औरंगाबादमध्ये तलवार, चाकू, जंबियासारखे प्राणघातक हल्ला करण्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्रास्त्रांची ऑनलाइन खरेदी केल्याचा प्रकार समोर आला असतानाच या शस्त्रांचा क्षुल्लक वादातही गैरवापर होत असल्याचे आता समोर आला आहे. शेवग्याच्या शेंगा तोडल्याचा जाब विचारल्याने एका डॉक्टरवर तलवारीने हल्ला केल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेत डॉ. पांडुरंग काळे (वय ८१) हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विजय साबळे हा तरुण काही दिवसांपूर्वी पांडुरंग काळे यांच्या बंगल्यातील शेवग्याच्या शेंगा तोडत होता. डॉ. काळे यांनी त्याला याचा जाब विचारल्यानंतर विजय तिथून निघून गेला. मात्र, याच रागातून गुरुवारी संध्याकाळी विजयने डॉ. काळे यांच्यावर तलवारीने हल्ला केला. गादिया विहार भागात ही घटना घडली. यात काळे यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी विजयला अटक केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 1, 2018 10:50 am