औरंगाबादमधील वाहनचालकांची आता गैरसोय होणार असून शहरातील पेट्रोल पंप आता रात्री बंद राहणार आहेत. शहरातील पेट्रोलपंप चालक असोसिएशनच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे.

पेट्रोल कंपन्यांकडून पंपचालक जे पेट्रोल खरेदी करतात, त्या पावतीवर ‘गॅसहोल’ असा उल्लेख असतो. म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केलेले असते. गेल्या दोन महिन्यापासून हे प्रमाण वाढवून दहा टक्के करण्यात आले आहे. तेव्हा पासून पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याच्या तक्रारी वाढल्या असल्याचे सिडको परिसरातील सरदारसिंग अँड सन्स पेट्रोलपंपचालक अमरजीतसिहं छबडा यांनी सांगितले. इथेनॉल पाण्याच्या संपर्कात आले की त्याचे पाणी होतं. तसा फलक पंपावर लावला असल्याचे ते म्हणाले.

इथेनॉलमुळे पाणी भेसळ केल्याची तक्रार वाढली आहे. रात्रीच्या वेळी भेसळ केल्याची शंका जास्त प्रमाणात असते. त्यामुळे आम्ही सकाळी सात ते रात्री सात या वेळेतच पेट्रोल पंप सुरु ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे छबडा यांनी सांगितले. सरकारकडून इथेनॉल मिसळण्यात येत असेल तर त्याची काय काळजी घ्यावी, त्याचे काय परिणाम होऊ शकतात याबाबत पेट्रोल कंपन्यांनी जागृती करायला हवी. पुरेशी माहिती नसल्याने गैरसमज वाढत आहे. यामुळे पेट्रोल पंपवरील कर्मचारी आणि वाहनचालकात वादही होऊ शकतात. हे प्रकार टाळण्यासाठी हा मार्ग निवडल्याचं पेट्रोलपंप असोशिएशनचे सेक्रेटरी अखिल अब्बास यांनी सांगितले. या निर्णयामुळे पहिल्या दिवशीच औरंगाबादमधील वाहनचालकांची चांगलीच तारांबळ झाली.