30 September 2020

News Flash

साखरेच्या राजकारणाला बोरचुरी वरणाची फोडणी

रात्रीचे जेवण गावकऱ्यांबरोबर. त्यातही तरुण असतील तर अधिक चांगले. मग ओळखीपाळखी होतात.

लातूर जिल्ह्य़ातील औरादशाहजानी जवळ बोरचुरी नावाचे गाव. तसे लहानसेच. तसा हा पट्टा तुरीचा. त्यामुळे ज्या व्यक्ती मांसाहार करीत नाहीत त्यांच्यासाठी एका खास चवीचे वरण केले जाते. लातूरमध्ये बोरचुरी वरण तसे प्रसिद्ध. गावचे लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना भेटतात तेव्हा साहजिकच ‘या गावाकडं’ असे म्हणतात. मग बेत ठरतो आंबट आणि काहीशा तिखट वरणाचा. पालकमंत्री या अशा वरणपाटर्य़ाना आवर्जून हजेरी लावतात. तरुणांनी केलेला बेत असेल तर अधिकच उत्तम. गाडय़ांचा ताफा न घेता कधी, तर कधी दुचाकीवरही पोहोचतात. रात्रीचे जेवण गावकऱ्यांबरोबर. त्यातही तरुण असतील तर अधिक चांगले. मग ओळखीपाळखी होतात. गावची समस्या ऐकून घ्यायची. करत असलेले काम सांगायचे. त्या पार्टीतील दोन तरुणांची नावे आवर्जून लक्षात ठेवायची आणि त्यांना इतर कार्यक्रमांना आवर्जून बोलवायचे, अशी संभाजी पाटील यांच्या बांधणीची पद्धत.

सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत येणाऱ्या व्यक्तीला भेटणारे निलंगेकर आणि त्यांच्या समवेतच्या बोरचुरी वरणाचा बेत सध्या लातूरमध्ये चर्चेचा विषय आहे. राजकीय बांधणीची ही हातोटी अनोखी असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. एका बाजूला ही बांधणी, दुसरीकडे परंपरापरागत बांधणीचा बाज. लातूरचे आमदार सध्या त्यांच्या नव्या खासगी साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांकडून समभाग मिळवत आहेत. ज्या गावात रेल्वेने पिण्याचे पाणी पुरवावे लागले तेथे ‘२१ शुगर’ हा कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे या कारखान्याचे सभासद होता यावे यासाठी शेतकरी शिफारस मिळावी, अशी विनंती करीत आहेत. काँग्रेसची पक्षबांधणी आणि भाजपच्या नेत्यांची कार्यकर्ते व मतदारांची बांधणी असा फरक आवर्जून सांगितला जात आहे.

या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतूनही हा फरक स्पष्टपणे जाणवत असल्याचे सांगण्यात येते. सहजपणे उपलब्ध होणारा नेता, अशी संभाजी पाटील निलंगेकरांची ओळख होत आहे. येणाऱ्या व्यक्तीला आपलेसे करण्यासाठी गावातील आमंत्रणाला बोरचुरी वरणाची फोडणी देत केली जाणारी बांधणी राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय आहे. वरणाच्या ताटात दोन भाकरी कुस्करून होणारी बांधणी आणि शेअर्स माध्यमातून केली जाणारी बांधणी सध्या लातूरकरांमध्ये चच्रेत आहे. वर्षांनुवष्रे काँग्रेसच्या ताब्यातील लातूरचा गड ताब्यात घेण्यासाठी राजकीय पटलावर बरीच व्यूहरचना केली जात आहे. पाणीटंचाईपासून ते रेल्वे कोचचा कारखाना आणण्यापर्यंत केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना सध्या बोरचुरी वरणाची फोडणी मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2018 2:50 am

Web Title: latur politics sambhaji nilangekar patil amit deshmukh sugar factory politics
Next Stories
1 कंपनीच्या दायित्व निधीसमवेत सरकारचीही मदत
2 लोकप्रतिनिधींविरुद्ध महिलेची अत्याचार केल्याची तक्रार
3 औरंगाबादची कचराकोंडी कायम!
Just Now!
X