मोटार अपघातात ठार झालेल्या बुलढाणा येथील कृषी अधिकाऱ्याच्या वारसांना अपघातातील दोन्ही मोटारींचे चालक, मालक व विमा कंपनीने संयुक्तपणे ४६ लाख ५८ हजार ७६० रुपये, तसेच मंजूर रकमेवर दावा दाखल झाल्याच्या तारखेपासून ९ टक्के दराने व्याज देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी दिला.

बुलढाणा येथील कृषी अधिकारी संदेश जगन्नाथराव कोमटवार (आदित्यनगर, गारखेडा परिसर) हे १२ फेब्रुवारी २०११ रोजी आपले मूळ गाव किल्लेधारूर (तालुका धारूर, जिल्हा बीड) येथून औरंगाबादकडे मोटारीने (एमएच २० बीसी ७४५५) येत होते. ते स्वत: मोटार चालवत होते. बीड-औरंगाबाद रस्त्याने दाभरुळ शिवारातून त्यांच्या मोटारीला औरंगाबादहून येणाऱ्या एमएच २१ व्ही १०९९ या मोटारीने धडक दिली. या अपघातात संदेश कोमटवार यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी मोटारीत असलेल्या त्यांची पत्नी विद्या जखमी झाल्या. पाचोड पोलिसांनी या अपघाताची नोंद केली. मयत संदेश यांची पत्नी विद्या व आई सरस्वती यांनी अ‍ॅड. राजेंद्र जाधव व अ‍ॅड. पी. एस. तांदुळजे यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायालयात दोन्ही मोटारींचे मालक व दोन्ही मोटारींची विमा कंपनी यांच्याविरुद्ध नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. या प्रकरणाची अंतिम सुनावणी मोटार अपघात न्यायालयाचे विशेष न्यायाधीश गोसावी यांच्यासमोर झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्या. गोसावी यांनी संदेश कोमटवार यांच्या वारसांना वरीलप्रमाणे भरपाई देण्याचा आदेश दिला.