लोकशाहीवर विश्वास नसलेली भाजपची मंडळी इतर पक्ष फोडण्याच्या मागे लागली आहेत. त्यामुळेच भाजप हा देशातला खरेदी-विक्री संघ बनला आहे, अशा कठोर शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर आज हल्लाबोल केला. ते ‘इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष’ शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

“गुजरातमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात फूट टाकण्याचे प्रयत्न केले. मात्र, तरीही अहमद पटेल यांना आपण निवडून आणले. अशा प्रकारे पक्षावरची आपली निष्ठा ढळता कामा नये”, असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. आपण एकत्र राहून ज्याप्रमाणे स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या विरोधात ‘चले जाव’ असा नारा दिला. त्याप्रमाणे भाजप सरकारविरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. भाजपला सत्तेतून दुर करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र प्रत्येक बाबतीत अग्रेसर राहिला आहे. येथील जनतेला वैचारिक भूमिका आहे. त्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे चव्हाण म्हणाले.

चव्हाण म्हणाले, देशातील विद्यापीठांमध्ये वेगळे विचार लादणे सुरु आहे. त्याविरोधात कोणी बोलले तर, त्याला देशद्रोही ठरवले जात आहे. ज्या मराठवाड्याने रझाकारांविरोधात लढा उभारला, त्या मराठवाड्यातून यासाठी तीव्र लढा उभारला जाईल. तुमच्या विचारात घाण आहे. जात, धर्म यावर देश तोडण्याची तुमचे विचार आहेत, असे विचार सुरु असताना देश स्वच्छ होऊ शकत नाही. कर्जमाफीची घोषणा केली, मात्र प्रत्येक्षात त्याची अमलबजावणी झाली नाही. काँग्रेसला अपेक्षत असलेली जीएसटी लागू करण्यात आलेली नाही. देशात जी कीड लागली आहे ती काढण्यासाठी आरएसएस आणि भाजपचे विचार हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा देशाची वाटचाल अवघड परस्थितीमधून सुरु होती. मात्र, त्यानंतरही इंदिरा गांधी यांनी सक्षमपणे देशाचा कारभार केला. मात्र, आजही इंदिरा गांधी यांना बदनाम करण्याचे कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. त्यांना बदनाम करण्यासाठी भाजपने नाटकं सुरु केली आहेत. यासंदर्भात जो चुकीचा चित्रपट बनवण्यात आला, त्याला लोकांनीही प्रतिसाद दिला नाही, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.