दुष्काळी स्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर, निराधार व गरीब कुटुंबीयांवर मोठी संकटे कोसळली आहेत. जनावरांना चारा उपलब्ध नाही. दुष्काळ निवारणासाठी पाऊस पडावा, या साठी बकर ईदचे औचित्य साधून जिल्हाभरातील मुस्लीम बांधवांनी शुक्रवारी प्रार्थना केली. मक्का हजयात्रेत चेंगराचेंगरी होऊन मरण पावलेल्या ७१७ यात्रेकरूंना या वेळी आदरांजली वाहण्यात आली.
शहरातील ईदगाह मदानावर मुस्लिम बांधवांनी मोठय़ा संख्येने बकर ईदनिमित्त पावसासाठी नमाज अदा केली. माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, तहसीलदार सुभाष काकडे, सुरेश देशमुख यांच्यासह राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदच्या दिवशीच मक्केत सतानावर दगड मारण्याच्या प्रथेदरम्यान झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत ७१७ यात्रेकरूंचा मृत्यू झाला. त्यांना शहरातील मुस्लिम व्यापारी, दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. परंडा शहरातील ईदगाह मदानावर जफरअली काझी यांच्या नेतृत्वाखाली, तर तालुक्यातील कुंभेफळ, डोंजा, कुक्कडगाव, कौडगाव, अनाळा, शेळगाव, ढगिपपरी, जवळा नि., आलेश्वर आदी ठिकाणीही ईदची नमाज अदा केली. नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ईदची नमाज शांततेत पार पडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता.