हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणप्रसंगी उपस्थित राहणार की नाही, असा प्रश्न समाजमाध्यमातून खासदार इम्तियाज जलील यांना विचारण्यात आला आणि ध्वजारोहणास उपस्थित राहणार की नाही, याचे उत्तर न देता तुमच्याकडून देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशी भाषा वापरत इम्तियाज जलील यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

गेली चार वर्षे आमदार असताना इम्तियाज जलील हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहणास गैरहजर होते. मराठवाडय़ात १७ सप्टेंबर हा दिवस रझाकारापासून मुक्तीचा मानला जातो. इतिहासातील एमआयएम हा पक्ष रझाकारांच्या बाजूचा होता. आता तो नवा आहे. त्यामुळे आजचा एमआयएम पक्ष वेगळा आहे, हे ध्वजारोहणास उपस्थित राहून दाखवून द्यावे, अशी अपेक्षा पत्रकार निशिकांत भालेराव यांनी व्यक्त केली होती. त्याला प्रतिसाद देण्याऐवजी जलील यांनी वेगळेच उत्तर दिल्यामुळे  वादाला तोंड फुटले आहे. मंगळवारच्या ध्वजारोहण कार्यक्रमास ते पुन्हा गैरहजर असणार आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ, आ. कृ . वाघमारे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामासाठी मोठा लढा दिला. अनेकांनी हौतात्म्य पत्करले. भारत सरकारने ‘ऑपरेशन पोलो’ हातात घेत हैदराबाद संस्थान विलीन करून घेतले. या सशस्त्र कारवाईनंतर अनेक वर्षे हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जात असे. मात्र, त्याला पुढे शासकीय स्वरूप देण्यात आले. उद्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण होणार आहे.  गेली चार वर्षे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहणाला येणारे इम्तियाज जलील १७ सप्टेंबरचा ध्वजारोहण समारंभ टाळतात, असे अनेकांच्या लक्षात आले होते. गेल्या वर्षी त्यांच्या अनुपस्थितीचे वृत्त ‘लोकसत्ता’मधून प्रकाशित करण्यात आले होते. तेव्हा कार्यक्रम टाळण्याची इच्छा नव्हती, मात्र तातडीचे काम आले होते, अशी प्रतिक्रिया जलील यांनी दिली होती.

या वर्षी खासदार इम्तियाज जलील या कार्यक्रमास उपस्थित राहणार की नाही, असा प्रश्न समाजमाध्यमातून उपस्थित केला गेला आणि त्याला उत्तर देण्याऐवजी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे म्हणत मला मतदान करणारे मतदार रझाकार आहेत काय, असा  प्रश्न जलील यांनी समाजमाध्यमातून विचारला आहे. या अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘इतिहासातील तो धागा चुकीच्या पद्धतीने जोडला जात आहे. देशभक्तीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे हे कोण? माझे कार्यक्रम पूर्वीच ठरले होते. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी सध्या मुंबईत आहे. त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही.’’