गौण खनिज विभागातील अव्वल कारकून गजानन चौधरी यांचा कामाच्या अतिताणामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या प्रकरणाची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिल्यानंतर शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसांत चौकशी करून अहवाल देऊ, असे जाहीर केले आहे. कामाचा तणाव ही गंभीर समस्या असून त्यावर तपशीलवार चौकशी तीन दिवसांत केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी म्हटले आहे.  गौण खनिज विभागात अधिकारी व कर्मचारी पुरेशा संख्येत नसल्याने कामाचा ताण येत असल्याची तक्रार चौधरी यांनी लेखी स्वरुपात केली होती. महसूल संघटनेलाही त्यांनी तसे पत्र दिले होते. ‘कामाचा एवढा ताण आहे की, त्यामुळे आपल्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो’ या शब्दांत इशारा देऊनही अधिकाऱ्यांनी अधिकचे कर्मचारी दिले नाही. या विभागात सर्वत्रच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. विभागाचा आकृतिबंधच मुळात चुकला असल्याचे काही अधिकारी सांगतात. भूजल सर्वेक्षण विभागाकडून दिला जाणारा गौण खनिज अधिकारी, त्याच्या हाताखाली एक अव्वल कारकून व एक लिपिक एवढाच आकृतिबंध मंजूर आहे. वाळूपट्टय़ांचे लिलाव, अवैध वाळू रोखण्यासाठी दिले जाणारे आदेश, वाळू ठेकेदारांना लावला जाणारा दंड आदी कामे या विभागाकडून होतात. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे चौधरी यांचा मृत्यू झाला. आता चौधरीच्या मृत्यूची कारणे कामाच्या ताणात कशी दडली होती, याचा अभ्यास केला जाणार आहे.

नाटकाचा अभ्यासही शास्त्रीयच व्हावा -चंद्रकांत कुलकर्णी

औरंगाबाद : भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व रसायनशास्त्राप्रमाणेच नाटयशास्त्रदेखील एक विज्ञान आहे. या शाखाच्या विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवर अभ्यास सहली, क्षेत्रभेटींचे आयोजन करून सिने-नाटय़विषयक माहितीची भर घातली पाहिजे, असे मत सिने व नाटय़दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. बुधवारी नाटय़शास्त्र विभागाच्या नाटय़महोत्सवप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू  डॉ. बी. ए. चोपडे होते.

यावेळी चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, मूळ औरंगाबादचा रहिवासी आणि नाटय़शास्त्र विभागाचा माजी विद्यार्थी म्हणून तुमच्याशी बोलत आहे. उत्साह, ऊर्जा, उर्मी यातूनच कलाक्षेत्रात यश मिळत असते. हे शास्त्र आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी पुणे-मुंबई, भोपाळ, केरळ आदी विविध ठिकाणी सहली नेल्यास त्यांचा फायदा होईल, असे सांगितले. प्रास्ताविक डॉ. जयंत शेवतेकर यांनी केले. १८ नाटकांचा हा पहिला महोत्सव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रात्याक्षिक परीक्षेचा भाग असलेल्या या नाटय़महोत्सवात दररोज सायंकाळी साडेसहा वाजता विद्यार्थ्यांनी दिग्दíशत केलेल्या ‘खडकेवाडी’ नाटकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.