जलयुक्त शिवार मोहिमेतील १ हजार ६८२ गावांमध्ये ५८ हजार दोनपैकी ३८ हजार २१२ कामे पूर्ण झाली. या योजनेवर आतापर्यंत ४१४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या वर्षी पुन्हा दीड हजार गावांची निवड करण्याचे आदेश बुधवारी विभागीय प्रशासनाला मिळाले आहेत. उर्वरित कामांसाठी तब्बल १ हजार ७०० कोटी रुपयांची गरज आहे.
जलयुक्त शिवार योजनेतून १ हजार ३३६ सिमेंट बंधारे बांधण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यातील १ हजार १०२ कामे सुरू झाली. ८९२ बंधाऱ्यांवर ८४ कोटी ४२ लाख रुपयांचा खर्च झाला. मोठय़ा प्रमाणात कामे हाती घेण्यात आली. त्यातील बरीचशी कामे पूर्णही झाली. मात्र, पाऊसच न आल्याने या वर्षी जलयुक्त शिवार योजनेचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना मिळू शकला नाही. मात्र, ज्या ठिकाणी जलसंधारणाची कामे झाली, तेथील अर्थकारणाला गती मिळाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. नव्याने दीड हजार गावांची निवड केली जात असून त्यासाठी मोठी रक्कम लागणार आहे. या योजनेला उद्योजकांनीही चांगला पाठिंबा दिला.
सामाजिक दायित्वाचा १६ कोटी रुपयांचा निधी योजनेसाठी देण्यात आला. मात्र, ते काम काहीसे धीम्या गतीने सुरू आहे. उद्योजकांनी दिलेल्या निधीपैकी आतापर्यंत केवळ २ कोटी रुपये खर्च झाले. या योजनेत सर्वाधिक लोकसहभाग लातूर जिल्ह्य़ात मिळाला. तब्बल ४७ कोटी ८५ लाख रुपयांचे काम या जिल्ह्य़ात लोकसहभागातून झाल्याचे सांगितले जाते. विशेषत: गाळ काढण्यासाठी लोकांनी मोठे सहकार्य केले.
औरंगाबाद जिल्ह्य़ात सर्वाधिक सिमेंट नाला बंधाऱ्यांसाठी तरतूद करण्यात आली. २८३ गावांमध्ये सिमेंट बंधारे उभारण्याचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यातील २१७ कामे पूर्ण झाली आहेत. लातूर, उस्मानाबाद या दोन जिल्ह्य़ांतही मोठय़ा प्रमाणात काम झाले. मात्र, अजूनही अर्धे काम बाकी आहे. ते पूर्ण करण्यासाठी लागणारी रक्कम मात्र जास्त आहे. जसजशी कामे पुढे जातील, तसतसे निधीही मिळेल, असा दावा केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1500 village select in jalyukta shivar
First published on: 10-12-2015 at 01:30 IST