हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर आमदार संभाजी पाटील निलंगेकर, तसेच सुधाकर भालेराव यांच्या बरोबरच प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, लातूर ग्रामीण मतदारसंघातून पराभूत झालेले जिल्हा बँक व बाजार समिती संचालक रमेश कराड, राष्ट्रीय किसान मोर्चाचे उपाध्यक्ष, शेतकरी नेते माजी आमदार पाशा पटेल यांचीही नावे मंत्रिपदाच्या चच्रेत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी पाशा पटेल हे राज्याचे भावी कृषिमंत्री असल्याचे आश्वासन दिले गेले. भाजपकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलणारा पाशा पटेल व्यतिरिक्त दुसरा हक्काचा माणूस नाही. मुस्लीम समाजातील व्यक्ती व शेतकरी नेता असा संगम पटेल यांच्यात असल्यामुळे कोणाला पटेल अथवा न पटेल मात्र त्यांना संधी मिळू शकते, असे पटेल समर्थकांचे म्हणणे आहे.
प्रदेश प्रवक्ते हाके मूळचे अहमदपूर तालुक्यातील. प्रशासकीय कामाचा अनुभव व गेल्या १५ वर्षांपासून निष्ठेने भाजपत काम करणारे कार्यकत्रे आहेत. धनगर समाजात हटकर जातीचे ८० टक्के लोक आहेत. त्यांचे ते प्रतिनिधित्व करतात. महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते असले, तरी त्यांच्या मंत्री होण्यातून भाजपला लाभ होणार नाही, तो त्यांच्या पक्षाला होईल. हाके यांच्या मंत्रिपदामुळे भाजपची शक्ती वाढेल व धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचा माणूस उपलब्ध होईल, असे हाके समर्थकांचे म्हणणे आहे.
लातूर ग्रामीणचे रमेश कराड निवडणुकीत काँग्रेससोबत ताकदीने लढले. दोन्ही वेळा आमदारकीने त्यांना हुलकावणी दिली. जिल्हा बँकेत त्यांनी चंचुप्रवेश केला. पक्षाने बाजार समितीत त्यांना संचालकपदाची संधी दिली असली, तरी त्यांना मंत्रिपदाची संधी दिली तर त्याचा लाभ पक्षाला होईल, असे कराड समर्थकांचे म्हणणे आहे. जिल्हय़ातील सहापकी पाच मतदारसंघात विधानसभेची निवडणूक लढवणारे सर्वचजण मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. मुख्यमंत्री कोणाला संधी देतात हे कळेपर्यंत सर्वजण आपापल्या ‘कोपराला गूळ लावून’ बसले आहेत.