‘चित्रकथा’ म्हणजे कॉमिक्स हे आपणा भारतीयांना ‘अमर चित्रकथा’ वाचल्या-पाहिल्यामुळे माहीत असतं. पण प्रौढ, प्रगल्भ, गंभीर वाचकांसाठी (किंवा आपण तसे नसलो तरी आपल्याला प्रगल्भ व्हायला मदत करण्यासाठी) चित्रकथा असतात, ‘ग्राफिक नॉव्हेल्स’ म्हणजे चित्रकादंबऱ्या असतात, हे हल्ली हल्ली लोकांच्या लक्षात येऊ लागलंय. त्यामुळे या गंभीर साहित्य-प्रकाराचा प्रचारप्रसार होण्याची गरज अद्यापही आहे. ती ओळखून, चित्रकादंबरी आणि चित्रकथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियतकालिक काढू या, असं पुण्याच्या भरत मूर्ती यांनी ठरवलं. या (अ)नियतकालिकाचं नाव ‘व्हेरीटे’. त्याच्या पहिल्या अंकासाठी नव्या-जुन्या, भारतीय/ जपानी/ पाश्चात्त्य अशा बारा चित्रकादंबरीकारांना एकत्र आणून त्यांचा २४० पानी पुस्तकाच्या आकाराचा अंक सिद्ध केला आणि किंमत ठेवली अवघी ३०० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘व्हेरीटे’ हे नाव ‘व्हरायटी’सारखं वाटेल; पण ‘वास्तववादी साहित्य’ या अर्थाच्या फ्रेंच शब्दावरून ते नाव घेतलेलं आहे. स्वत:च्या आत डोकावून पाहणाऱ्या चित्रकथांपासून याची सुरुवात होते.. चित्रकर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (आर्ट गॅलऱ्यांत ज्यांची कलाप्रदर्शनं भरली आहेत, अशा) अन्पू वर्के यांनी एका स्वप्नवत् अनुभवाबद्दल, फारसे शब्द न वापरता चित्रांतून ‘लिहिलं’ आहे. अशीच, चित्रमालिकेसारखी चित्रकथा बिबस्वान बोस यांनी केली आहे.. परीक्षा पद्धतीपुढे ‘आपटी खाणारा’ विद्यार्थी- इथपासून ही कथा सुरू होते; पण पुढे आजच्या तरुणांमध्ये आलेल्या निराशावादापर्यंत जाते. सायमन लमूरे यांनी अत्यंत सुबक रेखाटनांची ‘द अल्काझार’ ही चित्रकथा साकारली आहे. दक्षिणेतल्या एका वाढत्या शहरात (हैदराबाद?) ‘अल्काझार’ ही इमारत बांधली जाणार आहे, या बांधकामासाठी प्राथमिक मजूर म्हणून तिघांना नेमलं जातं. बांधकामस्थळी तात्पुरत्या निवाऱ्यात ते राहू लागतात, त्यापैकी एकाच्या डोक्यावर गावातल्या सावकाराचं कर्ज असतं, अशी ही कथा इथं पूर्णत्वाला जातच नाही.. जणू या मजुरांची आयुष्यंही अर्धीमुर्धीच राहणार आहेत! शौनक संवत्सर यांनी मराठीचा वापर करून लिहिलेली ‘रिसर्च रॅम्बलिंग्ज’ ही चित्रकथा, एका (खासगी) विद्यापीठात ‘अ‍ॅनिमेशन डिझाइन’ हा विषय शिकवणाऱ्या एका तरुण प्राध्यापकाची आहे. नुकता संसारी झालेल्या या प्राध्यापकाला वरिष्ठ सुनावतात की, तुझा एक तरी ‘शोधनिबंध’ एखाद्या ‘संशोधनपत्रिके’त प्रसिद्ध झालाच पाहिजे.. हा प्राध्यापक चिंताग्रस्त. अखेर काहीही करून ‘संशोधना’ची पाटी टाकायचीच, असं तो मनोमन ठरवतो.. पण या असल्या वृत्तीला कचकचीत शिवी हासडून ‘खरंखुरं कौशल्य आणि संशोधनाचा आभास यांतून आभासच कसा महत्त्वाचा मानता तुम्ही?’ असा प्रश्न उपस्थित करणारा एक कौशल्यवान माणूस त्याला भेटतो. शौनक यांची कथादेखील ‘सुफळ संपूर्ण’ होत नाही. पण नंदिता बसू यांची ‘बिफोर आय डाय’ ही कथा मात्र छोटं-छोटं समाधान मिळवत जगण्याचा आनंद घ्यायला शिकवून, दोघी नायिकांपैकी एकीला तिचा आत्महत्येचा विचार सोडायला लावूनच संपते!

शौनक यांनी त्यांच्या चित्रकथेत वरिष्ठाच्या जागी अजगर दाखवलं आहे. या चित्राचा अंश सोबत आहे.  हीच – अप्रिय सत्य चित्रकथेत मांडताना प्राणीरूपांचा आधार घेण्याची – शैली या अंकाचे संस्थापक-संकल्पक भरत मूर्ती यांनीही त्यांच्या चित्रकथेत वापरली आहे.. त्यांचा विषय तर आणखीच चरचरीत.. दोन-तीन वर्षांपूर्वी पुण्याच्या चित्रपट-चित्रवाणी संस्थेत झालेल्या संपाची आठवण कुणालाही यावी, असा!

याच अंकात ‘जपानी चित्रकथांमधल्या – म्हणजेच ‘मान्गा’मधल्या वेगदर्शक रेषा’ या विषयावरला एक वाचनीय लेखसुद्धा आहे. त्यासोबत भरपूर उदाहरण-चित्रं असल्यामुळे तो चटकन समजतो आणि मुख्य म्हणजे, चित्रकादंबऱ्यांचा ‘वाचकवर्ग घडवण्या’चं भरत मूर्ती यांनी अंगीकारलेलं काम पुढे नेतो. या निबंधानंतर चार जपानी ‘मान्गा’कारांच्या चित्रकथा इथं आहेत. त्यापैकी ‘स्टुपिड गाय गोज टु इंडिया’ या चित्रकादंबरीमुळे गाजलेला, भारतातल्या गरिबीला – आणि भारतीय मनाच्या श्रीमंतीलासुद्धा – दिल्ली व अन्य ठिकाणी राहून समजून घेणारा युकिचि यामामात्सु यानं एक हिंदी ‘मान्गा’ स्वखर्चानं छापून स्वत:च विकण्याचा अपेशी प्रयत्न केला होता. ती कथा आता ‘व्हेरीटे’मुळे इंग्रजीत आली आहे.

पुस्तकासारखं हे नियतकालिक अधिकाधिक दुकानांत विक्रीला असावं , यासाठी स्वत:  फिरून भरत मूर्ती पाठपुरावा करत आहेत. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आदी संकेतस्थळांवर ते उपलब्ध आहेच. तरीही जर ‘व्हेरीटे’चा अंक मिळाला नाही, तर मूर्ती यांच्या   bharath@studioekonte.com या ईमेल पत्त्यावर संपर्क साधता येईल.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is comics
First published on: 04-08-2018 at 02:14 IST