संसर्ग वाढत असल्याचेही निरीक्षण

औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅनची मशीन गेल्या अडीच महिन्यांपासून बंद आहे. जपानमधून त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग मिळाल्यानंतर ती सुरू होऊ  शकते. दरम्यान, शहरातील खासगी सिटी स्कॅन यंत्रावरून संसर्गाचे गुणांक किती (एचआरसीटी स्कोर) हे तपासण्यासाठी खासगी चिकित्सालयात रुग्णांची रांग आहे. त्यामुळेही संसर्ग वाढत असल्याचा दावा केला जात आहे.

त्याआधारे आलेले निष्कर्ष आणि डिजिटल एक्स-रे मशीनच्या आधारे केली जाणारी तपासणीदेखील पुरेशी असते. मात्र, रुग्ण स्वत:हूनच खासगी चिकित्सालयात जात आहेत. एका रुग्णासाठी अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत नाहक रक्कम खर्च होत असून प्रत्येकाने आपला संसर्ग गुणांक मोजण्याची आवश्यकता नाही, असा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी केला आहे.  लस घेणे आणि अंगावर दुखणे न काढणे या दोन बाबींवर लक्ष दिले तरी संसर्गाचा वेग आटोक्यात येईल, असेही सांगण्यात येत आहे. शहरी भागात सिटी स्कॅन करण्याचे प्रमाण वाढत आहे. वास्तविक साध्या एक्स-रे मशीनवरही संसर्गाची पातळी कळू शकते. पण कमी खर्चाचे उपाय उपयोगी ठरत नाहीत, असा समज पसरवून देण्यात आला आहे.