चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेराहून पसे का आणत नाहीस, या कारणावरून ग्रामसेवक पतीसह सासरच्या लोकांनी सहायक अभियंता असलेल्या विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पतीसह सासरच्या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विवाहितेच्या नातेवाईकांनी घरात घुसून तोडफोड केली. या प्रकरणी १८ जणांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील पांगरीरस्ता भागात गुरुवारी हा प्रकार घडला. ग्रामसेवक प्रताप राठोड याची पत्नी सहायक अभियंता ज्योती (वय २६) हिला घरात ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घरी गेले तेव्हा ही महिला बेशुद्धावस्थेत असल्याचे आढळून आले. तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर या महिलेच्या नातेवाईकांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली. चारचाकी वाहन खरेदीसाठी माहेराहून पसे का आणत नाही या कारणासाठी सासरच्या लोकांनी तिला विष पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरून पतीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, मुलीला विष पाजल्याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी राठोड यांच्या घरात घुसून तोडफोड केली. या प्रकरणी राठोड यांच्या तक्रारीवरून १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सरकारी नोकरीवर असलेल्या सुशिक्षित दाम्पत्यात पशावरून वाद निर्माण झाल्याची घटना ऐन दिवाळीच्या सणात समोर आली.