तीन-तीन दिवस रांगेत

औरंगाबाद : करोनाचे वाढते रुग्ण आणि ऐनवेळी त्यांनाही प्राणवायूची निकड भासण्याची शक्यता लक्षात घेऊन औरंगाबादेतील रुग्णवाहिकांनाही सिलिंडर मिळवण्यासाठी तीन-तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.

औरंगाबाद शहरात शासकीय, खासगी रुग्णालयांसह व्यावसायिक पातळीवर धावणाऱ्या मिळून ३७५ च्या आसपास रुग्णवाहिका आहेत. यातील काही रुग्णवाहिका या मृतदेह वाहून नेण्यासाठीचे काम करतात, तर इतर रुग्णवाहिका या अपघातग्रस्त, अत्यावश्यक रुग्णांना रुग्णालयांपर्यंत नेण्यासाठी धावतात. अशा रुग्णवाहिकांना सध्या करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आणि अत्यावश्यक रुग्णांसाठी म्हणून ठेवाव्या लागणाऱ्या प्राणवायूच्या सिलेंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

रुग्णवाहिकाचालक राजूभाई यांनी सांगितले, की सध्या तीन-तीन दिवस प्राणवायू सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. आपल्याकडील सातपैकी चार  रुग्णवाहिकांमध्ये प्राणवायूच्या सिलेंडरची व्यवस्था आहे. शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता आणि येणारे बहुतांश फोन करोनाग्रस्तांच्या कुटुंबीयांकडूनच असल्याने रुग्णवाहिकेत प्राणवायू सिलिंडर घेऊनच त्यांच्याकडे जावे लागते. जाफरगेटनजीकच्या दुकानातून सिलिंडर घेतले जातात. तेथे सध्या रुग्णवाहिका चालकांची रांग म्हणजे जवळचे ठेवून परतावे लागते. तीन-तीन दिवसांनंतर तेथून भरलेले सिलिंडर घेऊन यावे लागते. दुकानदारांच्या मते इतर ठिकाणाहून होणारा पुरवठा सध्या फारसा होत नाही. तेथे त्यांनाही प्रतीक्षा करावी लागते. गंभीर रुग्ण असेल तर तो झपाटय़ाने प्राणवायू खेचतो. कधी ३०-३५ किलोचा सिलिंडर तासा-दोन तासातच संपतो.

घरातही प्राणवायू सिलिंडर

अनेक रुग्ण घरातच विलगीकरणात राहत असून काळजीपोटी एक प्राणवायू सिलिंडर साधारण पाच हजारांची अनामत रक्कम ठेवून घेत आहेत. त्यांनाही प्रतीक्षा करावी लागते. दोन-तीन दिवस आधीच सिलेंडरसाठीची व्यवस्था करावी लागत असल्याचीही परिस्थिती शहरात पाहायला मिळते.