दिवसागणिक औरंगाबाद शहरातील करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे शहरातील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दुपारी शहरात २८ करोनाबाधित रूग्णांची वाढ झाली आहे. शहरातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ९०० झाल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

उद्या १७ तारखेच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा वगळता औरंगाबाद शहरातील सर्व आस्थापना, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना दिले.

औरंगाबाद शहरातील आता आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
कैलास नगर (1), चाऊस कॉलनी (1), मकसूद कॉलनी (2), हुसेन कॉलनी (4), जाधववाडी (1), न्यू बायजीपुरा, गल्ली नं.3 (1), एन सहा, संभाजी कॉलनी, सिडको (1), कटकट गेट (1), बायजीपुरा (10), अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ, सिडको (2), लेबर कॉलनी (1), जटवाडा (1), राहुल नगर (1) आणि जलाल कॉलनी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 16 पुरुष आणि 12 महिला रुग्णांचा समावेश असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

४ तासांत चौघांचा मृत्यू
घाटी रुग्णालयात मागील चोवीस तासात औरंगाबाद शहरातील नवीन हनुमाननगर येथील ७४ वर्षीय, बायजीपुरा येथील ७० वर्षीय, शहानूर मियाँ येथील ५७ वर्षीय आणि हिमायतनगर येथील ४० वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २५ कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले असल्याचेही त्यांनी कळविले आहे.