परदेशात नोकरीच्या आमिषाला बळी पडत एका उच्च शिक्षित विद्यार्थ्याला मोठ्या फसवणुकीला समोरे जावे लागले आहे. चांगली नोकरी मिळेल या आशेने आईचे दागिने विकून जमवलेले या विद्यार्थ्याचे अडीच लाख रुपये बुडाले आहेत. औरंगाबादमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका महिलेसहीत तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मोहम्मद अदनान शेख (वय २५, रा. राधास्वामी कॉलनी) असे फसवणूक झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो औरंगाबादमधील मौलाना आझाद महाविद्यालयात एम.एसी. मायक्रोबायोलॉजीचे शिक्षण घेत आहे. त्याला कॅनडात लॅब टेक्निशियन असिस्टंट या पदाच्या नोकरीचे आमिष दाखवत बोगस नियुक्तीपत्र देऊन फसवणूक करण्यात आली आहे. शेख याने गेल्या जानेवारी २०१८ मध्ये मित्राच्या ओळखीने परदेशी नोकरी मिळवून देणार्‍या एजंटच्या संपर्कात आला. एजंट मोहम्मद अमर याच्यामार्फत शकील नामक भामट्याकडे त्याने अडीच लाख रुपये भरले.

मात्र, सप्टेंबर उजाडला तरी कॅनडाच्या कंपनीतून त्याला प्रतिसाद आला नाही म्हणून शेखने शकीलकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर शकीलची पत्नी आयेशा हीने शेखला बोगस नियुक्ती पत्र दिले. नियुक्ती पत्र मिळताच शेखने कॅनडास्थित कंपनीशी ई-मेलवर संपर्क साधला. पण कंपनीने आपण मोहम्मद अदनान शेख नावाच्या कोणत्याही व्यक्तीला नियुक्तीपत्र न दिल्याचे सांगितले. ही बाब शेखने शकीलला सांगितली आणि त्याकडे आपल्या पैशांची मागणी केली. मात्र, वारंवर मागणी करुनही शेखला मिळंत नसल्याने त्याने बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आयेशा, शकील आणि अमर यांच्या विरोधात गुन्हा केला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजश्री आडे करीत आहेत.