औरंगाबाद शहरात कचरकोंडी झाली असून शहरभर कचऱ्याचे ढीग साचलेत. त्यामुळे कचऱ्याच्या प्रश्नावर राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने या राजकारणात उडी घतली असून त्यांनी आज महानगरपालिकेसमोर कचरा टाकून निषेध व्यक्त केला. मात्र शनिवारच्या दिवशी पालिकेला सुट्टी असताना केलेले हे आंदोनल म्हणजे निवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहराची कचराकोंडी फोडण्यासाठी महानगरपालिकेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून पालकमंत्री दीपक सावंत यांनी नारेगाव परिसरातील नागरिकांची भेट घेतली. मात्र, यावर तोडगा निघाला नाही. अजूनही बोलणी सुरू असून आज संध्याकाळपर्यंत यावर तोडगा निघेल असे सांगितले जात आहे.

औरंगाबाद शहराचा कचरा शहरालगत असलेल्या नारेगाव परिसरात टाकला जातो. या कचरडेपोमुळे आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे सांगत परिसरातील सुमारे पंधरा गावांतील नागरिकांनी कचरा डेपोच्या विरोधात आंदोलन उभारले. त्यामुळे महापालिकेची कचराकोंडी झाली आहे. त्यातून तोडगा काढण्यासाठी पालिकेने पर्यायी जागेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र जागा मिळाली नाही.

नारेगाव परिसरातील नागरिकांनी या कचरा डेपोच्या विरोधात आंदोलने केल असून तब्बल आठवडा उजाडूनही कचराकोंडीवर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शहरात कचऱ्याचे ढिग साचले आहेत. अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र कायम असले, तरी तोडगा निघत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहरातील कचरा पालिकेसमोर टाकून निषेध करण्यात आला. सुट्टी दिवशी आंदोलन का? याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता भांगे यांना विचारले असता, त्यांनी उत्तर देणे टाळले. मात्र, शहरातील नागरिक कचऱ्यामुळे हैराण आहेत. पालिका उपाय शोधण्यात अपयशी ठरली आहे. कचरावप्रश्नावर जाग यावी म्हणून पालिकेसमोर कचरा टाकल्याचे त्यांनी सांगितले.