सुहास सरदेशमुख

आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती शून्याच्या खाली गेल्या तरी इथेनॉलच्या दरात तेजीच राहील. इंधानामध्ये १० टक्के इथेनॉलचे मिश्रण अनिवार्य असल्यामुळे सध्या इथेनॉलचा प्रतिलिटर दर ५९ रुपयांवर आहे. त्यामुळे साखर कारखान्यांमध्ये साखर हे दुय्यम उत्पादन आणि इथेनॉल हे प्रमुख उत्पादन ठरण्याची शक्यता आहे.

राज्यात ६७ कोटी लिटरची इथेनॉल उत्पादनाची क्षमता असली तरी सध्या ते ४२ कोटी लिटपर्यंतच बनविले जाते. अजूनही एकूण इंधन वापराच्या दहा टक्के इथेनॉल मिसळण्याचे केंद्र सरकारचे धोरण कायम आहे. महसूल मिळत राहावा म्हणून इंधन दरात फारशी घट होण्याची शक्यता कमी असल्याने इथेनॉल तेजीत राहील. त्यातच बहुतांश साखर कारखान्यांनी सॅनिटायझर निर्मितीमध्ये आघाडी घेतली आहे. प्रामुख्याने अल्कोहोलपासून बनविण्यात येणाऱ्या शंभर मिलिलिटर अल्कहोलची किंमत ५० रुपयांपेक्षा अधिक असणार नाही, असे केंद्र सरकारने ठरवून दिल्याने आता या क्षेत्रातही अनेक कारखान्यांनी आघाडी घेतली आहे.

राज्यात ८० हून अधिक आसवानी प्रकल्प आहेत. त्यातून एकूण क्षमतेएवढे इथेनॉल निर्माण होऊ शकलेले नव्हते. आजही इंधनाचे दर स्थिर असल्याने इथेनॉलचे दरही कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे नॅचरल शुगरचे बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले.

होणार काय? : देशभरातून ५५० लाख कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होईल असे गृहीत धरण्यात आले होते. प्रत्यक्षात ३५० लाख कोटी लिटपर्यंतही क्षमता पोचली नव्हती. एका बाजूला साखरेचे दर कमी होत आहेत. घरगुती वापरात एकूण उत्पादित साखरेच्या केवळ दहा टक् के साखर वापरली जाते. बाकी साखर वापरणाऱ्या कंपन्या सध्या बंद आहेत. बिस्कीट, चॉकलेट, शीतपेय आणि औषधांमध्ये साखरेचा वापर अधिक होतो. मात्र, यातील अनेक उत्पादने घेता येणार नाहीत. या वर्षी आइसक्रीम निर्मितीही झाली नाही. परिणामी साखरेचे दर साखर उद्योगाला घसरणीत टाकणारे असले तरी इथेनॉलमुळे हा उद्योग टिकून राहू शकतो, असा दावा केला जात आहे. सध्या ‘सी’ दर्जाचे इथेनॉल ४३.५०, तर साखरेचे प्रमाण अधिक असलेल्या ‘बी’  इथेनॉलचे ५३ रुपये तर उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती केल्यानंतर ५९ रुपये सध्या आहे.

साखरेचे दर कमी होत असले तरी इथेनॉलचे दर कायम राहतील. सध्या क्षमतेपेक्षा कमी उत्पादन आहे. केंद्राने जाहीर  केलेल्या कर्ज सवलत योजनेचाही लाभ होतो आहे. सध्या इथेनॉल साखर उद्योगाला वाचवू शकेल, अशी शक्यता अधिक आहे.

– बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष नॅचरल शुगर