इंधन पंप विक्रीसाठी खुले करण्याचा पर्याय

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा संचित तोटा सहा हजार ५०० कोटींपेक्षा अधिक असून करोना काळात तो अडीच हजार कोटींपेक्षा अधिकचा होता. यात इंधन दरवाढीमुळे दररोज दोन कोटी रुपयांची भर पडत असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल  परब यांनी दिली. औरंगाबादेतील राज्य परिवहन महामंडळाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी शुक्रवारी घेतला.

तोटा कमी करण्याच्या अनुषंगाने परिवहन महामंडळाचे ३० इंधन पंप सर्वसामान्यांना विक्रीसाठी खुले करण्याचा मार्गही अवलंबण्यात येणार असून वर्षभरात हे काम पूर्ण केले जाईल. त्याचबरोबर खासगी उद्योजकांना बस बांधून देण्याचा उद्योग उभा ठाकू शकेल काय ?याचीही चाचपणी केली जात आहे. संचित तोटा कमी व्हावा म्हणून केलेल्या या उपाययोजनांबरोबरच इलेक्ट्रिक बसही येत्या काही दिवसांत रस्त्यांवर धावतील. दीडशे बसच्या निविदा निघाल्या असून केंद्र सरकारच्या योजनेतून हे काम हाती घेतले जात आहे. सर्वसाधारणपणे अडीचशे किलोमीटरच्या प्रवासासाठी इलेक्ट्रिक बसचा उपयोग केल्यास वीज उपलब्धतेनुसार चार्जिग स्टेशन उभारले जातील. राज्यात चार्जिग स्टेशन कुठे उभारले जावेत आणि ते कोणत्या मार्गावर याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून इलेक्ट्रिक बस जशा उपलब्ध होतील, त्याप्रमाणे हे काम केले जाईल.

१६०० कोटींपैकी सर्वाधिक रक्कम पगारावर

राज्य परिवहन महामंडळाला सरकारकडून येणे असलेल्या रकमेपैकी गेल्या तीन वर्षांत १६०० कोटी रुपये मिळाले. त्यातील बहुतांश रक्कम पगारावरच खर्च करावी लागली, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. शहरातील मध्यवर्ती बस स्थानक आणि सिडको बस स्थानकाच्या बांधकामाबद्दल निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा होणार असून त्यातून मार्ग काढला जाईल.

भाडेवाढीचा प्रस्ताव खुला

राज्यातील इंधन पंप विक्रीसाठी सर्वासाठी खुले करता येईल. यासाठी ऑइल कंपन्यांबरोबर करार झाला असून ३० पंप वर्षभरात खुले केले जातील. टायरची पुनवार्परयोग्य बांधणी महामंडळाकडून केली जाते. शासनाच्या विविध विभागांना लागणाऱ्या टायरची पुनर्बाधणीही करण्याचा प्रस्तावही समोर आहे. त्याचबरोबर बसची भाडेवाढ हाही प्रस्ताव खुला आहे. मात्र, त्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी घ्यावी लागणार आहे.