राज्यमंत्री पोटे यांची ग्वाही

राज्यातील युती सरकार शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी असून शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा अधिक मोबदला दिला जाईल, अशी ग्वाही उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली.

उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि.) येथील ८० शेतकऱ्यांनी औद्योगिक वसाहतीसाठी ३६० एकर जमीन राज्य सरकारला दिली आहे. या जमिनीस प्रतिएकर २१.५० लाख रुपये दरही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बठकीत निश्चित करून जिल्हा प्रशासनाने तसा प्रस्ताव राज्य सरकार व औद्योगिक विकास महामंडळाकडे पाठवून दिला. मात्र, अनेक महिने उलटले तरी या संदर्भात कसलाही निर्णय न झाल्यामुळे वडगाव येथील शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्ताने लिहिलेले निवेदन मंत्र्यांना पाठवून या संदर्भात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांनी या संदर्भात राज्यमंत्री पोटे यांची भेट घेऊन या संदर्भात संबंधित शेतकरी व अधिकाऱ्यांची संयुक्त बठक घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंती केली.

या अनुषंगाने पोटे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी, उद्योग विभागाचे अधिकारी व शेतकरी यांची संयुक्त बठक झाली. औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केलेली जमीन जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असून ही वसाहत पूर्णत्वास गेल्यास या जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळेल. औद्योगिक वसाहतीबाबत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे संपादित केलेल्या जमिनीचे दर त्यांना दिले जातील, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

औद्योगिक महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापराव जाधव, लातूरचे विभागीय अधिकारी मुरूमकर, उद्योग विभागाचे कक्षाधिकारी मिस्त्री, रवींद्र धुरजड यांच्यासह भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, रमेश कोरडे, चंद्रकांत मुळे, कमलाकर कुलकर्णी आदी उपस्थित होते.