मी एसबीआय बँकेतून बोलतोय. तुमच्या बँक एटीएम कार्डची मुदत संपत आली आहे, असे दूरध्वनीवर सांगून एटीएम कार्डचा सोळा अंकी नंबर मिळवून अवघ्या पाच मिनिटांत बँकेच्या खात्यावरून तब्बल ४८ हजार रुपये अलगद काढून घेत गंडा घातल्याचा प्रकार शुक्रवारी शहरात घडला. दूरध्वनीवर संपर्क साधून बँकेशी संबंधित गोपनीय माहिती विचारत बँक खात्यावरील रक्कम लुटण्याचे प्रकार अजूनही घडत असल्याने पोलिसांसमोर या भामटय़ांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान कायम असल्याचे दिसून येत आहे.
सुरेंद्रकुमार कैलासनाथ चौधरी (वय ३०, पुंडलिकनगर, मुकुंदवाडी) यांना कालच्या प्रकारात ठगाने गंडा घातला. चौधरी यांच्याशी दुपारी चारच्या सुमारास ८४०७०४६१०४ या क्रमांकावरून ठगाने संपर्क साधला. ‘मी एसबीआय बँकेतून बोलतोय. तुमच्या एसबीआय एटीएम कार्ड मुदत संपत आली आहे,’ असे सांगून कार्ड चालू ठेवण्यासाठी कार्डवर असलेला सोळा अंकी नंबर द्या अन्यथा तुमचे कार्ड आजच ब्लॉक होईल, अशी भीती घालून ठगाने चौधरी यांच्याकडून कार्डवरील सोळा अंकी नंबर मिळवला. हा नंबर दिल्यावर काही वेळाने चौधरी यांना मोबाइलवर एसएमएस आला. त्यात आलेला ओटीपी नंबर ठगाने चौधरी यांच्याकडून विचारून घेतला. ओटीएम नंबर देताच ठगाने आता तुमचे कार्ड चालू होईल, असे म्हणून दूरध्वनी ठेवला. मात्र, चौधरी यांना संशय आला. त्यांनी लगेच बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापकाला घडलेला प्रकार सांगितला. व्यवस्थापकाने चौधरी यांचे बँक खाते तपासले असता खात्यातून ४८ हजार रुपये आताच काढले गेल्याचे निदर्शनास आणले. खात्यावरील रक्कम लुटली गेल्याचे लक्षात येताच बँक व्यवस्थापकाने चौधरी यांचे कार्ड ब्लॉक केले. वर उल्लेख केलेल्या मोबाइलवर समोरील व्यक्तीने मी एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगून ही फसवणूक केली. या बाबत चौधरी यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्ह्य़ाची नोंद केली.