आदूबाळ

प्रसिद्ध लेखिका जे.के. रोलिंग या ‘रॉबर्ट गॅलब्रेथ’ या टोपणनावानं लिहीत असलेल्या रहस्य कादंबरीमालेतली पाचवी कादंबरी अलीकडेच प्रकाशित झाली. भल्याबुऱ्या कारणांनी ती गाजते आहे. या कादंबरीचा, मालेचा आणि रोलिंग यांना वेढून राहिलेल्या विवादाचा हा आढावा..

लेखकाने स्वत:च्या नावानं न लिहिता टोपणनाव वापरून लिहिण्याची अनेक उदाहरणं जागतिक साहित्यात सापडतील. पण प्रथितयश लेखकानं अभूतपूर्व यश मिळाल्यानंतरही जाणीवपूर्वक आपल्या नावाच्या ‘ब्रँड’चा त्याग करून टोपणनाव घेणं तसं विरळा. ‘हॅरी पॉटर’ मालिकेमुळे अमाप प्रसिद्धी पावलेल्या जे. के. रोलिंगनं हा उद्योग करावा याचं आश्चर्य वाटलं होतं. काही नाटय़मय घटनांनंतर या रहस्याचा गौप्यस्फोट झाला, तेव्हा रोलिंगनं स्पष्टीकरण दिलं : ‘‘मला रहस्यकथा लिहायची होती. तीसुद्धा कोणत्याही अपेक्षांचं जू मानेवर न ठेवता. प्रसिद्धीच्या लखलखाटापासून दूर, मला माझ्या रहस्यकथा लेखनावर खऱ्या खऱ्या प्रामाणिक प्रतिक्रिया हव्या होत्या.’’

यालाही आता सात वर्ष झाली. ‘रॉबर्ट गॅलब्रेथ’ या टोपणनावानं रोलिंग लिहीत असलेल्या रहस्य कादंबरीमालेतली पाचवी कादंबरी ‘ट्रबल्ड ब्लड’ नुकतीच प्रकाशित झाली.

‘स्ट्राइक’ कादंबरीमालेचा नायक कॉरमोरन स्ट्राइक लष्करी पोलिसांच्या सेवेतून निवृत्त झालेला आहे. किंबहुना त्याला सक्तीची निवृत्ती घ्यायला लागलेली आहे, कारण अफगाणिस्तानमधल्या एका दहशतवादी हल्ल्यात त्याचा पाय तुटला आहे. आता तो कृत्रिम पाय लावून चालतो. पहिल्या कादंबरीच्या सुरुवातीला तो लंडनमध्ये आपली डिटेक्टिव्ह एजन्सी उघडत होता. त्याच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसं भांडवल नव्हतं. स्ट्राइक साठच्या दशकातल्या एका सुप्रसिद्ध रॉकस्टारचा अनौरस मुलगा आहे. जॉनी रोकबी नावाचा हा अब्जाधीश रॉकस्टार स्ट्राइकला एजन्सी काढण्यासाठी पैसे देतो. स्ट्राइक आपल्या मनाविरुद्ध ते घेतो.

सुरुवातीला व्यवसाय फारसा चालत नाही. वाग्दत्त वधूबरोबर त्याची भांडणं होतात आणि ती त्याला घराबाहेर काढते. मग तो कार्यालयामध्ये मुक्काम टाकतो. त्याच सकाळी नोकरी सोडून गेलेल्या पहिल्या सेक्रेटरीच्या जागी रॉबिन नावाची एक तात्पुरती सेक्रेटरी येते. छोटय़ा शहरातून लंडनमध्ये आलेली रॉबिन चांगली नोकरी मिळेपर्यंत अशा छोटय़ा छोटय़ा नोकऱ्या करत असते.

स्ट्राइक-रॉबिन या डिटेक्टिव्हद्वयीने उकललेली वेगवेगळी रहस्यं म्हणजे या मालेतली एकेक कादंबरी. सेक्रेटरी म्हणून कामाला सुरुवात केलेली रॉबिन आता पाचव्या भागापर्यंत स्ट्राइकच्या डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये भागीदार झालेली आहे. काही महत्त्वाची प्रकरणे सोडवून स्ट्राइक-रॉबिन यांची एजन्सी पाचव्या कादंबरीच्या सुरुवातीपर्यंत चांगलीच प्रस्थापित झालेली आहे.

पाचव्या कादंबरीच्या कथानकाकडे वळण्याआधी कादंबरीमालेतल्या काही विशेष स्थानांबद्दल लिहिणं योग्य ठरेल.

कादंबरीमाला साधारणपणे २००८ साली सुरू होते. पाचवी कादंबरी २०१४ सालात घडते. म्हणजे स्ट्राइक कादंबरीमालेत दिसणारं लंडन हे ‘समकालीन’ लंडन आहे. ‘बीबीसी’च्या ‘शेरलॉक’ या मालिकेत असंच समकालीन लंडन दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ते लंडन समकालीन असलं तरी बऱ्याच अंशी दिखाऊ (ग्लॅमरस) होतं. बस-टय़ूबमधून प्रवास करत घाईघाईनं रस्ते ओलांडत आपल्या इच्छित स्थळाकडे भराभर चालत जाणाऱ्या, दुपारच्या जेवणासाठी टेकअवे अन्न देणाऱ्या दुकानासमोर रांगा लावणाऱ्या आणि संध्याकाळी इष्टमित्रांबरोबर पबमध्ये गर्दी करणाऱ्या, हातात गूगल मॅप्स घेऊन रमतगमत जाणाऱ्या टुरिस्टांकडे वैतागयुक्त सहनशीलतेने बघणाऱ्या सामान्य लंडनकरांचं लंडन ते नव्हतं. ‘शेरलॉक’मधलं लंडन आवाक्याबाहेरचं वाटतं. या कादंबरीमालेतलं लंडन मात्र सामान्य माणसाच्या रोजच्या अनुभवातलं आहे. अर्थात, हे रोलिंगच्या लेखनाचं यश आहे.

जे लंडनचं तेच कमीअधिक प्रमाणात बाकी देशाचं. समकालीनत्वाचा ठसठशीत प्रवाह कादंबरीमालिकेत कायम वाहात असतो. पाचव्या कादंबरीचा महत्त्वाचा भाग कॉर्नवॉल या प्रांतात घडतो. २०१४ साली स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी जनमत अजमावण्यात आलं. त्या काळात ‘स्थानिक राष्ट्रवादा’ला मोठा ऊत आला होता. स्कॉटिश लोकांच्या पावलावर पाऊल टाकून कॉर्निश (म्हणजे कॉर्नवॉलच्या स्थानिक) लोकांनीही स्वतंत्र व्हावं, असं कॉर्नवॉलमध्ये राहणाऱ्या स्ट्राइकच्या मित्राला कळकळीनं वाटतं. स्ट्राइक आणि रॉबिनचा एक सहकारी स्कॉटिश आहे, पण त्याला स्कॉटलंड स्वातंत्र्याचं जनमत हा खुळचटपणा वाटतो. त्या काळात ब्रिटिश समाजात दिसलेली राजकीय मतमतांतरं अशा प्रकारे रोलिंगच्या लेखनातून दिसतात. सहावी कादंबरी बहुधा २०१६ साली- ‘ब्रेग्झिट’ जनमताच्या काळात घडेल.

पात्रनिर्मिती हे कायमच रोलिंगच्या लेखनाचं बलस्थान समजलं जातं. किंबहुना पात्रनिर्मितीबरोबरच त्या पात्रांच्या प्रेरणा रोलिंगला कुठून मिळाल्या याचा तपास घेणं रंजक असतं. पॉटर मालिकेतल्या हर्मायनीमध्ये किशोरवयीन रोलिंगचे अंश आहेत, असं तिनं मागे एका मुलाखतीत सांगितलं होतं. स्ट्राइक कादंबरीमालेतल्या रॉबिनमध्येही तरुण रोलिंग आहे. कणखर, मानी, प्रसंगावधानी, आणि चतुर.

आणखी एक लक्षवेधक पात्र म्हणजे स्ट्राइकचे वडील जॉनी रोकबी. कादंबरीमालेतला रोकबी रॉकस्टार आहे. साठ-सत्तरच्या दशकांत त्यानं अमाप लोकप्रियता कमावली. तत्कालीन रॉक अपसंस्कृतीच्या संकेतांनुसार प्रस्थापितांविरुद्ध बंडखोरी ही लैंगिक स्वातंत्र्य आणि अमली पदार्थाच्या दुरुपयोगाद्वारे व्यक्त झाली. (अर्थात, साठच्या दशकातली ही अपसंस्कृती फक्त एवढय़ापुरती मर्यादित नव्हती. युद्धखोरीला विरोध, पुरोगामी विचार, पाश्चात्त्य जगापुरता संकुचित दृष्टिकोन न ठेवता मोकळ्या मनाने ‘इतर’ जगाकडे बघायची दृष्टी अशा अनेक गोष्टी या अपसंस्कृतीत समाविष्ट होत्या.) तरुणपणी अनेक स्त्रियांबरोबर रोकबी अल्पजीवी संबंध ठेवतो (ज्यात स्ट्राइकची आई ‘लेडा’ही असते), आणि त्यामुळे रोकबीला थोडी औरस आणि भरपूर अनौरस संतती आहे. हे सगळं वर्णन ‘रोलिंग स्टोन्स’ ख्यातीच्या मिक जॅगर या साठोत्तरी रॉकस्टारला चपखल बसतं. हा ‘रोमां आ क्ले’चा प्रकार आहे. म्हणजे खऱ्याखुऱ्या व्यक्तींत थोडे वरवरचे बदल करून त्यांना ललित लेखनात आणायचं, जेणेकरून वाचकाला ही व्यक्ती नेमकी कोण हे सहज कळावं.

कादंबरीमालेतल्या आधीच्या कादंबऱ्यांपेक्षा ‘ट्रबल्ड ब्लड’ थोडी वेगळी आहे. याआधीच्या कादंबऱ्यांमध्ये समाजातल्या एका विशिष्ट सांस्कृतिक समूहाचे संदर्भ घेऊन कादंबरी घडत असे. उदा. मॉडेलिंगच्या उच्चभ्रू, दिखाऊ जगाचा संदर्भ ‘द ककूज् कॉलिंग’ला होता. ‘द सिल्कवर्म’ लेखक-प्रकाशकांच्या जगातली होती. मिलिटरी पोलिसांचं आणि निवृत्त सैनिकांचं जग ‘करियर ऑफ इव्हिल’मध्ये होतं. ‘ट्रबल्ड ब्लड’ ही अशा कोणत्याही सांस्कृतिक समूहाच्या संदर्भातली नाही.

पोलिसी भाषेत ‘कोल्ड केस’ नावाचा एका प्रकार असतो. म्हणजे खूप वर्षांपूर्वी घडून गेलेला, न उलगडलेला गुन्हा. ‘ट्रबल्ड ब्लड’च्या केंद्रस्थानी अशीच एक ‘कोल्ड केस’ आहे. लंडनच्या एका उपनगरात १९७४ साली एक तिशीतली डॉक्टर आपल्या दवाखान्यातून निघते, आणि नाहीशी होते. तिचा कोणताही तपास लागत नाही. या प्रकरणाचा तपास करणारा तत्कालीन पोलीस अधिकारी मानसिक व्याधींशी झगडत असतो, आणि त्यामुळे त्याच्याकडूनही तपासकामात हलगर्जी होते.

त्या डॉक्टरच्या कुटुंबीयांना सत्य काय ते कधीच कळत नाही. अशा बाबतीत समाजाचं तोंड धरता येत नाही. ‘तिचा खून झाला’ ते ‘तुझी आई याराचा हात धरून पळून गेली’ अशा वेगवेगळ्या कुजबुजी ऐकत त्या डॉक्टरची मुलगी लहानाची मोठी होते. शेवटी एका क्षणी, जवळजवळ कर्मधर्मसंयोगाने तिला स्ट्राइक भेटतो आणि ती स्ट्राइकला ते रहस्य सोडवण्याची गळ घालते. ही रहस्य कादंबरी असल्याने (अर्थातच) स्ट्राइक-रॉबिन हे ४० वर्ष जुनं रहस्य सोडवतात.

कादंबरीचा वेग अत्यंत धिमा आहे. ही ‘थ्रिलर’ नाही आणि यात कादंबरी घडत असताना होणारं खूनसत्र नाही. अगाथा ख्रिस्तीच्या ‘मिस मार्पल’ कथानकांच्या जवळ जाणारं हे कथानक आहे. रोलिंगच्या लेखनावर ख्रिस्तीचा जाणवण्याइतपत प्रभाव आहे.

रोलिंगची ‘हू-डन-इट’ प्रकारच्या रहस्यकथांवर जबरदस्त पकड आहे. पॉटर मालिकेतल्या सातापैकी पाच कादंबऱ्या ‘हू-डन-इट’ प्रकारातच मोडतात. चुकीच्या व्यक्तीवर संशयाची सुई रोखणे, रहस्यसूचनाचे परस्परविरोधी दुवे देणे, वाचकाला ‘हा की तो’च्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवणे, शेवटी रहस्यभेद होतो तेव्हा ‘अरे! दिलेल्या दुव्यांवरून हे उघड होतं की!’ असं वाटायला लावणे.. अशी या प्रकारातली प्रसिद्ध तंत्रं रोलिंग ‘ट्रबल्ड ब्लड’मध्ये लीलया वापरते.

रोलिंगच्या कादंबऱ्या सुटय़ासुटय़ा वाचून त्यांचा पुरेसा आनंद घेता येत नाही; कारण रोलिंग प्रत्येक कादंबरीत त्या कादंबरीच्या कथानकाहून वेगळं असं ‘सरकथानक’ विणते. कादंबरीमाला जशी पुढेपुढे जाते, तसं सरकथानकही पुढे सरकतं, पात्रांचा विकास होताना दिसतो. हे पॉटर मालिकेत प्रामुख्याने दिसून आलं होतं. स्ट्राइक मालिकेत दिसतं ते रॉबिन आणि स्ट्राइकचं उमलणारं नातं. त्यांच्यात असलेला आकर्षणाचा सुप्त प्रवाह रोलिंगनं पहिल्या कादंबरीपासूनच पकडला आहे. त्यांच्यातलं नातं/ आकर्षण हा सरकथानकाचा भाग आहे.

रोलिंगच्या लेखनाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे भविष्यातल्या घटनांचं बीजारोपण आधीच्या कादंबऱ्यांत करून ठेवणे. पुन्हा एकदा पॉटर मालिकेकडे पाहिलं तर सातव्या भागात व्हॉल्डेमॉर्टला एकदाचं मारून टाकायच्या युक्तीचं सूतोवाच दुसऱ्या भागातच करून ठेवलं होतं. ‘ट्रबल्ड ब्लड’मध्येही असं काही केलं आहे की काय असं वाटायला लावणारी स्थळं आहेत. विशेषत: वर उल्लेख केलेल्या जॉनी रोकबीचा भाग आणि लंडनमधल्या गुन्हेगारी टोळ्यांबाबत एक न सुटलेलं रहस्य यावरून वाटतं की, या दोन्ही गोष्टी पुढील भागांमध्ये महत्त्वाच्या ठरणार आहेत.

रोलिंग या कादंबरीमालेचे किती भाग लिहिणार आहे, हे अजून माहीत नाही. पण या प्रवासात पाचवं पुस्तक कादंबरीमालेच्या मध्यापर्यंत आलं आहे असा ढोबळ अंदाज करायला हरकत नाही. ‘मधल्या पुस्तका’ची सगळी वैशिष्टय़ं ‘ट्रबल्ड ब्लड’मध्ये आहेत : स्ट्राइक-रॉबिनचा व्यवसायातला आणि नात्यातला नवखेपणा संपला आहे. त्यांच्या एजन्सीचा जम बसला आहे, आता कोणत्या केसेस घ्यायच्या हे ते ठरवू शकतात आणि त्या केसेसना न्याय द्यायला एजन्सीकडे तरबेज डिटेक्टिव्हज्ची टीम आहे. आता अशा कादंबरीमालांच्या संकेतानुसार, पुढच्या भागात स्ट्राइक-रॉबिनच्या जगात ‘जीवाचा शत्रू’ (नेमसिस) यायला हवा, आणि तिला/त्याला पराभूत करणे हे जीवनध्येय बनावं. तशी पार्श्वभूमी तयार केली आहे, बघू या काय घडतंय ते!

रोलिंगचा चाहतावर्ग बघता ‘ट्रबल्ड ब्लड’ गाजणार, त्यावर विविध व्यासपीठांवर चर्चा होणार हे अपेक्षितच होतं. पण फेसबुकवर एक प्रतिक्रिया वाचून मी चक्रावून गेलो. फेसबुकवर भारतातल्या जवळजवळ ३३ हजार वाचनप्रेमी लोकांचा एक समूह आहे. तिथं कोणी तरी ‘ट्रबल्ड ब्लड’चं मुखपृष्ठ टाकून ‘‘वाचावं का’’ अशी पृच्छा केली होती. त्यावर काही मिनिटांतच ‘‘हा ट्रान्सफोबिक कचरा आहे, वाचू नये!’’ अशी कडवट प्रतिक्रिया आली. तर हा काय प्रकार पाहू या.

‘ट्रान्सजेंडर’ म्हणजे ‘जन्मजात लिंगापेक्षा वेगळा लिंगभाव असलेल्या व्यक्ती’ (मग त्यांनी शस्त्रक्रियेद्वारे लिंगबदल केलेला असो अथवा नसो). असा वेगळा लिंगभाव असलेल्या व्यक्तींना समाजाकडून कडवट, द्वेषपूर्ण टीकेला, तुच्छतेला आणि भेदभावाला सामोरं जावं लागतं. अशीच टीका माया फॉस्र्टेटर नावाच्या व्यक्तीनं ट्विटरच्या माध्यमातून केली. अशी टीका करणं ही ‘सर्वाना सामान वागणूक देण्याच्या धोरणाच्या विपरीत केलेली कृती आहे’ म्हणून माया फॉस्र्टेटर यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. त्याविरुद्ध त्यांनी न्यायालयात दाद मागितली, पण न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध निकाल दिला. त्या निकालानंतर रोलिंगनं ‘आय सपोर्ट माया’ या हॅशटॅगखाली फॉस्र्टेटर यांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला.

हे ट्वीट प्रकाशित होताच रोलिंगवर टीकेची झोड उठली. तिला ‘ट्रान्सफोबिक’ म्हणण्यात आलं. ट्रान्सजेंडर संघटनांबरोबरच लिंगभाव हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग मानणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थाही रोलिंगच्या विरोधात गेल्या. आपली बाजू मांडणारी ब्लॉगपोस्ट नंतर रोलिंगनं केली, पण तो ‘टू लिटिल टू लेट’चा प्रकार होता. रोलिंगसारख्या समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या लेखिकेनं अशी प्रतिगामी मतं बाळगावीत ही गोष्ट दुर्दैवीच आहे.

ही घटना यंदाच्या जून महिन्याच्या आसपासची. हे वादळ शमतंय ना शमतंय तोच सप्टेंबरच्या मध्यावर ‘ट्रबल्ड ब्लड’ प्रकाशित झाली, आणि या विवादाच्या आगीत तेलाचा बुधला पडला.

झालं असं की, ‘ट्रबल्ड ब्लड’मध्ये दोन पात्रं ‘जन्मजात लिंगाहून वेगळा लिंगभाव असलेल्या व्यक्ती’ या गटात मोडू शकतात. त्यातल्या एका व्यक्तीचं वर्णन रोलिंग ‘बायकी कपडय़ांतली पुरुषी आकृती’ असं करते. दुसरा शिक्षा भोगणारा ‘सीरियल किलर’ पुरुष आहे, आणि तो आपल्या सावजांना भूल घालण्यासाठी स्त्रीचे कपडे परिधान करतो. त्याचं व्यक्तिमत्त्वही पुरेसं स्त्रण दाखवलं आहे. या दोन्ही व्यक्ती ‘ट्रबल्ड ब्लड’मधल्या बेपत्ता व्यक्तीच्या खुनासाठी संशयित आहेत.

रोलिंगच्या टीकाकारांना नवं कोलीत मिळालं. पुस्तक आल्याआल्या फेसबुकवर, अन्य समाजमाध्यमांतून हे संपूर्ण पुस्तकच्या पुस्तक ‘ट्रान्सफोबिक’ असल्याची हाकाटी केली गेली. काही प्रतिष्ठित दैनिकांनी त्यांची री ओढत प्रतिकूल अभिप्राय छापले. पण जसजसे लोक वाचत गेले तसतसं लक्षात यायला लागलं की, पुस्तकात काहीही ‘ट्रान्सफोबिक’ नाही. धुरळा खाली बसत गेला, आणि आठवडाभराच्या काळात ‘बेस्टसेलर’ याद्यांमध्ये ‘ट्रबल्ड ब्लड’ जाऊन बसलं. ते अजूनही तिथे आहे!

लेखक आर्थिक इतिहास आणि कथात्म वाङ्मयाचे लंडनस्थित अभ्यासक असून ‘आदूबाळ’ याच नावाने कथालेखनही करतात.

aadubaal@gmail.com