गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पात सध्या २४.५१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. मनपाच्या वतीने शहराला सध्या ३ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा सुरू आहे. या वेळापत्रकानुसार अडीच महिने पुरेल इतकाच साठा असूनही काही ठिकाणी नागरिकांकडून पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. ही उधळपट्टी थांबविण्याचे मोठे आव्हान आहे.
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात मागील आठवडय़ात आयोजित बैठकीत मराठवाडय़ातील पाणी स्थितीबाबत चर्चा करण्यात आली. पाणीटंचाई लक्षात घेऊन नांदेडकरांची तहान भागवण्यासाठी येलदरी धरणातून १० दलघमी पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी व मनपा आयुक्त सुशील खोडवेकर यांनी बैठकीत केली. दरम्यान, नवीन पर्यायी योजनेच्या माध्यमातून मार्च व एप्रिल महिन्यांत ऊध्र्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणातून प्रत्येकी १.२५ दलघमीप्रमाणे दोन पाणीपाळ्या नांदेडसाठी मिळणार आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आसना नदीवरील सांगवी बंधारा येथून हे पाणी काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या बाजूला नांदेड व परभणी जिल्ह्य़ांत मोठय़ा प्रमाणात पाण्याचा उपसा सुरू आहे. पाण्याचा उपसा थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभाग व पोलीस विभागाचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले. परभणी जिल्ह्य़ात होणारा पाण्याचा उपसा थांबविण्यासाठी येथील जिल्हाधिकाऱ्यांना लेखी कळविण्यात आले.
मनपाच्या वतीने नळाद्वारे नागरिकांना ३ दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. परंतु अनेक वसाहतींमध्ये नळाला तोटय़ा नसल्यामुळे पाणी वाया जाते. पाणीटंचाईची झळ सोसत असतानाही नागरिकांकडून पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. हे प्रकार थांबविण्याचे आव्हान आहे. या बाबत जनजागृती करण्याची गरज आहे. पहाटेच्या वेळी नळाला पाणी आल्यानंतर घराच्या छतावरील टाक्या भरून पाणी वाया जात असल्याचेही निदर्शनास आले. पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांचा पाणीपुरवठा बंद करणे वा दंड आकारणे अशा स्वरुपाची कारवाई करण्याचा मनपाचा विचार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenge cease extravagance water
First published on: 06-01-2016 at 03:16 IST