गावकऱ्यांचा पुढाकार

औरंगाबाद :  गावात एकही करोना रुग्ण नाही तरीही गावात या पुढे सुरक्षित रहायचे असेल तर लस घ्यायला हवी, असे फुलंब्री तालुक्यातील जानेफळ गावातील नागरिकांनी ठरविले. लोकसंख्या केवळ ५२५. सर्व जण एकमेकांना ओळखणारे. पण संसर्ग टाळायचा असेल आणि झाला तरी गावात कोणाचा मृत्यू होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी लसीकरण करण्याचे ठरविले आणि ४५ वर्षांच्या वरील प्रत्येकाचे लसीकरण पूर्ण केले. शंभर टक्के लसीकरण करणारे हे कदाचित राज्यातील पहिलेच गाव असावे.

फुलंब्री- खुलताबाद रस्त्यावर १० ते १२ किमी गेल्यावर जानेफळ गाव लागते. करोनाच्या काळात चाचणी आणि लसीकरणाचे महत्त्व सांगण्यात येत आहे. या गावातील नागरिकांनी एक बैठक बोलावली आणि त्यात प्रतिजन चाचण्या आणि लसीकरण करण्याचे ठरविले. यात महिलांनी मोठा सहभाग नोंदविला. सुरुवातीला लस घेण्याबाबत भीती वाटत होती. पण जसजसे मृत्यूचे आकडे वाढू लागले तसतसे लसीकरणाशिवाय पर्याय नसल्याचे सर्वाच्या लक्षात येऊ लागले. गावातील निर्मला जाधव  म्हणाल्या,की काम करताना काही झाले तरी लस घेतल्याने धोका असा नाही. आता शेतात आणि घरात भीती न बाळगता काम करता येईल. या गावात ४५ वर्षे वयोगटातील ८० व्यक्ती आहेत. प्रत्येकाने लस घेतली आहे. ग्रामीण भागात संसर्ग वाढत असल्याने लसीची मागणी वाढू लागली आहे. त्याचा पुरवठा कसा होईल हे मात्र अद्याप अस्पष्ट असले तरी आम्ही लस घेणार असा संकल्प करत गावकऱ्यांनी तो पूर्ण केला आहे.