औरंगाबाद : सफरचंदांच्या किमती एखाद्या भाजीच्या दरात शोभाव्यात, एवढय़ा गडगडल्या आहेत. अवघे तीस ते पन्नास रुपयांत चांगल्या दर्जाचे सफरचंद बाजारात मिळत आहेत. कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या या परिस्थितीचा दरातील घसरणीशी काहीही संबंध नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.

औरंगाबाद येथील जाधववाडी उच्चतम बाजार समितीत दररोज १२ ते १५ ट्रक सफरचंद येतात. हिमाचली, काश्मीरी, आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन, अमेरिकन, अशा काही प्रकारातील सफरचंदांची आवक होते. यातील काश्मीरी सफरचंदांच्या १८ किलोच्या पेटीचा दर जाधववाडीतील ठोक बाजारपेठेत ८०० ते ९०० रुपये आहे. यातही जादा संख्येने खरेदी केली, तर पेटीचा दर कमी होतो. हिमाचली सफरचंद तर किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये किलोने मिळत आहेत. ठोक बाजारात तर त्याची किमत १५ ते २० रुपये किलोपर्यंतचीच आहे.

काश्मीर, हिमाचल प्रदेशात यंदा सफरचंदांचे मोठे पीक आलेले आहे. त्यामुळे दर घसरलेले आहेत. काश्मिरी सफरचंदांची १८ किलोची पेटी ८०० ते ९०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन सफरचंदांचे दर ८० ते १०० रुपयांपर्यंत आहेत, असे ठोक विक्रेते महंमद मुदस्सर यांनी सांगितले.