महापालिकेला आर्थिक चणचणीतून बाहेर काढण्यासाठी उद्योजकांचे सहकार्य घेत वेगवेगळ्या उपक्रमांना मोठय़ा प्रमाणात निधी मिळू लागला आहे. बजाजच्या वतीने शाळांची रंगरंगोटी व चौकांच्या सुशोभीकरणासाठी १ कोटी ६० लाख निधी देण्याचे आश्वासन बजाजच्या वतीने सी. पी. त्रिपाठी यांच्याकडून मिळाल्याचे गुरुवारी सर्वसाधारण सभेत सांगण्यात आले. या बरोबरच शहरातील नाटय़गृहासाठीही अनिल भंडारी या उद्योजकाने सर्व खुच्र्या दुरुस्त करून देण्याची तयारी दाखवली आहे. एवढेच नाही, तर सफारी पार्कसाठी राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत ५० कोटींचा निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या सर्व उद्योजकांबरोबर समन्वय ठेवत महापालिकेला अधिकाधिक निधी मिळविण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केला आहे.
शहरातील जवळपास सर्वच चौकांचे सुशोभीकरण करण्यासाठी उद्योजकांनी रक्कम देण्याचे मान्य केले असून, चौकही दत्तक घेतले आहेत. सीआयआय आणि बजाज उद्योगसमूहाच्या वतीने शून्य घनकचरा मोहिमेसाठी १ कोटी ६० लाख रुपये देण्याचे ठरविण्यात आल्याने या मोहिमेला अधिक वेग येईल, असे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले. मिटमिटा भागात २०० एकरांवर प्राणी संग्रहालय उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ही जागा महापालिकेला मिळावी, या साठी जिल्हा प्रशासनाबरोबर पत्रव्यवहारही सुरू आहे. जागा ताब्यात आल्यानंतर सफारी पार्कसाठी राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून ५० कोटींचा सीएसआर फंड मिळवता येऊ शकेल, अशी बोलणी सुरू आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
मलनिस्सारण योजनेचे काम करणाऱ्या प्रकल्प व्यवस्थापन समितीमार्फत काही निधी मिळविता येऊ शकतो. करार झाल्यानंतरही त्यांना द्यावयाच्या रकमेत ०.१२ टक्के रक्कम कमी घेण्यास एजन्सीने तयारी दर्शविल्याचेही सांगण्यात आले. आयुक्त केंद्रेकर यांनी या अनुषंगाने चर्चा केली होती. वेगवेगळ्या उद्योजकांकडून मोठय़ा प्रमाणात निधी मिळविण्याचा आयुक्तांचा प्रयत्न स्पृहणीय असल्याचे नगरसेवकांनीही सांगितले. ही रक्कम मिळत असली, तरी मालमत्ता कराच्या वसुलीकडे दुर्लक्ष करू नका, अशी सूचना महापौर त्र्यंबक तुपे यांनी केली.