औरंगाबाद शहराज गाजत असलेल्या कचरा प्रश्नाचे पडसाद आज महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही पहायला मिळाले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी कचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी करत सभापतींना धारेवर धरलं. कचरा प्रश्नावर लवकर तोडगा निघाला नाही तर लोकं आपल्याला जोड्याने मारतील अशा शब्दांत शिवसेना नगरसेवकांनी सभापती गजानन बारवाल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. पालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील कचरागाडी मिळत नसल्याची खंत यावेळी शिवसेना नगरसेवक राजु वैद्य यांनी व्यक्त केली. वॉर्डातील कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी स्थानिक नगरसेवकांवर सोपवण्यात आलेली आहे. मात्र नगरसेवकांनी याला विरोध दर्शवत कचऱ्याचा प्रश्न नगरसेवकांनी सोडवायचा असेल तर अधिकारी काय करणार असा प्रतिप्रश्न केला.

अवश्य वाचा – कचराकोंडीवर विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया करण्याचे निर्देश

मात्र आजच्या बैठकीत कचरा प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी शिवसेना-भाजपत कलगीतुरा रंगलेला पहायला मिळाला. पालिकेत आपली सत्ता असुनही कचऱ्याचा प्रश्न का सुटत नाही. कचऱ्याच्या प्रश्नामुळे बाहेर आपला कचरा होत असल्याची उपरोधिक टीका शिवसेनेचे नगरसेवक सिद्धांत शिरसाठ यांनी केला. कचऱ्यामुळे शहरात सध्या धुराचं वातावरण झालेलं आहे. बाहेरुन शहरात येत असताना आपण महाबळेश्वरमध्ये तर आलो नाही ना असं वाटतं राहतं, मात्र शहरात शिरल्यानंतर खऱ्या अर्थाने वास्तवाची जाण होते असं म्हणत शिवसेना नगरसेवकांनी पालिका प्रशासनाच्या वेळकाढूपणाकडे लक्ष वेधलं.

अवश्य वाचा – ‘कचराकोंडीवरुन लक्ष विचलीत करण्यासाठीच सावरकरांच्या पुतळ्यावर शाइफेक’

पालिकेचे अधिकारी योग्य काम करत नाहीत. पालिकेतल्या अधिकाऱ्यांना केवळं बिलं काढायची समजतात मात्र रस्त्यावर साचलेले कचऱ्याचे ढीग दिसतं नाहीत असं म्हणत शिवसेना नगरसेवकांनी पालिकेतल्या टक्केवारीच्या राजकारणावर टीका केली. यावेळी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन पालिकेने लवकरात लवकर कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. यावेळी कचराप्रश्नावर झालेल्या हिंसाचारावर बोट विरोधी पक्षातील राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी पालिकेच्या बरखास्तीची मागणी केली.

अवश्य वाचा – औरंगाबादची कचराकोंडी कायम, नारेगावात कचरा टाकण्यास न्यायालयाची कायमची मनाई