येते. हा इस्लाम धर्म स्वीकारलेला एक ज्यू आर्मेनिअन व्यापारी होता आणि आपल्या प्रिय पात्राला- अभय चंद- भेटण्यासाठी तो पर्शियातून दिल्लीत आला होता. रूढीवादी इस्लामचाही त्याग केल्यानं त्याला देहदंडाची शिक्षा झाली होती. बादशहा औरंगजेबानं त्याचं मुंडकं उडवण्याचा आदेश दिला होता. धड वेगळं झाल्यावरही मोटरसायकलस्वारानं हेल्मेट उचलून घ्यावं तसं तो स्वत:चं शिर उचलून जामा मशिदीच्या पायऱ्या चढत, गात सरळ स्वर्गाला निघून गेला. अजूनही सरमदच्या दग्र्यातली फरशी लाल आहे. दर्गा कोणत्याही रंगानं रंगवला तरी तो पुन्हा लाल होतो. हजरत सरमदचं रक्त धुतलं जाऊ  शकत नाही. लोक त्याला शहीद मानू लागले.

जात, धर्म आणि लिंगभावातील विसंगती, ताणेबाणे आणि दुटप्पी व्यवहार रॉय उजागर करू पाहतात. जे मूल स्त्री किंवा पुरुष या कप्प्यात बसत नाही ते प्रेमाला पारखं होतं. अशा लोकांची दुनियाच वेगळी असते. जहांआराचं अपत्य- आफताब- अखेर एक दिवस ‘अंजुम’ बनते आणि हिजडय़ांच्या जगात- ख्वाबगाहमध्ये सामील होते. तिथं तिला मोकळं वाटतं. लहानपणापासून बांगडय़ा घालण्याची, भडक कपडे घालण्याची तिची आस पुरी होते. हत्याकांडांच्या मधोमध अंजुम गुजरातेत जाते. तिथून मग दिल्लीतल्या कब्रस्तानात येते.

कादंबरीच्या अखेरीला अंजुमने जिचे पालकत्व घेतले होते ती जैनब सद्दामशी लग्न करते तेव्हा ते सरमदच्या दग्र्याला जातात. हजरत शहीद सरमद हा असीम आनंद देणारा आहे. दु:खी जीवांना आधार देणारा संत, देवभोळ्यांमध्ये नास्तिक आणि नास्तिकांमध्ये ईश्वरावर विश्वास ठेवायला लावणारा, असं त्याचं वर्णन येतं.

परस्परविरुद्ध अशी दोन नेपथ्यं लेखिका उभी करते. एकीकडे सीमान्तीकरण झालेले लोक, प्राणी यांचं सहिष्णू आश्रयस्थान, वैविध्याचा स्वीकार करणारं प्रतीक असावं असं (आजच्या भारताचा विरोधाभास) कब्रस्तान आणि दुसरीकडे मृत्यू आणि उदासीनं व्यापलेलं काश्मीरचं खोरं. मोडतोड झालेल्या आयुष्यांसह तुटलेले लोक एकत्र येऊन स्वत:चा एक अवकाश निर्माण करतात, ही आशा लेखिकेला यातून दाखवायची आहे.

‘तिलो’ नावाचं दुसरं पात्र आहे. ती वास्तुशास्त्रज्ञ आणि ग्राफिक डिझायनर आहे. तिचं व्यक्तिमत्त्व धूसर पण मोहक आहे. कधी काळी ती काश्मिरी बंडखोर तरुणाच्या प्रेमात पडलेली आहे. काश्मीरमधला संघर्ष तिनं पाहिला आहे, क्वचित त्यात भागही घेतला आहे. तिच्या डायरीत ती लिहिते, ‘बऱ्याच अशा कथा लिहायच्या आहेत, ज्यात प्रत्यक्षात काही घडत नसेल, पण तरीही असं बरंच त्यात लिहिता येईल. मात्र काश्मीरबाबत तसं म्हणता येणार नाही. तिथं काय काय घडत असतं.. देअर इज टू मच ब्लड फॉर गुड लिटरेचर.’ काश्मीरमधल्या बिकट परिस्थितीनंतर तिलोसुद्धा कब्रस्तानात अंजुमसोबत येऊन राहू लागते. तिनं जंतरमंतरवरून एक बाळ सोबत आणलेलं आहे. तेही त्यांच्यासोबत राहू लागतं. आधुनिक दिल्ली शहरातल्या भेदक विसंगती इथे आपल्याला दिसतात. यात शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया आहेत. त्यांचं विविध प्रकारे होणारं शोषण आहे. अशा अत्याचारित स्त्रियांमध्येही बंध निर्माण होताना दिसतात.

या कादंबरीत रक्तपात आहे. ज्या तऱ्हेची पृष्ठभूमी लेखिकेनं निवडलेली आहे, त्यात तो येणं अपेक्षितही आहे. रॉय इथं जात, धर्म आणि लिंगभावातील भेदांची, त्यातील हिंसेचीही चिकित्सा करतात. लहान लहान अनाम पात्रांमधून एक मोठं कथ्य गुंफत नेलं जातं. ही पात्रं दिल्ली, काश्मीर, अहमदाबाद, उना, निबीड जंगलं.. अशी कुठून कुठून येतात. यात दिल्लीतले महाविद्यालयांतून नाटकं करणारे विद्यार्थी आहेत. त्यांच्यात तिलोत्तमा नावाची तरुणी आहे. तिच्यामार्फत काश्मीरच्या वर्तमान अशांत परिस्थितीत कादंबरी प्रवेशते, जिथं अत्याचारी अमरिक सिंह आहे. जो स्वत: भयभीत झालेला असून ‘पोस्ट-ट्रॉमॅटिक डिसॉर्डर’नं बाधित आहे.

अरुंधती रॉय हिंसा, अत्याचार, दमन आणि प्रेम यांसाठी सर्वथा वेगळी शब्दयोजना करतात. ‘ए फॉर अ‍ॅपल’प्रमाणे त्या ‘ए फॉर आझादी/ आर्मी/ अल्लाह/ अमेरिका/ एके- फोर्टी सेव्हन’, ‘बी फॉर बीएसएफ/ बॉडी/ ब्लास्ट’.. ‘झेड फॉर जुल्म/ झेड प्लस सिक्युरिटी’. हे ‘सिनिकल’ वाटू शकतं, पण तरीही ते खूप काही सांगून जातं. रॉय एके ठिकाणी (पृष्ठ क्र. २७९) बहुपर्यायी प्रश्न विचारतात :

‘मनोहर मट्टू यांना गोळी का घातली गेली?

– (अ) कारण ते  हिंदू होते. (ब) कारण त्यांना स्वातंत्र्य हवं होतं. (क) त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. (ड) वरीलपैकी कोणतेही नाही. (इ) किंवा वरीलपैकी सगळे.

या प्रकारे काश्मीरच्या वास्तवाशी भिडवलं जातं. त्याचप्रमाणे ‘गुजरात का लाल’ म्हणून अनेकदा जे उल्लेख आलेले आहेत त्यांचा रोख वाचकाला सहज ओळखू येतो. अण्णा हजारे आणि त्यांचं आंदोलन ओळखता येतं, केजरीवाल हे अगरवालच्या रूपात ओळखू येतात.

वास्तव आणि कल्पित या दोन बिंदूंच्या अक्षावर लेखक आशयाला कोणत्या कोनात कसा वाकवतो, यावर साहित्यकृतीचा कस लागतो. जागतिक साहित्यात अराजकाविषयी राजकीय भान ठेवत लिहिल्या गेलेल्या वैशिष्टय़पूर्ण कादंबऱ्या सहजपणे आठवतात. त्यात ज्युझे सारामागो, गॅब्रियल गार्सिया माक्र्वेझ यांच्या कादंबऱ्यांची उदाहरणं आठवतात. माक्र्वेझची ‘वन हन्ड्रेड इअर्स ऑफ सॉलिटय़ूड’ किंवा सारामागोची ‘ब्लाइंडनेस’- या कादंबऱ्यांमध्ये प्रत्यक्ष वास्तवाला आशयाच्या पातळीवर वेगळ्या प्रकारे हाताळलं गेलं आहे. ‘ब्लाइंडनेस’मधली फॅन्टसी अराजकाचं भीषण रूपक होऊन येते. अरुंधती रॉय यांनी प्रस्तुत कादंबरी लिहिण्यासाठी २० र्वष घेतली. भाषा, शैली आणि उपाख्यानांचा कोलाज या पैलूंवर त्यांनी कष्ट घेतल्याचं जाणवतं; तरीही लेखनात अधिकचं काही लेखकाचं म्हणून घालायचं असतं, ते राहून गेलं की काय असं वाटतं.

असं असूनही ही कादंबरी वाचनीयतेच्या बाबतीत वाचकाला गुंतवून ठेवते. या कादंबरीत अनेक उपकथानकं आहेत आणि ती परस्परांत गुंतलेली आहेत. याबाबतीत या कादंबरीवर टीकाही झालेली आहे. अनेक उपाख्यानं एका कादंबरीच्या अवकाशात आणताना वीण सैल होते की काय, असा तो आरोप आहे. आजच्या काळाशी संवेदनशीलतेनं भिडल्यास ज्या प्रकारच्या गुंतागुंतीच्या वास्तवाशी कथात्मसाहित्यात सामना करावा लागेल ते ते इथं उपस्थित आहे. परिघावरील समूहांच्या आशा-अपेक्षा, त्यांचे विरोध आणि सन्मानानं जगण्याची आस हे यात लेखिका आणते. एक निश्चित आहे, की समकालीन भारतीय इंग्रजी लेखन करणाऱ्या लेखकांमध्ये अरुंधती रॉय यांचं लेखन प्रवाही आणि वाचनीय आहे. एका अतिशय अशांत आणि सामाजिक-राजकीय अनिश्चिततेच्या काळात ही कादंबरी आली आहे. त्यातही तिचं महत्त्व आहे. मानवी स्वभाववैशिष्टय़ांविषयी, त्यातील स्मरणात राहतील अशा पात्रांविषयी आणि प्रवाही लेखनासाठी ती वाचली जायला हवी. आजच्या काळातल्या ऱ्हासांच्या विविधपरी, भारतीय समाज म्हणून असलेले अंतर्विरोध, आंदोलनांच्या अंतर्गत विसंगती आणि धर्माद्वारे प्रभुत्व मिळवण्याची पाशवी लालसा अशा अनेक गोष्टी लेखिका तिच्या गुंतागुंतीच्या कथानकात गुंफते. हा प्रयत्न लेखक म्हणून प्रामाणिक वाटतो आणि वाचकाकडूनही तो समकाळाच्या सजग भानाची अपेक्षा ठेवतो.

  • ‘द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस’
  • लेखिका : अरुंधती रॉय
  • प्रकाशक : हॅमिश हॅमिल्टन (पेंग्विन-रँडम हाऊस)
  • पृष्ठे : ४४५, किंमत : ५९९ रुपये

 

– गणेश विसपुते

bhasha.karm@gmail.com